लायसन्स राज व परदेशी कंपन्यांना भारतात उपकंपनी सुरू करण्यास असलेल्या मर्यादांमुळे जपनाच्या सुझुकी कंपनीनेही अन्य परकी कंपन्यांप्रमाणे भारतीय कंपनीशी हातमिळविणी केली. सुझुकी कंपनीने टीव्हीएसशी भागीदारी करून भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. १९८२ मध्ये झालेली भागीदारी ही तांत्रिक सहकार्यासाठी प्रामुख्याने होती आणि या सहयोगातूनच टीव्हीएस सुझुकीअंतर्गत सुझुकी सुप्रा, सुझुकी समुराई, सुझुकी शोगन, सुझुकी शाउलिन, सुझुकी मॅक्स १०० या मोटरसायकल लाँच झाल्या. सुझुकीच्या मोटरसायकलाचा विशिष्ट चाहता वर्ग होता. त्यामुळे या मोटरसायकलची मागणीही मर्यादितच होती. पुढे भारतात १९९१ मध्ये झालेले आíथक उदारीकरण व उदयोन्मुख मध्यमवर्ग या सगळ्यांमुळे पुढे जाऊन २००१ मध्ये टीव्हीएस व सुझुकीचे नाते संपुष्टात आले. टीव्हीएस कंपनीचे नाव टीव्हीएस मोटर झाले आणि कंपनीने आपल्या स्वत:च्या मोटरसायकल बाजारपेठेत आणण्यास सुरुवात केली. सुझुकीने मात्र भारतीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी काहीसा कालावधी घेतला. २००१ मध्ये कंपनीने सुझुकी मोटरसायकल इंडिया या उपकंपनीच्या माध्यमातून श्रीगणेशा केला.

टीव्हीएस आणि सुझुकीमध्ये असल्याचे सामंजस्यामुळे सुरुवातीस कंपनीने मोटरसायकल थेट बाजारात न आणता देशात वेगाने वाढत असलेल्या ऑटोमॅटिक स्कूटरच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी कंपनीने अ‍ॅक्सेस १२५ ही १२५ सीसी मोटरसायकल भारतात लाँच केली. अन्य दुचाकी कंपन्यांच्या ऑटोमॅटिक स्कूटर या शंभर वा ११० सीसीच्या होत्या. सुझुकीने धाडस करीत थोडी अधिक सीसीची अ‍ॅक्सेस लाँच केली. अ‍ॅक्सेस लाँच करताना बाजारपेठेतील स्पर्धकांचा अभ्यास केला होता. त्यामुळे अन्य कंपन्या ऑटोमॅटिक स्कूटरला पुढील बाजूस साधे सस्पेन्शन देत होत्या. सुझुकीने अ‍ॅक्सिसला मोटरसायकलसारखे टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले. तसेच, इंजिनची सीसी अधिक असल्याने चालविताना पॉवरही चांगली मिळत असल्याने विशेष करून सुरुवातीस पुरुष ग्राहकांकडून अ‍ॅक्सेसला अधिक मागणी नोंदली गेली. तसेच, यात कन्टिन्यूअस व्हेरेबल ट्रान्समिशन असल्याने ताशी किलोमीटर ६०-७० वेगालाही इंजिनचे व्हायब्रेशन जाणवत नाहीत. कंपनीच्या दाव्यानुसार शून्य ते साठ हा वेग ६.५६ सेकंदांत गाठते. प्रत्यक्षात ऑटोमॅटिक स्कूटर या वेगाने चालविण्यासाठी बनविण्यात आलेल्या नाहीत. शहरात म्हणजे ज्या ठिकाणी ट्रॅफिक अधिक असते अशा ठिकाणी सतत गीअर बदलण्याच्या त्रासापासून वाचविण्यासाठी आणि एक ऑटोमॅटिक दुचाकी वाहन चालविण्याचा लक्झरी अनुभव मिळण्यासाठी ऑटोमॅटिक स्कूटर बनविण्यात आल्या आहेत.

ही स्कूटर शहरात प्रति लिटर ४२.६ किमी मायलेज, तर हायवेवर ५१ मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. प्रत्यक्षात शहरात सरासरी ४० मायलेज मिळते. हायवेवर ऑटोमॅटिक स्कूटर चालविण्यासाठी कोणी घेत नाही. मात्र, तरीही मायलेजमध्ये ९-१२ टक्के सुधारणा होऊ शकते. अर्थात, यासाठी तो रस्ता, चालविण्याची सवय व इंधनाची गुणवत्ता हीदेखील महत्त्वाची आहे.

स्पर्धक स्कूटरच्या तुलनेत अ‍ॅक्सेसचे सीट मोठे व रुंद असल्याने आराम मिळतो. मोटरसायकल चालविणाऱ्यांना मात्र तो कमी वाटेल, कारण मोटरसायकलची सीट मोठी व रुंद नसते. तसेच, चाकाचा आकार व सस्पेन्शनमध्ये फरक असतो.

बाजारपेठेची मागणी लक्षात घेता अ‍ॅक्सेसमध्ये अनेक बदल केले आहेत. प्रामुख्याने म्हणजे मागील बाजूने अ‍ॅक्सेस अन्य स्कूटरच्या तुलनेत कमी आकर्षक होती. त्यामुळे स्पर्धक कंपन्यांप्रमाणे सपोर्ट बारमध्ये कंपनीने बदल केला. तसेच, पूर्ण मेटलऐवजी सेमी मेटलचा पर्याय स्वीकारला. गेल्या वर्षी लाँच झालेल्या अ‍ॅक्सेसमध्ये हेडलाइट बदलण्यात आला असून, मागील बाजूनेही रचनेत बदल करण्यात आला आहे. तसेच, नव्या तंत्रज्ञानामुळे मायलेज प्रति लिटर ६४ मिळते, असा दावा कंपनीने केला आहे. नव्या अ‍ॅक्सेसमध्ये डिस्कब्रेक, डिजिटल मीटर, क्रोम हेडलॅम्प, ऑलॉय व्हील्स, टय़ूबलेस टायर्स, फ्रंट पॉकेट, मोबाइल चाìजगसाठी डीसी सॉकेट, ऑइल चेंज आदी सुविधा दिल्या आहेत. स्पर्धक स्कूटरच्या तुलनेत कंपनीचे डिस्कब्रेक व्हर्जन स्वस्त असून, ६०,००० रुपये (एक्स-शोरूम, शहर, राज्यानुसार किमतीत बदल) १२५ सीसीची स्कूटर मिळते. त्यामुळे किंमत आणि फीचर्स, तंत्रज्ञान, आरामदायीपणा यात अ‍ॅक्सेस नक्कीच एक पाऊल पुढे आहे.

सुझुकी दुचाकीच्या बाजारपेठेत येऊन एक दशक होऊन गेले आहे. मात्र, सुझुकीची मूळ ओळख ही अ‍ॅक्सेस स्कूटरच राहिली आहे. सुझुकी हायएंड व स्पोर्ट्स मोटरसायकल बनविण्यासाठी जागतिक पातळीवर नावाजलेली कंपनी आहे. इन्टड्रर, हायाबूसा, व्ही स्टॉर्म या गाजलेली मोटरसायकल आहेत. भारतात सुझुकीने मोटरसायकलच्या बाजारपेठेत जम बसविण्यासाठी अनेक मोटरसायकल लाँच केल्या. मात्र, ग्राहकांनी कंपनीच्या दुचाकींकडे पाठच केल्याचे दिसते. कंपनीच्या जिक्सर या मोटरसायकलला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, कंपनीला मोटरसायकल उत्पादक म्हणून जिक्सर ओळखकरून देणार का, हे येणारा काळच ठरविणार आहे. त्यामुळे सध्या तरी अ‍ॅक्सेस हा सुझुकीचा विक्रीचा वेग आहे, हे नक्की.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

obhide@gmail.com