रेश्मा भुजबळ

यशस्वी होण्यासाठी आवश्यकता असते फक्त आणि फक्त खडतर कष्टाची आणि स्वत:वरील विश्वासाची. या दोन्ही गोष्टींचा मेळ घातल्यास यश तुमचेच असते. वयाच्या १७ व्या वर्षी तिरंदाजी क्रीडा प्रकारात जागतिक सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या साताऱ्याच्या शेरेवाडी या गावातील आदिती स्वामीने हेच दाखवून दिले आहे.

जर्मनीतील बर्लिन येथे नुकत्याच झालेल्या तिरंदाजीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आदिती स्वामीने विजेतेपद पटकावले. गेल्याच महिन्यात युवा जागतिक स्पर्धेत सुवर्ण पद मिळविल्यावर आदितीने वरिष्ठ गटात कम्पाऊंडच्या वैयक्तिक प्रकारातही ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले. तिरंदाजीच्या एकाच जागतिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकाविण्याची भारताची ही पहिलीच वेळ. भारतीय महिला संघाने सांघिक सुवर्णपदक मिळवले तर त्यानंतर आदितीने पहिली आणि सर्वात तरुण वैयक्तिक सुवर्णपदक विजेती होण्याचा मान मिळवला. अर्थात आदितीला हे यश सहजच मिळालेले नाही. या यशामागे आहे तिची चिकाटी आणि खडतर मेहनत.

साताऱ्याच्या शेरेवाडी या गावात राहणाऱ्या गोपीचंद स्वामी यांची आदिती ही कन्या. गोपीचंद हे सरकारी शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. त्यांना स्वत:ला खेळाची अत्यंत आवड. त्या आवडीतूनच आपल्या मुलीने एकातरी खेळात प्रावीण्य मिळवावे ही त्यांची इच्छा… आदिती १२ वर्षांची असताना गोपीचंद तिला सातारा शहरातील शाहू स्टेडियममध्ये घेऊन गेले आणि तिला विविध खेळांची ओळख करून दिली. तिथे काही मुलं फुटबॉल खेळत होती, तर काही ॲथलेटिक्सचं प्रशिक्षण घेत होती. तर एका कोपऱ्यात काहीजण लक्ष्य ठरवून धनुष्य आणि बाणांची जुळवाजुळव करत लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करत होती. अदितीचे लक्ष तिकडेच होते. तिला हा खेळ आवडल्याचे गोपीचंद यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी तिला तात्काळ तेथील प्रशिक्षण कार्यक्रमात दाखल केले. अदितीला क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी आपला मुक्काम गावातून सातारा शहरात हलवला.

आदिती लहानपणापासूनच तब्येतीने किरकोळ असल्याने तिला शारीरिक मेहनतीचे खेळ तितकेसे रुचले नाहीत. मात्र, तिरंदाजीला एकाग्रता महत्त्वाची असल्याने तिने या खेळाची निवड केली, असे तिच्या वडिलांनी सांगितले. आदिती तिच्या प्रशिक्षकांकडून म्हणजेच प्रवीण सावंत यांच्याकडून अगदी निश्चयाने घेत असलेले प्रशिक्षण पाहून त्यांना आदितीची या खेळाप्रति असणारी निष्ठा समजली. प्रवीण सावंत यांची अकदमी उसाची लागवड केल्या जाणाऱ्या शेतात होती. अकादमीमध्ये आदिती आठवड्यातील पाच दिवस तीन तास तर शनिवार-रविवारी पाच तासांपेक्षा जास्त सराव करायची. तिच्या वडिलांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती दीपिका कुमारी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अभिषेक वर्मा या तिरंदाजीतील भारताच्या यशस्वी खेळाडूंचे व्हिडिओ दाखवून तिला प्रोत्साहित केले.

आदितीने आता तिरंदाजीमध्ये बरेच प्रावीण्य मिळवले होते. एक दिवस प्रशिक्षकांनी तिच्या प्रगतीची माहिती देत तिच्या वडिलांना पुढील यशासाठी तिला स्वतःचे धनुष्य विकत घ्यावे लागेल, असे सांगितले. एका चांगल्या व्यावसायिक धनुष्याची किंमत सुमारे अडीच लाख इतकी होती तर त्यासाठी लागणाऱ्या बाणांची किंमत ५० हजार. ते तिच्या वडिलांना परवडणारे नव्हते. त्यांनी प्रथमच त्यासाठी लोकांकडे कर्ज मागितले. ज्यावेळी आदितीला स्वतःचे धनुष्य मिळाले, त्याचवेळी करोनामुळे टाळेबंदी लागू झाली. त्यामुळे आदितीला प्रशिक्षण केंद्रात जाणे अवघड झाले. त्यावर उपाय शोधत तिने घराबाहेरच्या परिसरात सराव करायचे ठरवले.

नैसर्गिक वातावरणात वाढलेले ग्रामीण भागातील खेळाडू तुलनेत शहरातील अन्य खेळाडूंपेक्षा अधिक तंदुरुस्त दिसून येतात. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आयुष्य जगत असल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या आदितीमध्ये शिकण्याची आवड आणि चिकाटीदेखील होती. आज ग्रामीण भागात क्रीडा गुणवत्ता भरभरून असली, तरी त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांची कमतरता तेवढीच प्रकर्षाने जाणवते. सरावासाठी उपलब्ध असलेल्या मर्यादित सुविधांचा आधार घेतच येथील खेळाडू आपली कारकिर्द घडवताना दिसून येतात. याला आदितीदेखील अपवाद नाही. आजही आदिती मार्गदर्शन घेत असलेल्या दृष्टी तिरंदाजी अकादमीत सुविधांची वानवाच आहे.

“ तिने खेळ सुरू केल्यापासून एकही दिवस सराव चुकवला नाही. दिवाळीच्या दिवशीही ती सकाळी दिवाळी साजरी करायची आणि दुपारपर्यंत पुन्हा प्रशिक्षणाला यायची”, अशी आठवण तिच्या प्रशिक्षकांनी सांगितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टा‌ळेबंदी उठल्यानंतर जेव्हा स्पर्धांचे आयोजन सुरू झाले तेंव्हाही तिला सहभागी होता यावे म्हणून तिच्या वडिलांना कर्ज घ्यावे लागले. तिच्या वडिलांचे अर्ध्याहून अधिक वेतन कर्ज फेडण्यात जाते. आदितीची आईही सरकारी सेवेत आहे. आदिती भारतासाठी चांगली कामगिरी करण्यास सक्षम असल्याने तिच्या खेळासाठी ती आणखी आर्थिक जुळवाजुळव करेल, असा विश्वास तिच्या वडिलांनी व्यक्त केली. वडिलांना आणि प्रशिक्षकांना असणारी खात्री तिने यशात परिवर्तित केली आहे. अजून बराच मोठा पल्ला तिला गाठायचा आहे. जिद्द आणि सातत्य असेल तर यश भेदणे मुळीच कठीण नाही, हे आदितीच्या क्रीडा प्रवासावरून दिसून येते. आर्थिक चिंतेपोटी आदितीच्या वडिलांनीही सुरुवातीलाच माघार घेतली असती तर आदितीचे हे सुवर्णयश केवळ स्वामी कुटुंबीयांपुरतेच नाही तर देशासाठीही ते मर्यादित राहिले असते. म्हणूनच सुरुवात ही करायलाच हवी. म्हणतात ना… ‘आरंभ है प्रचंड…’ हा आरंभ आहे तिच्या यशाचा… तिच्या चिकाटीचा… तिच्या जिद्दीचा…