भारतीय नौदलात नोकरी मिळणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यातही एका विशिष्ट अधिकारी पदावर नेमणूक होणे म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. इथपर्यंत येण्यासाठी अनेक तरुण-तरुणी जीवतोड मेहनत घेतात. सध्या भारतीय नौदलात महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने नौदलात विविध पदांवर महिलांची नेमणूक करण्यात येत आहे.

अलीकडेच तामिळनाडूच्या अरक्कोनम इथल्या नौदल हवाई स्टेशनवर पासिंग आऊट परेडमध्ये काही जणांना ‘गोल्डन विंग्ज’ मिळाल्या आहेत. त्यात खास गोष्ट अशी की, भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सब लेफ्टनंट अनामिका बी राजीव यांची भारतीय नौदलाची पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट म्हणून नेमणूक झाली आहे.

भारतीय नौदलात लिंग समानता, तसेच महिलांसाठी करिअरच्या नवीन संधीच्या दिशेने अनामिका यांनी नवीन पाऊल टाकले आहेत. त्यांच्या या यशामुळे महिलांना एक नवे दालन खुले झाले आहे. अनामिका यांनी नौदलातील पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी मिळवून एक नवा इतिहास रचला आहे.

हेही वाचा – वकिली ते थेट ओडिशाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, कोण आहेत प्रवती परिदा?

भारतीय नौदलाने याआधीही समुद्री सुरक्षेसाठी पाळत ठेवणाऱ्या डॉर्नियर २२८ विमानासाठी महिला वैमानिक आधीच नियुक्त केले आहेत. २०१८ मध्ये फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी एकट्याने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला बनल्या होत्या. आता सब लेफ्टनंट अनामिका या सी किंग्स, एएलएच ध्रुव, चेतक आणि एमएच -६० आर सीहॉक्स सारखी हेलिकॉप्टरं उडविणाऱ्या पहिल्याच महिला आहेत.

अनामिका यांनी आयएनएस राजाली इथल्या हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्रामध्ये हेलिकॉप्टर चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षण केंद्राला जवळपास पन्नास वर्षांहून अधिक जुना इतिहास आहे. आयएनएस राजाली हे भारतीय नौदलांसाठी एका गुरुकुलाप्रमाणे आहे. या प्रशिक्षण केंद्राने आजवर भारतीय नौदल, तटरक्षक दलातील सुमारे ८४९ जणांना प्रशिक्षण दिले आहे. अनामिका यांनीदेखील येथूनच २२ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हॉईस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सब लेफ्टनंट अनामिका यांना ‘गोल्डन विंग्ज’ प्रदान करण्यात आले.

हेही वाचा – स्त्री आरोग्य : पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेणं कितपत योग्य?

सी किंग्स, एएलएच ध्रुव, चेतक आणि एमएच -६० आर सीहॉक्स हे हेलिकॉप्टर भारतीय नौदल मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ज्यात लक्ष ठेवण्यापासून ते शोेध, बचाव कार्य, समुद्री चाच्यांविरुद्ध कारवाई करणे या बाबींचा यात समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलीकडेच नौदलाने जहाजाची पहिली महिला कमांडिंग ऑफिसर प्रेरणा देवस्थळी यांची नेमणूक केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सब लेफ्टनंट अनामिका बी राजीव यांची नौदलातील पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्ती झाल्याने भारतीय नौदल आणि अनामिका यांचा सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेचा भारतीय नौदलात हेलिकॉप्टर पायलट बनण्यापर्यंत करावा लागलेला संघर्ष हा देशातील इतर महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.