डॉ. बिपीनचंद्र भामरे
महिलांसाठी राजोनिवृत्तीचा टप्पा तसा सोपा नाही. यात त्यांना शारीरिक आणि मानसिक पातळीवर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्ल्यानुसार त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली तर रजोनिवृत्ती त्रासदायक ठरणार नाही.
रजोनिवृत्तीमुळे महिलांमध्ये अनेक शारीरिक आणि भावनिक बदल होतात हे प्रत्येकालाच माहीत आहे, परंतु सर्वात महत्त्वाचे आणि अनेकदा दुर्लक्ष केली जाणारी बाब म्हणजे हृदयाच्या आरोग्यावर होणारा त्याचा विपरीत परिणाम.
रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. मेनोपॉज दरम्यान आणि नंतर एलडीएल (खराब कोलेस्टेरॉल) वाढणे आणि एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल) कमी होते. यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक असतो, ज्यामध्ये कोरोनरी आर्टरी डिजीजसारख्या समस्यांचा समावेश होतो. मेनोपॉज हा महिलांमध्ये होणारा नैसर्गिक बदल असून जो सर्वसामान्यपणे ४५ ते ५५ वयोगटात आढळून येतो. या स्थितीत महत्त्वाचे हार्मोनल बदल होतात. इस्ट्रोजनचा स्तर कमी होऊ लागतो. इस्ट्रोजन केवळ प्रजननाचीच भूमिका निभावत नाही तर हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्याचेही काम करते. इस्ट्रोजेनची पातळी कमी होत असताना, या संप्रेरकाचा हृदयावर होणारा संरक्षणात्मक प्रभाव कमी होतो, ज्यामुळे रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना हृदयाशी संबंधित समस्यांना अधिक धोका निर्माण होतो.
लक्षणे कोणती
हॅाट फ्लॅशेस म्हणजेच अचानक छातीत, चेहर्यावर किंवा मानेजवळ गरम झळा आल्यासारखं वाटणं,
रात्रीच्या वेळी खूप घाम येणे, सतत मूड बदलणे, झोपेसंबंधी तक्रारी, योनीचा कोरडेपणा, अनियमित किंवा चुकलेली मासिक पाळी ही लक्षणे सर्वज्ञात असली तरी, रजोनिवृत्तीमुळे ऑस्टियोपोरोसिस आणि हृदयरोगासह दीर्घकालीन आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. अनेक महिलांना रजोनिवृत्तीशी संबंधित हृदयरोगाच्या समस्यांबाबत माहिती नसते.
रजोनिवृत्ती आणि हृदयरोगाचा परस्परसंबंध
रजोनिवृत्तीमुळे काही महिलांमध्ये हृदयरोगदेखील होऊ शकतो.निरोगी रक्तवाहिन्या राखण्यात आणि कोलेस्ट्रॅालची पातळी व्यवस्थापित करण्यात इस्ट्रोजेन महत्त्वाची भूमिका बजावते. रजोनिवृत्तीनंतर जेव्हा इस्ट्रोजेनची पातळी कमी होते तेव्हा एलडीएल (वाईट कोलेस्टेरॉल) पातळी वाढू शकते आणि एचडीएल (चांगले कोलेस्टेरॉल) कमी होऊ शकते, रक्तदाब वाढू शकतो, धमन्या कडक होऊ शकतात. या बदलांमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर हृदयरोगांचा धोका वाढतो. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी हृदयाशी संबधीत तपासण्या करून घेणे गरजेचे आहे तसेच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहेत. तुमचे डॉक्टर तुम्हाला दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा हृदययाशी संबंधित तपासण्या करण्याचा सल्ला देतील. तुमच्या हे कौटुंबिक हिस्ट्रीवरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. ज्या महिलांना आधीच हृदयरोग आहे आणि ज्यांना रजोनिवृत्तीचा काळ सुरू आहे त्यांनी अधिक सतर्क राहावे. या काळात महिलांनी त्यांच्या हृदयाची विशेष काळजी घ्यावी आणि निरोगी जीवनशैली अवलंबावी.
रजोनिवृत्ती दरम्यान हृदयाची घ्यावयाची काळजी
संतुलित आहार : तुमच्या आहारात तृणधान्य, फळे, भाज्या, प्रथिने आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करा. मीठ आणि प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. शक्यतो जंक फुड, तेलकट, हवाबंद डब्यातील पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन टाळा. शरीर हायड्रेटेड राखणे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पूरक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.
व्यायाम करा : आठवड्यातून पाच दिवस किमान ३० मिनिटे व्यायाम करा. धावणे, जिमला जाणे, योगा, पिलेट्स, पोहणे आणि सायकलिंग अशा पर्यायांची निवड करा.
रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीची तपासणी करून घ्या. नियमित तपासणीमुळे कोलेस्ट्रॉलचे संतुलन राखणे सकज शक्य होईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करा.
वजन नियंत्रित राखा : लठ्ठपणामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवा.
धूम्रपान टाळा आणि अल्कोहोलचे मर्यादित सेवन करा : या सवयींमुळे तुमच्या हृदयावर विपरित परिणाम होऊ शकतो.
तणावाचे व्यवस्थापन करा : तणाव कमी करण्यासाठी आणि मन शांत राहण्यासाठी योग, ध्यान किंवा प्राणायाम करा. योग्य जीवनशैलीची निवड केल्या तुम्ही तुमचे आरोग्य नीट राखू शकताा आणि रजोनिवृत्ती दरम्यान आणि नंतरही तुमचे हृदय कार्यक्षम ठेवू शकता. वरील महत्त्वाच्या टिप्सचे पालन करून तुम्ही निश्चितच तुम्ही तुमच्या हृदयाचे आरोग्य उत्तम राखू शकता.