सुंदर आणि ग्लोईंग त्वचेसाठी बटाटा अगदी उपयुक्त आहे. घरातली कामं, ऑफिसची धावपळ, बाहेर येणंजाणं या सगळ्यांमुळे आपल्या त्वचेची अगदी वाट लागते. धावपळीत पण आपल्या त्वचेकडे पुरेसं लक्षही देऊ शकत नाही. धूळ, प्रदुषणामुळे चेहऱ्यावर परिणाम होतो. त्यामुळे झोपण्याआधी चेहरा स्वच्छ कऱणं महत्त्वाचं आहे. अर्थात यासाठी दरवेळेस महागडे फेस वॉश वगैरे वापरण्याची गरज नाही. आपल्या घरात कायम असणाऱ्या बटाट्याचा यासाठी उपयोग होतो. बटाट्यामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, फॉस्फरससारखे घटक असतात. यामुळे त्वचेला पोषण मिळतं. बटाटा चेहऱ्यावरची घाण साफ करुन चेहरा स्वच्छ तर करतोच आणि चेहऱ्यावरचे डागही कमी होतात. त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचा मऊ होते. बटाट्यात azelaic acid आणि cytokine असल्याने मुरुम तयार होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे ॲक्नेची समस्याही दूर होते, असं संशोधनातून सिध्द झालं आहे. तसंच डार्क स्पॉट्स, पिग्मेंटेशन कमी होण्यासही मदत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : शांत झोप हवी आहे ? ताबडतोब बंद करा ‘या’ सवयी

बटाटा वापरून अगदी घरच्याघरी करता येणारे काही फेस पॅक आणि त्याचे उपयोग बघूया

बटाटा आणि मध
मध आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असतो, हे तुम्हाला माहिती असेलच. मधामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी इन्फेलेमटरी घटक असतात. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यात मदत होते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी बटाटा आणि मधाचा फेस पॅक गुणकारी आहे. बटाटा आणि मधामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. बटाटा किसून तो पिळून घेऊन त्याचा रस काढा. दोन ते तीन चमचे बटाट्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि काही वेळ मसाज करा. पाच मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन टाका. या पॅकमुळे त्वचा मऊ होते आणि त्वचेवर ग्लो येतो.

आणखी वाचा : घटस्फोट म्हणजे रोग नव्हे!

बटाटा आणि बेसन
डाळीचं पीठ म्हणजेच बेसन हे हजारो वर्षांपासून चेहऱ्यासाठी वापरलं जातं. डाळीचं पीठ नियमितपणे चेहऱ्याला लावल्यास डेड स्कीन आणि चेहऱ्यावरची घाण स्वच्छ होते. बटाटा आणि बेसन एकत्र करुन लावल्यास त्वचेला दुप्पट फायदा मिळतो. एका वाडग्यात दोन चमचे बेसन घ्या आणि त्यात एक चमचा बटाट्याचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. हे चांगलं एकत्र करून चेहऱ्यावर लावा. २ ते ४ मिनिटे चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. १० मिनिटांनंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या पॅकमुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होण्यास मदत होते आणि त्वचा नैसर्गिरित्या उजळते.

आणखी वाचा : भारतीय लष्करात नारी शक्ती! १०८ महिला अधिकाऱ्यांना मिळणार कर्नलपद

बटाटा आणि लिंबू
लिंबू हे चेहऱ्यासाठी नॅचरल क्लिनर आहे हे तुम्हाला माहितीच असेल. बटाटा आणि लिंबाचा रस एकत्र केल्यास त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावरची डेड स्कीन निघते आणि त्वचेतील जास्तीचं तेलही निघून जातं. दोन चमचे बटाट्याच्या रसामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुऊन टाका.

बटाटा आणि टोमॅटो
बटाटा आणि टोमॅटोची भाजी अनेकांची फेव्हरेट आहे. पण बटाटा आणि टोमॅटोच्या रसाच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यालाही खूप फायदा होतो. एक चमचा बटाट्याचा रसात एक चमचा टोमॅटोचा रस मिसळून पेस्ट करा आणि त्यात एक मोठा चमचा मध मिक्स करा. याची अगदी मऊ पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्यावर सगळीकडे सारख्या प्रमाणात लावा. थोड्यावेळाने पाण्याने चेहरा धुऊन टाका. तुम्हाला मुरुमांचा जास्त त्रास असेल तर दिवसांतून दोनदाही ही पेस्ट लावू शकता. टोमॅटो आणि बटाट्यात अँटीऑक्सिड़ंट्स भरपूर असतात.

आणखी वाचा : ‘डायन’, ‘हिटलर’… वगैरे!

बटाटा आणि तांदळाचं पीठ
तांदळाचं पीठ चेहऱ्यासाठी क्लिन्जरचं काम करतं. एक चमचा तांदळाच्या पिठात एक चमचा बटाट्याचा रस, एक चमचा मध मिसळा. तुम्हाला हवं असल्यास त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. याची दाट पेस्ट करा आणि ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. थोडा वेळ हा पॅक तसाच राहू दे. तो वाळल्यानंतर थोडं पाणी वापरून स्क्रबसारखं करा. त्यानंतर पाण्याने चेहरा धुऊन टाका. यामुळे टॅनिंग आणि डार्क स्पॉट्स कमी होतात.

आणखी वाचा : आई व्हायचंय? तर ‘या’ ५ सुपरफूडचा आहारात नक्की समावेश करा

बटाटा आणि मुलतानी माती
दोन चमचे बटाट्याच्या रसात एक चमचा मुलतानी माती आणि अर्धा चमचा गुलाबपाणी मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि १०-१५ मिनिटांसाठी तशीच राहू द्या. पॅक चांगला सुकल्यावर थंड पाण्याने धुऊन टाका. यामुळे चेहऱ्यावरील डार्क सर्कल दूर होतात, पोर्स टाईट होतात आण त्वचा चमकदार होते. बटाट्याच्या रसाने चेहऱ्याला मसाज केल्यास त्वचेवरील काळे डाग कमी होतात.बटाट्याच्या रसात अंड्याचा पांढरा भाग मिक्स केल्यास त्याने स्कीन पोर्स अधिक चांगले होतात आणि त्वचा तरुण होते.

(शब्दांकन : केतकी जोशी)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beauty tips for glowing skin use potato as face pack dark circles acne dark spots pigments vp
First published on: 28-01-2023 at 14:05 IST