अश्विनी शिंदे-पवार (कामेरी ता. वाळवा. )

माझ्या आईच्या हातची रंगीत भोगीची भाजी आणि तीळ लावलेली गरमागरम बाजरीची भाकरी म्हणजे जीभेवर अवतरलेला चवींचा स्वर्गंच जणू ! आमच्या घरी गावी भोगीच्या आदल्या दिवशी भोगीच्या भाजीची तयारी हा एक मोठा कौटुंबिक उत्सवच असायचा. आमच्या कामेरी गावचा बाजार शुक्रवारी असला तरी खास भोगीसाठी म्हणून आदल्या दिवशी ‘खास मंडई’ भरलेली असे. बाजारामध्ये विविधरंगी भाज्यांचा ताजातवाना माहौल असे .दिवाळीपासून बहरत बहरत परिसीमा गाठलेला ‘पावटा’ हे या भोगीचे खास आकर्षण ! पावट्याचा थाटच तथा राजेशाही ! देशी चनुल्या पावट्याची चव ज्यानं चाखली तो हड्डी- रस्साही विसरेल अशी त्याची महती !

husband, alcohol, wife murder husband,
पती दारू पिऊन द्यायचा त्रास, संतापलेल्या पत्नीने कोंबडी कापण्याची सुरी उचलली आणि…
Vandalism, vehicles, boy,
पुणे : अल्पवयीनाकडून मद्याच्या नशेत वाहनांची तोडफोड, महर्षीनगर भागातील घटना
Chandrapur, Brutal Ax Murder, Brutal Murder, Electric Wire Dispute, Brutal Ax Murder Over Electric Wire Dispute , murder in hadli village, Father and Son Arrested for Brutal Ax Murder, mul tehsil, chandrapur news,
चंद्रपूर : वीजतारांच्या वादात बाप-लेकाने शेजाऱ्याचे धड केले शिरावेगळे….
lpg cylinder caught fire in mauli palkhi ceremony
माउलींच्या पालखी सोहळ्यात सिलेंडरने घेतला पेट;अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात
Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi
असंख्य आजारावर रामबाण उपाय असलेल्या पावटयाच्या शेंगाची भाजी कशी करतात? ‘ही’ घ्या सोपी रेसिपी
pet dog was released after demanding money woman injured in dog attack
पुणे : थकीत पैसे मागितल्याने अंगावर पाळीव श्वान सोडले; श्वानाच्या हल्ल्यात महिला जखमी
newborn baby girl killed by father
नवजात जुळ्या मुलींचा वडिलांकडून खून; मुलाच्या हव्यासापोटी क्रूर कृत्य
why after marriage while living in family many things in nature of partner start to change
इतिश्री: लग्नानंतर घडतंय बिघडतंय कशामुळे?

आणखी वाचा : आरोग्य : थंडीत पांढरे तीळ खाल्ल्यानं स्रियांना मिळतील ‘हे’ फायदे

नुकताच बालवयातील ‘हुडपणा’ अजुनही कमी न झालेला हरभरा … त्याचा मान या पावट्यानंतर! पण ‘शेराची बुत्ती अन् तेगार किती!’ अशा म्हणीप्रमाणं हरभऱ्याची पेंडी दिसली केवढीही मोठी तरी त्यातून वेचुन वेचुन घाटे काढणे आणि ते घाटे सोलून त्याचे हरभरे काढणे हे तसे जिकीरीचेच! पण त्या हरभऱ्याच्या पानांच्या आंबुसपणाची चव नंतर बोटे चाखत चाखत आंबट होणाऱ्या तोंडात रेंगाळताना जी मजा होती, त्यासाठी वाट्टेल ती जिकीरी सोसायला आम्ही सदैव तत्पर असायचो! पावट्या- हरभऱ्यानंतर प्रौढ वाटाणा भरीस भर करायला तयारच असे. सदा-सर्वदा मिळणारी जांभळी काटेरी ‘खारातली’ वांगी अप्रतिम चवीची, म्हणूनच नखरेल किती ! पातळ आमटीसाठीच्या साहित्यात या भाज्यांचे अग्रस्थान तर भोगीच्या सुक्या भाजीसाठी म्हणून घेवडा, वाल,अडीचमासा (अडीच महिन्यात येतात म्हणून अडीचमासा शेंगा) वांगे, बटाटा, तुरी कांद्याची कोवळी पात, लसुणाची शेलाटी नाजुक बांध्याची पात, मेथी, गाजराचे तुकडे, आख्खे शेंगदाणे यांची रेलचेल असायची. या सगळ्या भाज्यांना सामावून घेणारा चाकवत मला एखाद्या धीरगंभीर कुटुंब प्रमुखासारखा वाटतो नेहमीच! चाकवताच्या पानांच गरगटं हाच हा कुटुंबाचा आधार!

आणखी वाचा : आरोग्य : प्रदूषणावर अत्यंत गुणकारी- तुळस

भोगीच्या आदल्या रात्री सर्व कामे आवरून झाली की या सर्व भाज्यांची निवडा-निवडी, सोलणं या कामांची अक्षरश: लगबग सुरू असायची. ती भाजी बनवताना या कामी प्रत्येकाचे हात गुंतलेले असायचे. अगदी आळशीपणा करणारी पोरं काही नाही तरी दोन घाटे सोलून त्यातले सोललेले चार दाणे तरी तोंडात टाकणारच! मग इतक्या प्रयत्नाने सोललेले ते हरभऱ्याचे इवले-इवले दाणे उगाचंच आपल्याकडे रागाने बघत आहेत की काय ,असा भास व्हायचा! फ्लॉवर, कोबी, वांगी, बटाटा अशा भाज्या चिरणे वगैरे कामे प्रत्यक्ष भोगी दिवशीच पार पडत! जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश त्यात व्हावा म्हणून आपल्याकडे असणाऱ्या भाज्यांची अदलाबदली सुद्धा शेजारणींकडे होत असे. या ‘बार्टर’ नंतर एका मोठ्या परातीमध्ये ह्या सर्व भाज्या पालेभाज्या, सोलाणे सर्व काही नीट मांडून ठेवलेले पाहताना त्या भाज्या फोडणीत जाण्याआधीच तशाच नजरेने खाऊन घेतलेल्या असायच्या, इतके ते जीव्हासुखद चित्र असे.

आणखी वाचा : आहारवेद : पिष्टमय पदार्थांचे चरबीतील रूपांतर थांबविणारा कोबी

प्रत्यक्ष फोडणीवेळी कडकडीत तापलेले तेल मनातल्या संयमाची उकळी फोडत असे. आमटी छान चमचमीत आणि एकदम झणझणीत व्हावी म्हणून नकळत चमचाभर तेल आईने जादाच घातलेले असे… या कडकडीत तापलेल्या यज्ञकुंडामध्ये हळूहळू एक-एक समिधा अर्पण होते-होत… तर्रीदार आमटीसाठी त्यात चटणी (कांदा-लसुण मसाला) हळद टाकून त्यात गरम पाणी ओतले की जरा चुलीचा जाळ मोठा करायचा. शेंगदाण्याचे कूट, आख्खे शेंगदाणे त्यात टाकले की खमंग भाजलेले तीळ वाटून त्या आमटीमध्ये टाकले की ती आहुती सफळ संपूर्ण व्हायची! अशा मस्त तर्रीदार आमटी मध्ये कितीदाही डोकावून पाहिले तरी मन भरते नसे. मला शक्य असते तर मी त्यात डुंबूनही जावे, असं उगाचंच तेव्हा माझ्या बालमनाला वाटत असे.

आणखी वाचा : आहारवेद : गर्भवतींसाठी उत्तम- दुधी भोपळा

घरभर झणझणीत फोडणीचा गंध घुमत असताना ही आमटी आता चुलीच्या वैलावर ‘शिफ्ट’ व्हायची. मग भोगीची आमटी शिजेपर्यंत बाजरीच्या भाकरीचा घाट घातला जाई. मीठ घालून केलेली, तीळ लावून खरपूस भाजलेली बाजरीची भाकरी खाताना इतर वेळी बेचव लागणारी ज्वारीची भाकरी मनातून अगदी हद्दपारच व्हायची! बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी तयार झाली की, आमच्या पंगती पडायच्या, मोठ्या वाडग्यात घेतलेल्या चमचमीत भोगीच्या भाजीतील भाज्या जीभेवर ओळखत ओळखत आम्ही त्या स्वर्गानंदात डुंबून जात असू. कितीही खाल्ले तरी पोट भरे पण मन काही भरत नसे. भोगीच्या भाजीसाठी हावरट असलेले आम्ही आजही कित्येक वर्षांनी जानेवारी आला रे आला त्या सुखद चविष्ट क्षणांचा सफर आधी मनानेच करून घेतो. केवळ नशिबवानांच्या पदरी हे चवदार सुख पडते. प्रत्येक गावकऱ्यांच्या हिरव्या समृद्धीचं प्रतिक असणारा हा ‘मिक्स व्हेज’ मेन्यू भल्याभल्या हॉटेलमध्येही मिळणार नाही. आजही दरवर्षी आईच्या हातची भोगीची भाजी खाण्यासाठी मी कुठेही असले तरी गावी घरी जातेच जाते. ‘खाण्यासाठी जन्म आपुला’ या उक्तीची प्रचिती या दरम्यान मी कित्येकदा घेतली आहे. हे ‘रसना सुख’ अनुभवण्यासाठी आपणही उत्सुक असालच! तर सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा !
ashwinishinde247@gmail.com