छाया पाटील
मुलींना पारंपरिक जुने खेळ, गाणी माहीत व्हावीत म्हणून मी गेल्या दहावर्षांपासून भुलाबाईची स्थापना करते आहे. भुलाबाईची मूर्ती मुंबईला मिळत नसल्यानं मी गावाकडून मागवते. लहान असताना आम्ही सर्व मैत्रिणी संध्याकाळच्या वेळेस एकत्र येऊन टिपऱ्या खेळून गाणी म्हणायचो. खाऊ जिंकायचो, खूप मज्जा करायचो. तीच अनुभूती नव्या पिढीतील मुलींना देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे नवीन मुलींही भुलाबाईचा सण कधी येईल याची आतुरतेने वाट पाहत असतात. त्या निमित्ताने त्या मुली रोज एकत्र येतात, हसतात, बोलतात, टिपऱ्या खेळून गाणी म्हणतात. एकूण काय तर एकमेकींमधील संवाद वाढतो. आमच्या सोसायटीतल्या सर्व मुली फक्त खानदेशातील नसून वेगवेगळ्या गावच्या, प्रदेशातील आहेत. तरीसुद्धा त्यांची भुलाबाईची सर्व गाणी पाठ झाली आहेत. शेवटी खाऊ काय असेल, तो जिंकण्याचा त्यांना जास्त आनंद वाटत असतो.

भुलाबाई म्हणजे खानदेशातील मुलींचा आवडता सण. भुलाबाई हा सण भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमा कोजागिरी पर्यंत असतो. भुलोजी आणि भुलाबाईची छोटीशा मातीच्या मूर्तीची अगदी साध्या पद्धतीनं स्थापना केली जाते.

भुलाबाई म्हणजे पार्वतीचे रूप आणि भुलोजी म्हणजे शंकराचे रूप मानले जाते. एका आख्यायिकेनुसार, शंकराने पार्वतीकडून सारीपाटाच्या खेळात सर्व काही हरल्यानंतर शंकर कैलास सोडून रुसून निघून गेला. शंकराला परत आणण्यासाठी पार्वतीने भिल्लीणीचं रूप घेऊन त्याच्या समोर नृत्य करून शंकराला प्रसन्न केलं. पार्वतीचं ते रूप पाहून शंकर पार्वतीवर भुलला म्हणून भुलाबाई नाव पडलं. यांना आमच्या खानदेशात भूलोजी भुलाबाई तर विदर्भात गुलोजी गुलाबाई असं म्हटलं जातं. या सणाला कोकणात भोंडला तर कोल्हापूरकडे हादगा असं नाव आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रभर हा सण वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतीनं साजरा केला जातो.

मुलींना पारंपरिक जुने खेळ, गाणी माहीत व्हावीत म्हणून मी गेल्या दहावर्षांपासून भुलाबाईची स्थापना करते आहे. भुलाबाईची मूर्ती मुंबईला मिळत नसल्यानं मी गावाकडून ती मागवते. लहान असताना आम्ही सर्व मैत्रिणी संध्याकाळच्या वेळेस एकत्र येऊन टिपऱ्या खेळून गाणी म्हणायचो. खाऊ जिंकायचो, खूप मज्जा करायचो. तीच अनुभूती नव्या पिढीतील मुलींना देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे नवीन मुलींही भुलाबाईचा सण कधी येईल याची आतुरतेने वाट पाहत असतात. त्या निमित्ताने त्या मुली रोज एकत्र येतात, हसतात, बोलतात, टिपऱ्या खेळून गाणी म्हणतात. एकूण काय तर एकमेकींमधील संवाद वाढतो. आमच्या सोसायटीतल्या सर्व मुली फक्त खानदेशातील नसून वेगवेगळ्या गावच्या, प्रदेशातील आहेत. तरीसुद्धा त्यांची भुलाबाईची सर्व गाणी पाठ झाली आहेत. शेवटी खाऊ काय असेल, तो जिंकण्याचा त्यांना जास्त आनंद वाटत असतो.

या कार्यक्रमात मी माझ्या मंगळागौरीच्या भजनी मंडळीच्या व भिशीच्या मैत्रिणींनाही बोलावते. त्यांतील काही खानदेशातील आहेत. त्यांना त्यावेळी त्यांचे बालपण आठवतं. त्यामुळे त्याही या सणात समरसून जातात. भुलाबाईच्या गाण्यात विविध गोष्टी येतात. रोजच्या जीवनातले अनुभव सांगणारी ही गाणी आहेत.

जसे – “पहिली ग भुलाबाई
देवा देवा साथ दे
साथीला खंडोबा
खेळी खेळी मंडोबा…”

किंवा

”अडकित जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता बदाम
भुलाबाईला मुलगा झाला नाव ठेवा सुदाम
अडकित जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होती बशी
भुलाबाईला मुलगी झाली नाव ठेवा काशी… ”

“आटावरच्या पाटावर धोबी धुणं धुतो
भुलाबाईच्या साडीला गुलाबी रंग देतो
आटावरच्या पाटावर धोबी धुणं धुतो
भुलाबाईच्या चोळीला लाल रंग देतो”

अशा प्रकारे भोलोजींच्या कपड्यांच्या रंगाचं वर्णन करत गाणं पुढे वाढतं. म्हणण्याची पद्धत आहे. भुलाबाई माहेरी आलेली आहे आणि ती आपल्या सासरच्या कुरापती सांगत आहे अशी कल्पनाकरूनही गाणी म्हंटली जातात.

“ भुलाबाई भुलाबाई सासरे कसे सासरे कसे
झाडावर बसलेले माकड जसे माकड जसे
भुलाबाई भुलाबाई सासू कशी सासू कशी
झाडावर बसलेली घुबड जशी घुबड जशी…”

अशी विविध गाणी म्हणून झाल्यावर ‘‘आज आमच्या भुलाबाईचा खाऊच काय? खाऊच काय? जिंकला नाही तर देऊच काय देउच काय?’’ हे गाणं म्हणून खाऊ जिंकून खेळाची सांगता होते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चांदण्या रात्रीत भुलाबाईची मूर्ती आणून तिची पूजा करून रात्रभर जागरण करण्याची प्रथा आहे. टिपऱ्या खेळून गाणी म्हणून दुधाचा नैवेद्य दाखवत या सणाची सांगता केली जाते.

अशाप्रकारे दरवर्षी भुलाबाईचा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करते. त्यानिमित्ताने आम्हा मैत्रिणींमध्ये संवाद होतो. एकमेकांची दु:खं-सुख यांचा देवाणघेवाण होते.