सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होणं आता पूर्वीच्या तुलनेत बरंच सोप्पं झालंय. इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या समाज माध्यमांवर फोटो शेअर करणं आज सामान्य गोष्ट आहे. पण अनेकदा या माध्यमांवर महिलांना त्यांच्या दिसण्यावरून हिणवलं जातं. अगदी सामान्य स्त्रियांपासून ते मराठी अभिनेत्रीच नव्हे तर अगदी बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही त्यांच्या वाढलेल्या किंवा कमी असलेल्या वजनावर, शरीरच्या ठेवणीवरून ट्रोल करण्यात आल्याची बरीच उदाहरणं आहेत. पूर्वी याबद्दल बोलताना बिचकणाऱ्या अभिनेत्री किंवा स्त्रिया आता मात्र बेधडकपणे बोलू लागल्या आहेत. यात स्पृहा जोशी, अनन्या पांडे, सोनाली बेंद्रे यांसारख्या अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. अभिनेत्री करीना कपूरमुळे बॉलिवूडमध्ये 'झिरो फिगर'चा ट्रेण्ड आला. अनेकांनी त्यावेळी तो ट्रेण्ड फॉलोही केला. अगदी अभिनेत्रींपासून ते सामान्य स्त्रियांपर्यंत सगळ्यांनाच त्याचं आकर्षण होतं. आपणही करीनासारखं फीट दिसावं असं कितीही वाटलं तरी स्रियांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या कारणांनी बदल होत असतात, हे ध्यानात घ्यावं लागतं. मात्र हे बदल समाजाकडून सहजासहजी स्वीकारले जात नाहीत. एखाद्या अभिनेत्रीचं वजन थोडं जरी वाढलं तरी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. वाढलेल्या वजनामुळे तिच्यावर टीका केली जाते. पण यासोबतच सामान्य स्त्रियांना देखील त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे वेगवेगळे सल्ले दिले जातात. अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात काही महिला आरोग्यही बिघडवून घेतात. डाएटच्या नावाखाली जेवण कमी करणं आणि त्यामुळे येणाऱ्या इतर शारीरिक समस्या यामुळे आरोग्य बिघडतं. गेल्या काही वर्षांत महिलांसोबत होणारा बॉडी शेमिंगचा प्रकार प्रचंड वाढला आहे. आता अनेकांचं असं मत असेल की वाढतं वजन, बेढब शरीर या गोष्टींमुळेच बॉडी शेमिंग होतं का? तर अर्थातच नाही, अशा अनेक मुलींना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतोय ज्यांचं वजन फारसं नाही. जाड असलेल्या मुलींच्या स्वतःच्या वेगळ्या समस्या आहेत यात दुमत नाही पण बारीक असणाऱ्या मुलींचं चित्रही फारसं काही वेगळं नाही. अगं बाई, एवढी मोठी आहेस तू? दिसत तर नाहीस. कसं गं होणार तुझं? लग्न कसं होईल अशानं? वजन वाढव की आता जरा लग्नाचं वय होत आलं. असे सल्ले बारीक असणाऱ्या मुलींनाही सातत्याने ऐकावे लागतात. मुळात मुलींनी कसं दिसावं किंवा केवढं जाड किंवा बारीक असावं हे ठरवलं कोणी? हे मापदंड कुठे लिहून ठेवले आहेत आणि लग्नासाठी मुलीनं असंच असलं पाहिजे हा अट्टहास का? अशा प्रकारचे सल्ले हेसुद्धा एक प्रकारचं बॉडी शेमिंगच आहे. कारण अनेकदा लोकांच्या अशा प्रतिक्रिया सातत्यानं ऐकून अनेक मुलींना स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. अनेकदा एखाद्याच्या दिसण्यावरून मजेत कमेंट केली जाते; ती व्यक्तीसुद्धा मस्करी आहे असं समजून विषय तिथेच संपवते. पण जेव्हा हे सातत्यानं होतं, तेव्हा कुठेतरी त्यांना स्वतःची लाज वाटू लागते. आपण परफेक्ट नाही असं वाटू लागतं. अनेकांचं आपल्या दिसण्यावरून हसणं किंवा खिल्ली उडवणं मनाला त्रासदायक वाटू लागतं आणि मग ती व्यक्ती मानसिक तणावाखाली येते. जे कधी कधी पुढे जाऊन घातक ठरू शकतं. अर्थात हे सर्वांच्याच बाबतीत लागू होतं. व्यक्ती जाड असो वा बारीक त्याच्या शरीराच्या आकारावरून टिप्पणी करणं ही गोष्ट चुकीचीच आहे. बॉडी शेमिंगबाबत काही अभिनेत्रींनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. तसेच यावर स्वतःची मतंही मांडली आहेत. स्पृहा जोशीछोट्या पडद्यावरील उत्तम अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पृहालाही बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. याबद्दल खुद्द स्पृहानेच फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. स्पृहाला 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमानंतर दिसण्यावरून बरंच ट्रोल केलं गेलं होतं. 'किती जाड झालीये' 'ही कसली हिरोईन', 'किती बेढब शरीर', 'मराठीत काही अवेअरनेसच नाही', इथपासून ते एका दिग्दर्शकाने तर कर्णोपकर्णी ती प्रेग्नंट असल्याचं कळल्यामुळे अनेक निर्माते दिग्दर्शकांनी तिला चित्रपटात काम द्यायचं नाही असं ठरवल्याची बातमी तिच्या कानावर घातली होती. मात्र स्पृहाने या सर्व टीकेकडे दुर्लक्ष करत कलाविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोनाली बेंद्रेअगदी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत कॅन्सरवर मात केलेली प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेनंही ९० च्या दशकात तिला कशाप्रकारे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला याचा खुलासा केला होता. "९० च्या दशकात सडपातळ असणाऱ्या अभिनेत्रींना किंवा मुलींना सुंदर म्हटलं जात नव्हतं. मला अनेकदा माझ्या सडपातळ शरीरयष्टीवरून हिणवलं जायचं. कारण त्या काळात बारीक असणं ही सौंदर्याची व्याख्या नव्हती.” असं सोनालीनं या मुलाखतीत सांगितलं. बॉडी शेमिंगबद्दल सोनाली म्हणते, “मी बारीक होते त्यामुळे, 'तू कर्व्ही नाहीस म्हणून तू सुंदर नाहीस' असंही बोललं जायचं. आजही समाजात बॉडी शेमिंग होताना दिसतं पण हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. विशेषतः लहान वयातील मुली आजकाल डाएटिंग करताना दिसतात. पण हे त्यांच्यासाठी चांगलं नाही.” अनन्या पांडेअनन्या पांडे ही बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे फोटो, फॅशन सेन्स आणि स्टाइलची अनेकदा चर्चा होते. पण अनन्यालाही बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागलं आहे. एका मुलाखतीत तिने, बॉडी शेमिंग आणि इंडस्ट्रीमध्ये काम करताना ब्रेस्ट सर्जरीचा सल्ला मिळाल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. अनन्या पांडे म्हणाली, “लोकांनी मला चेहरा आणि बॉडीसोबतच ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला. माझ्यासाठी हे खूप वेदनादायी होतं. मी काम करायला सुरुवात केली त्यावेळी लोकांनी मला फार विचित्र सल्ले दिले. त्यांच्यासाठी असं बोलणं ही फारच सामान्य गोष्ट होती. अर्थात मला असं काही थेट सांगण्यात आलं नाही पण त्यांच्या बोलण्यातला अर्थ मला समजत असे. ते सांगायचे तुला वजन वाढवण्याची गरज आहे. सर्वात वाईट गोष्ट ही होती की लोक माझ्या शरीरावरून माझ्याबद्दल मतं व्यक्त करायचे.” आज बॉडी शेमिंगबद्दल उघडपणे बोललं जात असलं तरी समाजात हा प्रकार बंद होण्यासाठी आणखी काही वर्षे जावी लागतील. पण दुसऱ्या कोणाला आपल्या दिसण्याबाबत काय वाटतं याचं दुःख करत बसण्यापेक्षा स्वतःला स्वतःबद्दल काय माहीत आहे आणि काय वाटतं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जे खिल्ली उडवतात त्यांचा विचार करून आपलं मानसिक आरोग्य बिघडवण्यापेक्षा जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. तुम्हीच स्वतःला जसे आहात तसे स्वीकारलं नाही तर मग इतर लोक का बरं स्वीकारतील? अर्थात काही लोकांना दुसऱ्यांचा कमीपणा दाखवून त्यातून आनंद घ्यायची सवय असते. पण अशा लोकांचा विचार करणंच सोडून द्यायला हवं. कारण शेवटी, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना… छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना…