या वर्षी पावसाने धुवांधार खेळी केली आणि अजिबात मागे वळून न बघता निरोपाचे चार शब्दही न उच्चारता तो निघून गेला. वसाच्या जाण्याचा विचार करेपर्यंत हिवाळ्यातली थंड सकाळ उजाडलीसुद्धा. आता घाई करायला हवी, कारण या ऋतूत बागेचा नूर काही वेगळाच असतो. पावसाच्या पाण्यात सचैल न्हालेल्या झाडांना आता विश्रांती हवी असते. इथून पुढे हंगामी फुलझाडांचं राज्य सुरू होणार असतं.

तेव्हा विश्रांती घेत असलेले कंद हुडकून काढून त्यांना लावायला कुंड्या तयार केल्या. आता खऱ्या अर्थाने फुलांचा रंगोत्सव सुरू होईल. लिलीचे कंद तरारून उठतील, त्यांची रूंद तजेलदार फुलं त्यावर असलेल्या नाजूक रेषा आणि एखाद्या घंटे सारखा असणारा त्यांचा आकार, अगदी बघत रहावा असा. सिक्कीमला जशी अनेकविध ऑर्किड्स बघायला मिळाली होती तशीच आणि तितक्याच रंगाकारात लिलिही पाहायला मिळाली होती. लिलींचे इतके प्रकार या आधी मी कधी पाहिले नव्हते.

नाजूक साजूक निशिगंधाला, कोंब फुटायचे दिवसही हेच. आत्तापर्यंत लांब लांब पात्यासारख्या पानांनी सजलेला निशिगंध आता कुठे जागा होऊ लागेल. एकदोन हिरवे गच्च दांडे डोकं वर काढतील आणि बघता बघता नाजूक मण्यांसारख्या कळ्या डोकावतील. अवघी बाग सुगंधाने भरून टाकण्याचं ते एक गोड आश्वासनं असेल. पावसाच्या चारपाच दिवसाच्या विश्रांतीतच शेवंतीला पानांचा बहर यायला सुरुवात झाली आहे, थोड्याच दिवसांत पिवळ्या फुलांनी अख्खी शेवंती बहरून जाईल. डेलिया, गुलछडी यांच्या फुलण्याचे दिवसही हेचं. पावसाळ्यात फुलणारा सोनटक्का याही दिवसांत बहरेल. आजकाल पांढऱ्या सोनटक्क्याच्या जोडीला पिवळ्या आणि हलक्या गुलाबी रंगाची सोनचाफ्याची फुलंही बघायला मिळतात. ती पांढऱ्या इतकी सतेज वाटतं नसली तरीही सुरेखच दिसतात. स्पायडर लिलीची मोठी रूंद फुलं तिच्या पाकळ्यांना जोडणारे नाजूक पदर आणि लिली मध्ये क्वचित आढळणारा गोडसर सुगंध अनुभवायचा असेल तर स्पायडर लिली अगदी जवळून न्याहाळायला हवी. आजकाल रस्ते किंवा महामार्ग विभाजित करणाऱ्या जागांमध्ये ज्या बागा बनवल्या गेल्या आहेत, त्यात स्पायडर लिली आणि बोगनवेल, जोडीला अकालिफा यांची झाडं हटकून दिसतील. काही ठिकाणी एक्झोरासुद्धा बघायला मिळेल.

मध्यंतरी एका वस्त्र प्रदर्शनाला गेले होते. हाती भरतकाम केलेले अनेक नमुने तिथे बघायला मिळाले. त्यात साड्या, ड्रेस,बेडशीट अशी खूप विविधता होती, तिथे एक तलम साडी होती- जिच्यावर अगदी दोनच एक्झोराचे गुच्छ होते. इतकं नाजूक भरतकाम होतं की नजर हलत नव्हती. एरवी कधी एक्झोरा मला इतका सुंदर वाटला नव्हता. त्यांची तेलकट थरांची जाडसर गडद हिरवी पानं काहीशी विजोड वाटायची. मिनी एक्झोरा त्यातल्या त्यात ठीक वाटतो, पण अनेक रंगात असूनही हे फूल मला कधी विशेष दखल घ्यावं असं वाटलं नव्हतं. त्या सुंदर भरतकामाला निरखताना वाटलं, निसर्गातील प्रत्येक घटकाची निर्मिती ही सहेतूक आणि सौंदर्य पूर्ण असते. आपली समज आणि नजर दोन्ही ही कमी पडते.

हिवाळ्यात कंदवर्गीय झाडांना भरभरून फुलं येतात. यात जरबेरा, डेलिया यांची फुलं विशेष सुंदर दिसतात. त्यामुळे फार पसारा न करता अगदी आटोपशीर बाग तयार करायची असेल तर कंदवर्गीय फुलं झाडं निवडावीत. हिवाळ्यात भाज्यांचा अगदी जोमाने वाढतात. मटाराचे हिरवे तुरे, अंबाडीची राजस फुलं, कोथिंबीर आणि पुदिन्याची गर्द हिरवी रोपं. टोमॅटोचा गडद रंग, मिरच्यांचा तिखट गंध. बाग जणू काही रंग-गंधाचा उत्सव साजरा करत असते. बागेचं असं लोभस रूप मनात आणि डोळ्यात साठवताना हिवाळा सरूच नये असं वाटतं.

mythreye.kjkelkar@gmail.com