अपर्णा देशपांडे

क्षिप्रा एका मोठ्या कंपनीत प्रोजेक्ट हेड होती. तिच्या ग्रुपमधले सगळे तिच्यावर खुश होते, कारण सगळ्यांना सोबत घेऊन, प्रेमाने वागवून तर कधी रागावून काम करवून घेणं तिला उत्तम जमत असे. तिची टेक्निकल बाजू भक्कम होती, त्यामुळे कुठलीही प्रोजेक्टस् वेळेत पूर्ण करणं तिला जमत असे. असं असूनही तिचे वरिष्ठ अधिकारी काही ठिकाणी तिला टीममध्ये घेत नसत. म्हणजे त्यांच्या परदेशातील शाखेतील लोक आले किंवा कंपनीच्या मोठ्या पदावरील अधिकारी असले की प्रेझेंटेशन द्यायला किंवा मीटिंगमध्ये बऱ्याचदा तिला डावललं जात असे. कारण काय तर ती रंगाने बरीच सावळी, उंचीला कमी आणि सौंदर्याच्या ‘सो कॉल्ड’ व्याख्येत बसणारी नव्हती.

तिच्याच टीममधील एक दोन जणही तिच्या माघारी तिची टिंगल करत. चार लोकांत टोपण नाव घेऊन तिची खिल्ली उडवत. हे सगळं अर्थातच तिच्या लक्षात आलं होतं. आपल्या वरिष्ठांना तिनं सरळ सरळ विचारलं होतं. “तुम्हाला माझे कौशल्य आणि व्यवस्थापन क्षमता वापरून घ्यायचं आहे, पण माझा अधिकार मला द्यायचा नाही. हे का?” तेव्हा तिचे व्ही .पी म्हणाले होते, “परदेशी व्यावसायिकांना सामोरं जाताना एक विशिष्ठ प्रोटोकॉल पाळावा लागतो मॅडम. तिथे सगळं कसं ‘प्रेझेंटेबल’ हवं ना.” त्यांचा निर्देश तिच्या रंग रूपाकडे आहे हे तिच्या लक्षात आलं.

हेही वाचा… मुंबई उच्च न्यायालय म्हणते…मुलीचा थोड्याच वेळा पाठलाग आणि शिवीगाळ हा गुन्हा नाही

लहानपणापासूनच तिला अशा टोमण्यांची सवय झाली असली तरी आतून ती भयंकर संतापली होती. ‘वरलीया रंगा’ भुलणाऱ्या लोकांची खरं तर तिला कीवच यायची, पण ती शांत होती कारण तिच्या आईनं तिला सांगितलं होतं, “क्षिप्रा, ईश्वराने प्रत्येकात वेगवेगळ्या क्षमता दिल्या आहेत. ज्याला त्या नीट ओळखून वापरता आल्या तो शहाणा. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण माणूस म्हणून कसे आहोत हे आणि हेच महत्त्वाचं. तुझ्या मैत्रिणीची सोनिया काकू गोरी पान आणि फारच सुंदर म्हणून काकांनी लग्न केलं. किती प्रचंड भांडकुदळ आहे बघतेस ना तू? सगळ्या कुटुंबाला हैराण करून सोडलय. माणूस म्हणून किती कुरूप आहे ती. असं सौंदर्य काय कामाचं? राहण्यात नीटनेटकेपणा आणि गोडवा असावा, त्यात खरं सौंदर्य आहे. बाकी रंगाचं म्हणशील तर निसर्गात अनेक रंग आहेत. तसे पृथ्वीवर अनेक रंगाचे लोक देखील आहेतच. कोणता रंग श्रेष्ठ हे कोण ठरवणार? काळा रंग नसता तर गोऱ्या रंगाचं वेगळं अस्तित्व राहिलं असतं का?अंधार नसता तर प्रकाशाची किंमत राहिलीच नसती. सगळ्या उच्च बुद्धिमत्तेच्या महान व्यक्तींना आठव. कधी त्यांचं ‘दिसणं’ डोळ्यासमोर येतं का? ते ओळखले जातात त्यांच्या अफाट कर्तृत्वाने!” आईचं हे सांगणं तिनं कायम लक्षात ठेवलं. ती सर्वच ठिकाणी कायम आत्मविश्वासाने वावरली, आपल्या अधिकाराची, कर्तृत्वाची जाणीव वरिष्ठांना लवकरच योग्य पद्धतीने होईलच हे तिला माहीत होतं. तोपर्यंत तिनं शांत राहायचं ठरवलं. संधी येणारच याची तिला खात्री होती.

हेही वाचा… नातेसंबंध: ‘दाखवण्याचा’ कार्यक्रम आहे?

अचानक एकदा त्यांचं सॉफ्टवेअर नीट काम करेनासं झालं. सिस्टीम बंद पडली. प्रचंड गोंधळ माजला. भले भले कामाला लागले. कंपनीचं नाव खराब होण्याची वेळ आली. त्यावेळी सगळ्यांना क्षिप्राची आठवण झाली. तिनं विश्वास दिला, की ती ही अडचण सोडवू शकते, मग तिला खास सोय करून परदेशात पाठवण्यात आलं. तिनं दोन दिवसातच ती प्रणाली सुरू करून तर दिलीच, शिवाय अधिक सिक्युरिटी प्रदान करून दिली. तिचं तोंडभरून कौतुक झालं. तिची बढती झाली. आता वरिष्ठांना तिचं मीटिंगमध्ये असणं गरजेचं वाटतं. तथाकथित सौंदर्यापेक्षा तिच्या कर्तृत्वाची झळाळी मोठी ठरली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

adaparnadeshpande@gmail.com