डॉ. सुनील कुट्टी, न्यूरोसर्जन
महिलांमध्ये आढळणाऱ्या न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये मायग्रेन, अपस्मार (एपिलेप्सी), मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रोक, पार्किन्सन, अल्झायमर आणि न्यूरोपॅथी सारख्या विकारांचा समावेश आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, सुन्नपणा, स्मरणशक्ती कमकुवत होणे, थकवा किंवा दृष्टी कमी होणे अशी सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात.
मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास मज्जातंतूचे कायमचे नुकसान होते, तसेच स्मरणशक्ती गमावणे, अपंगत्व किंवा जीवघेण्या स्ट्रोकचा सामना करावा लागू शकतो. अचानक अंधुक दिसणे किंवा दृष्टीतील बदल हे मायग्रेन, मधुमेह किंवा मेंदूच्या ट्यूमरशी संबंधित असू शकतात. कधीकधी ते ऑप्टिक नर्व्हचे नुकसानदेखील दर्शवते. जर तुम्हाला सतत अंधुक दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तणाव किंवा हार्मोनल बदलांमुळे महिलांना न्युरोलॅाजिकल विकारांचा सामना करावा लागतो व बऱ्याचदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने निदानास विलंब होतो. वारंवार होणारी डोकेदुखी, अचानक येणारा अशक्तपणा किंवा बोलताना अडखळणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते. सध्या ६० टक्के महिलांना मेंदूशी संबंधित समस्या भेडसावत आहेत.
दरमहा २५ ते ७५ वयोगटातील १० पैकी ६ महिलांना न्यूरोलॉजिकल विकारांचा सामना करत असल्याचे दिसून येते. १० पैकी ३ महिलांना मायग्रेन तर २ महिलांना अपस्मार व एका महिलेला स्ट्रोकचा धोका असल्याचे आढळून येते.
प्रगत इमेजिंग तंत्र, मिनीमली इव्हेसिव्ह न्यूरोसर्जरी, औषधोपचार, फिजिओथेरपी आणि डीप ब्रेन स्टिम्युलेशनसारख्या आधुनिक तंत्रांमुळे महिलांना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता परत मिळवण्यास मदत होते.
न्यूरोलॉजिकल विकार टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्सचे पालन करा –
- १. नियमित वैद्यकीय तपासणी- डोकेदुखी, जाणवणारा सुन्नपणा, स्मरणशक्ती कमी होत असल्याचे दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- २. संतुलित आहार- ओमेगा-३, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त आहाराचे सेवन करा. फास्ट फूड, शर्करायुक्त पदार्थांचे सेवन करा.
- ३. नियमित व्यायाम- योग, चालणे, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम मेंदूच्या रक्ताभिसरणाला सुधारण्यास मदत करतो.
- ४. तणावाचे व्यवस्थापन- ध्यान, प्राणायाम किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम करा.
- ५. पुरेशी झोप घ्या- दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या.
- ६. धूम्रपान व मद्यपान टाळा
- ७. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधांचे सेवन करा. स्वतःच्या मर्जीने औषधोपचार करू नका.
- ८. लक्षणांवर दुर्लक्ष करु नका- वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे, हात-पाय सुन्न पडणे किंवा बोलताना अडखळणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या.
न्यूरोलॉजिकल डिस्ऑर्डर हा आजार लगेच बरा होत नाही. परंतु रुग्णाची काळजी घेतल्यास रूग्ण बराच काळ निरोगी राहू शकतो. गंभीर गुंतागुंत असल्यास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला न्युरो सर्जन देतात. या आजारात घाबरून जाऊ नये. उलट रुग्णाला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होऊ शकतो व रुग्णाची मानसिक स्थिती सुधारते आणि त्याच्या उपचार प्रक्रियेत सुधारणा दिसून येते.
याशिवाय, योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणाव व्यवस्थापन, औषधांचा योग्य वापर आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी केल्यास रुग्ण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो आणि गंभीर गुंतागुंत टाळता शकते.