चंद्रावर जाणं हे बहुतेक जणींचं स्वप्न असतं. अनेक जणी स्वप्नात चंद्रावरची सफर करूनही आल्या असतील. तर काही जणी स्पेस सायंटिस्ट किंवा अंतराळवीर बनून हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्नही करत असतील. आपल्यापैकी एकीचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न मात्र पूर्ण होतंय. तिचं नाव आहे क्रिस्टिना हेमॉक कोच! क्रिस्टिना ही चंद्रावर जाणारी पहिली महिला ठरणार आहे. ‘नासा’नं आपल्या आगामी चांद्रमोहिमेवर जाणाऱ्या चार जणांची नावं जाहीर केली आहेत. त्यामध्ये क्रिस्टिनाबरोबरच कॅनडाचे जेरमी हेन्सन, अमेरिकेतील व्हिक्टर ग्लोव्हर आणि रिड व्हाइसमॅन यांचा समावेश आहे. या वेळच्या मोहिमेमध्ये आणखी एक इतिहास रचला जात आहे. तो म्हणजे या टीममध्ये क्विटर ग्लोव्हर यांच्या रूपाने पहिल्यांदाच कृष्णवर्णीय सदस्याचीही निवड करण्यात आली आहे.

‘नासा’नं आपल्या या मोहिमेची माहिती दिली आहे. ही मोहीम अनेक अर्थांनी विक्रमी ठरणार आहे. या ‘मिशन मून’ ची सुरुवात २०२४ च्या शेवटी किंवा २०२५ सालच्या सुरुवातीला होईल. ४४ वर्षांची क्रिस्टिना कोच ही इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे. क्रिस्टिना ही मिशन स्पेशालिस्ट असल्याचंही ‘नासा’च्या वतीने स्पष्ट करण्यात आलं. ती मूळची मिशिगनमधल्या ग्रॅण्ड रॅपिड्स इथली असून नॉर्थ कॅरोलिनामध्ये तिचं पूर्ण शिक्षण झालं. ती लिव्हिंग्स्टनमध्ये राहत असताना तिची एस्ट्रोनॅट कॅम्पसाठी निवड झाली. गिर्यारोहण, पॅडलिंग, सर्फिंग या साहसी खेळाबरोबरच क्रिस्टिनाला धावणं, योगा, समाजसेवा, फोटोग्राफी आणि प्रवासाचीही आवड आहे.

नॉर्थ कॅरोलिनामधील रालेग युनिव्हर्सिटीतून तिने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि भौतिक शास्त्रात बॅचलर ऑफ सायन्सची आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर्सची पदवी घेतली. तर नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीतून क्रिस्टिनीने पीएच डी.ही केली. आतापर्यंत फक्त पुरुष अंतराळवीरच चंद्राच्या कक्षेत आणि त्याच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवू शकले आहेत. पण क्रिस्टिनाच्या रूपाने पहिल्यांदा एक महिला चंद्राच्या जवळ जाणार आहे. जवळपास ३२८ दिवस म्हणजे सगळ्यात जास्त काळ अंतराळात राहणारी महिला, असा विक्रमही क्रिस्टिनाच्या नावावर आहे. अंतराळवीर बनण्याआधी क्रिस्टिनानं अंतराळ विज्ञानात वापरली जाणारी उपकरणं, विकास यांचाही अभ्यास केला आहे. ‘नासा’च्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर (GSFC) मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर या पदापासून क्रिस्टिनाच्या करियरला सुरुवात झाली. ‘नासा’च्या अंतराळ मोहिमांमधील अनेक उपकरणांसाठी तिने मोलाची मदत केली आहे. २०१९ मध्ये सोयुज एमएस-१३ यानवरील बॅकोनूर कॉस्मोड्रोममधून पहिल्यांदा तिने अंतराळात पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘नासा’च्या ५९,६० आणि ६१ या मोहिमांसाठीही फ्लाइट इंजिनीअर म्हणून काम केलं. आता या मिशन मूनमध्ये आपली निवड होणं हा आपला सन्मान असल्याची प्रतिक्रिया क्रिस्टिनानं ट्वीट करून दिली होती.

christina hammock coach and team
क्रिस्टिनाबरोबरच कॅनडाचे जेरमी हेन्सन, अमेरिकेतील व्हिक्टर ग्लोव्हर आणि रिड व्हाइसमॅन यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य- नासा)

फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून क्रिस्टिनासह तिच्या टीमला घेऊन ओरिओन अंतराळ यान झेप घेणार आहे. ही मोहीम १० दिवसांची असेल. या चांद्रमोहिमेअंतर्गत हे अंतराळवीर प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार नाहीत. पण त्याच्या चारही बाजूंनी सतत प्रदक्षिणा घालतील. मुख्य म्हणजे भविष्यकाळातील यांसारख्याच आणखी चांद्रमोहिमांसाठी ही मोहीम मार्गदर्शक ठरणार आहे. आता या संपूर्ण टीमचं अत्यंत खडतर असं प्रशिक्षणही सुरू आहे. यामध्ये अर्थातच स्त्री-पुरुष हा भेदभाव केला जात नाही. यापूर्वी १९७२ मध्ये अपोलो मिशनद्वारे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. आता त्यानंतर तब्बल ५० वर्षांनी पुन्हा एकदा चांद्रमोहीम होणार आहे.

“जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटमधून आम्ही प्रवास करणार आहोत. हे मिशन अत्यंत प्रेरणादायी आहे. हजारो मैलोगणती पोचून तिथून पुढे चंद्राच्या जवळ जाऊन तिथलं निरीक्षण आम्ही करणार आहोत,” असं क्रिस्टिनानं सांगितलं आहे.

यापूर्वी महिला चंद्रावर गेलेल्या नसल्या तरी अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी झाल्या आहेत. २००३ मध्ये कल्पना चावला या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. दुर्दैवाने या मोहिमेत त्यांच्यासह ७ जणांचा मृत्यू झाला. तर सुनीता विल्यम्स यांच्या नावावर सर्वाधिक स्पेसवॉक करणारी महिला असा विक्रम आहे. त्यानंतर एरोनॉटिकल इंजिनीअर शिरीषा बांदला ही अंतराळात जाणारी भारतीय वंशाची तिसरी महिला ठरली होती. तिने अमेरिकेच्या न्यू मेक्सिको इथून ब्रिटिश अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांच्याबरोबर व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीच्या माध्यमातून यशस्वी अंतराळ उड्डाण परीक्षण केलं होतं.

आता क्रिस्टिना थेट चंद्रावर जाणार आहे. अर्थात क्रिस्टिनाचं हे यश तिच्या एकटीचं नाही. तिच्यासारख्या असंख्य जणींचं स्वप्नं ती पूर्ण कऱणार आहे. परिस्थितीशी झगडत, टक्केटोणपे खात अंतराळ विज्ञानात काही तरी करू इच्छिणाऱ्या असंख्य जणींसाठी क्रिस्टिना मार्गदर्शक ठरणार आहे. तिचा प्रवास हा तिचा एकटीचा नाही तर जगभरातील तिच्यासारख्या असंख्य तरुणींचा आहे, ज्यांनी एक दिवस चंद्रावर जाण्याचं स्वप्न पाहिलं आहे. आजही आपल्याकडे स्पेस सायन्स आणि संशोधन क्षेत्रात मुली फारशा दिसत नाहीत. क्षमता असूनही कित्येक वेळा सामाजिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा अन्य काही कारणांमुळे त्यांना हा प्रवास अर्धवट सोडावा लागतो. ‘नासा’सारख्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेमधून चांद्रमोहिमेसाठी मिशन स्पेशालिस्ट म्हणून निवड होणं हा एकट्या क्रिस्टिनाचा नाही तर जगभरातील महिलांचा गौरव आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(शब्दांकन- केतकी जोशी)