तबकातल्या बागेचा पहिला प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर, मग अनेक कल्पना सुचत गेल्या. हँगिंग बाऊल, फुटलेली कुंडी, आडवी चिनी मातीची भांडी, बोन्साय करण्यासाठी लागणारे सिरॅमिक पॉट्स अशा सगळ्यांचा वापर मी डिश गार्डनसाठी केला. यामध्ये वापरलेली झाडं माझ्या बागेतलीच होती. पावसाळ्यात कुंडीत अनेक छोटी रोपं उगवून येतात, त्यांचा उपयोग या रचनांमध्ये झाला.
एका पुष्प प्रदर्शनातून शंख घेतले होते. त्यांना खालच्या बाजूला लहान छिद्र करून, त्यात माती आणि कोकोपीट सोबत थोडं कंपोस्ट असं एकत्र करून स्पायडर प्लांट आणि झुपकेदार हिरवीगार शतावरी लावली. फिकं हिरवं, झुडुपासारखं दिसणारं स्पायडर प्लांट आणि हिरवी शतावरी हा रंगमेळ खूप छान जमून आला. हे शंख फारच सुंदर दिसू लागले. बरेच वर्ष ते माझ्याजवळ होते.
बोन्साय करणं हे फार मेहनतीचं आणि निगुतीने करण्याचं काम आहे. अडिनियम, फायकस, यांची बोन्साय माझ्याकडे अनेक वर्षांपासून आहेत आणि मी ती सांभाळतेयही. डिश गार्डनमध्ये मात्र हे करावं लागतं नाही. तिथे जुनी रचना बदलता येते. त्याला नवीन रूप देता येतं, त्यामुळे त्यांच्यातलं वैविध्य टिकून राहतं. त्यामुळे रचनेतला ताजेपणा टिकून ठेवता येतो.
एके वर्षी गच्चीवरल्या काही कुंड्यांमध्ये भरपूर पिंपळाची रोपं उगवली होती. इतकी की आता यांचं काय करायचं असा प्रश्न होता.मग त्यांना डिश गार्डनमध्ये वापरायचं ठरवलं. एका मध्यम आकाराच्या लांबटसर चिनी मातीच्या पात्रात एक देखावा तयार केला. डिश गार्डनला जर थीम असेल तर ती अधिक उठावदार दिसते, त्यानुसार मी एक थीम ठरवून त्याला लागणाऱ्या गोष्टी जमा केल्या. हे सगळं करताना आपल्या सभोवती जे मिळेल तेच वापरायचं हे सूत्र पक्कं होतं.
मग छोटे- मोठे रंगीत दगड, एक जांभा दगडाचा मोठा तुकडा, माती, कोकोपीट थोडं कंपोस्ट, शेवाळाचे तुकडे, बारीक काड्या, बांबूच्या पट्ट्या, आयस्क्रिम स्टीक, छोटे आयस्क्रिमचे डबे असं सगळं जमा केलं. माझी थीम होती, छोटी टेकडी, पायालगतचं तळं, घर आणि घरालगतची विहीरी आणि बाग.
आता मुख्य रचनेला सुरुवात केली, सर्व प्रथम कुंडी भरताना करतो तसं या चिनी मातीच्या पात्राची छिद्र नारळाच्या कंरवंटीचे तुकडे ठेऊन झाकून घेतली. मग जरा मोठे खडे असलेली वाळू त्यावर पसरली, हेतू हा की पाण्याचा उत्तम निचरा व्हावा. यातच कोळशाची भरड पूड मिसळली. यानंतर सुकलेला पालापाचोळा घातला. पालापाचोळा यासाठी की तो सावकाश कुजत राहून, त्यातून सातत्याने दीर्घकाळपर्यंत रोपांना अन्न पुरवठा होत राहिलं. यानंतर वापरली ती माती.
एवढी प्राथमिक रचना पूर्ण झाल्यावर टेकडीचा आभास द्यायला जांभ्या दगडाचा तुकडा एका बाजूला ठेवला. जांभा सच्छिद्र असतो, शिवाय त्याच्या पिवळट, लालसर रंगामुळे छान टेकडीचा आभास तयार होतो. या दगडाला मातीत रुतवून पक्का केला. त्यावर एक बऱ्यापैकी वाढलेलं पिंपळाच रोपं लावून त्याची मुळं या दगडावर येतील अशा रीतीने त्याला बारीक तारेने बांधून घेतलं. इतर रोपांना टेकडीवर लावून घेतलं. रिकाम्या जागा हिरव्या शेवाळाने झाकून घेतल्या. आता एका हिरव्यागार पावसाळी टेकडीचा आभास तयार झाला होता, ज्यावर पिंपळाचं मोठं झाड उगवलेलं होतं.
दगडाच्या पायथ्याला काड्यांच्या मदतीने कंपाऊंड करत, आत एक छोटं घर उभं केलं. घराजवळ विहीर दाखवली, विहिरीच्या कडेला परत एक पिंपळाचं रोपं लावलं. विहीर आणि घर तयार करायला आयस्क्रिम बाऊल आणि स्टीक वापरल्या. ही तयार झालेली रचना फार सुंदर दिसत होती. वाढणाऱ्या झाडांना लागणाऱ्या अन्नाची सोय केलेली असल्यामुळे ही रचना बरेच दिवस टिकूनही रहणार होती. आता करायचं होतं ते एवढंच की झाडांच्या वाढलेल्या फांद्या तेवढ्या वेळोवेळी कापायच्या. बस्स एवढी काळजी घेतली की ही छोटी बाग किंवा हिरवी गोष्ट सहज सांभाळता येणार होती.
अशाच प्रकारे केलेल्या बऱ्याच डीश गार्डन मी माझ्या वर्कशॉपमध्ये, प्रदर्शनात दाखवल्या आहेत आणि ठेवल्या आहेत. सर्वांनाच ही कल्पना नेहमीच खूप आवडते. मोठ्या पुष्प प्रदर्शनांमधे डीश गार्डनसाठी लागणाऱ्या कुंड्या, वायर, खेळणी, सजावटीच साहित्य, निरनिराळे दगड, लाकडाचे छोटे जाडसर तुकडे असं बरंच काही विकत मिळतं. तिथूनही आपण ते घेऊन ठेऊ शकतो. पण जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर आपल्या सभोवती असलेल्या गोष्टींचा वापर करून काम साधता येतं.
नर्सरीमधली आकाराने छोटी असलेली रोपं ही आपण वापरू शकतो. यात मग फक्त पानं असलेली किंवा फुलांसहित असा पर्याय असतोच. आपल्याकडे जागा कमी आहे, पण बागेची आवड आहे तर मग डिश गार्डन हा एक उत्तम पर्याय आहे.
तर जरूर हा प्रयत्न करून बघा आणि निसर्गाचा एक छोटं चित्र आपल्या घरात रेखा.
मैत्रेयी किशोर केळकर | mythreye.kjkelkar@gmail.com