अपर्णा देशपांडे

“मला मुळीच घरी नाही जायचं! आजकाल आई सारखी टोकत राहाते. तिला माझ्या अनेक गोष्टी आवडतच नाहीत. इकडे ऑफिसमध्ये मात्र माझं कौतुक होतं. मी एका वेळी कितीतरी कामं एकटी हॅण्डल करते. किती मोठे मोठे टार्गेट असतात, डेडलाईन असतात, पण ना त्याचं हिला काही पडलेलं नसतं. सतत सूचना, आणि आडून आडून टोमणे! मी काय लहान मुलगी राहिलेय का?” श्रुती चिडून बोलत होती, आणि तिची मैत्रीण रोहिणी कॉफी करता करता तिचं म्हणणं ऐकत होती.

“ हे बघ, आलाच आईचा फोन. आता घरी येताना हे आण, ते आण म्हणणार बघ. हॅलो आई. हो, सुटलं ऑफिस, येते घरी. रोहिणीकडे आलेय. कशाला म्हणजे? सहज. येते थोड्या वेळात. आणि चांगली कुठली तरी भाजी कर. भोपळा, दोडका नको. बाय.”

“ किती तोडून बोललीस गं आईला! तुला उशीर झाला म्हणून काळजीनं फोन केला असेल त्यांनी. इतकी चिडतेस का तू? आपली मुलगी चुकत असेल तर आई-वडील नाही तर काय तिऱ्हाईत व्यक्ती येऊन बोलेल का?”

“अगं, ती मला विचारते, त्या रोहन अय्यरचा तुला नेहमी फोन येतो, जरा सावध राहा. त्याला गर्ल फ्रेंड आहे ना मग तुला कशाला फोन करतो? म्हणते, बॉस बरोबर पार्टीला जाताना सोबत रोहिणी किंवा आणखी कुणीतरी असू देत बरोबर. आडून आडून प्रश्न विचारते. म्हणजे तिला विचारायचं असतं, की रोहन आणि माझं काही प्रेम प्रकरण सुरू आहे का? बॉसबरोबर काही लफडं तर नाही ना? अरे मग सरळ सरळ बोला की! परवा बाबा कॉफीशॉपमध्ये आले होते माहितेय? मी, शाहीन, लोकेश आणि वरुण बसलो होतो. इतकी लाज वाटली मला. घरी येऊन मी ओरडले, तर काळजी वाटली म्हणून आलो म्हणाले. मी काय लहान आहे का आता? माझ्या मावस बहिणीने ‘इंटर रीलिजन’ लग्न केल्यापासून तर अती काळजी करत असतात.”

“मला वाटतं, की तू ओव्हर रियॅक्ट करते आहेस श्रुती. त्यांच्या वागण्यात फक्त आणि फक्त तुझ्याबद्दल काळजी आहे. मला एक सांग, तुमच्याकडे एक कार आणि एक स्कूटर आहे. कार तर तू आणते, मग बाबा इतक्या लांब ऑफिसला स्कुटरवर का जातात? कधी विचार केलास? तू सुरक्षित राहावीस म्हणून ना. आईनं तिची काळजी व्यक्त केल्यावर तू चिडतेस, पण कधी तिच्याजवळ निवांत बसून तिला आश्वस्त केलं आहेस का? तो विवाहित अय्यर तुला रात्री उशिरा फोन का करतो? आणि तू इतक्या रात्री त्याच्याशी काय बोलते? त्याच्यावर ओरडायचं सोडून तू आईवरच चिडतेस? नशीबवान आहेस की तुझी काळजी करणारी आई आहे तुला. आई नाही तर कोण विचारणार गं तुला? आणि तिला सफाई न देता तिचा राग करतेस तू? तिला फोनवर उर्मटपणे चांगली भाजी कर म्हणालीस, पण कधी तू आईबाबांसाठी आवर्जून काही केलंस का? त्यांना कायम गृहीतच धरलं.”

“मग काय करायला हवं मी?”

“वेळ काढून त्यांच्याजवळ बसून त्यांची चौकशी कर, त्यांना बाहेर घेऊन जा, त्यांच्याशी गप्पा मार. तुझ्या कामाबद्दल बोल. रात्री मित्रांसोबत कॉफी पिणार असशील तर घरी सांगून जात जा. नाहीतर तिथे बाबांचा फोन तरी उचल. तुला शोधत त्यांना कॉफी शॉपपर्यंत यावं लागतं ही दुर्दैवी बाब आहे! ते तुझ्यावर संशय घेत नाहियेत, तुला कुठला धोका तर नाही ना , हे बघत असतात. त्यासाठी तू आई-वडिलांशी साधा सरळ स्वच्छ संवाद ठेव ना. त्यांना सगळं नीट समजावून सांगत जा, की कधी कधी ऑफिसबाहेरही मीटिंग होतात, जावं लागतं. काळजी करू नका. तू संदिग्ध वागशील तर ते काळजी करणारच ना.”

“अगं, परवा गाडी नव्हती म्हणून राजेंनी घरी सोडलं. तर लगेच आई म्हणाली, “अशा अर्ध वयाच्या पुरुषांपासून लांबच रहा बाई. सारखं काय तेच तेच बोलतात हे? मी काय लहान आहे का?”

“ मोठी झाली का तू? असा विचार करते म्हणजे लहानच म्हणायला हवं. माझे आई वडील मी लहान असताना अपघातात गेले. मी मुकले त्यांच्या प्रेमाला. तुला इतकं प्रेम करणारे आई-वडील मिळालेत ना, म्हणून त्याची कदर नाही. ती दोघं माणसंच आहेत, कधी चुकतही असतील, पण ते तुझं वाईट कधीच चिंतणार नाहीत. त्यांचा राग न करता त्यांच्या भूमिकेतून बघ, मग तुला त्यांची भावना समजेल.”

“ हो गं मी असा, त्यांच्याबाजूने कधीच विचार केला नाही. थँक गं. मी चुकीचं वागतेय हे जाणवलं तुझ्याशी बोलताना. आय एम सो लकी, की मला तुझ्या सारखी मैत्रीण आहे. लव्ह यू डियर.”

“ हे असं तू आई बाबांना म्हण ना. बघ त्यांना भरून येईल अगदी. आज त्यांना रात्री बाहेर छान डिनरला घेऊन जा, आणि भरपूर गप्पा मार. त्यांची चिंता तुला कळते ते दाखव आणि त्यांना आश्वस्थ कर. चल निघ आता.” श्रुती उठली , आणि निघताना रोहिणीला तिला एक प्यारवाली झप्पी देऊन गेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

adaparnadeshpande@gmail.com