यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे खूप कठीण बाब आहे. अनेक उमेदवार आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या परीक्षेत खूप मेहनत घेतात. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी परीक्षा पेपर सोडवण्याचा सराव, मॉक इंटरव्ह्यू , प्रेरक भाषणे किंवा शैक्षणिक व्हिडीओ पाहत सातत्य ठेवून तयारी करीत असतात. आज आपण अशाच एका प्रसिद्ध आयएसएस अधिकारी व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांच्या भाषणाची अनेक विद्यार्थ्यांना यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यात मदत झाली आहे. डॉक्टर तनू जैन, असे त्या महिला आयएएस अधिकारी व्यक्तीचे नाव आहे.

डॉक्टर तनू जैन या २०१५ च्या बॅचमधून यशस्वीरीत्या आयएएस अधिकारी बनल्या. पण, त्यानंतर सात वर्षांनंतर त्यांनी आयएएसची नोकरी सोडून, व्यावसायिक मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी असे करण्यामागचे कारण आणि डॉक्टर तनू जैन यांचा याबाबतचा प्रवास आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.

डॉक्टर तनू जैन दिल्लीच्या गजबजलेल्या शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी दिल्लीतील केंब्रिज शाळेतून स्वतःचे शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मेरठच्या सुभारती वैद्यकीय महाविद्यालयामधून बीडीएस म्हणजेच बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीची पदवी मिळवली आणि त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

हेही वाचा…परिस्थितीला न डगमगता बांधकाम कामगाराची लेक ‘एस अस्वथी’ झाली IAS, वाचा प्रेरणादायी गोष्ट

डॉक्टर तनू जैन यांच्या यूपीएससीच्या परीक्षा प्रवासात अनेक आव्हाने त्यांच्यासमोर उभी होती. त्यांनी २०१२ मध्ये पहिल्या प्रयत्नात दोन महिन्यांत पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केली; पण मुख्य परीक्षेत त्या अपयशी ठरल्या. परंतु, त्यांनी हार न मानता, त्यांनी याबाबतचा अभ्यास आणि मेहनत घेणे सुरूच ठेवले. परिणामत: तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे लक्ष्य पूर्ण केले. त्यांनी ऑल इंडिया रँकिंगमध्ये ६४८ वा क्रमांक मिळवला. २०१४ मध्ये त्यांना सशस्त्र दलाच्या मुख्यालय सेवेत पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली.

सात वर्षे आयएएस अधिकारी म्हणून काम केल्यानंतर डॉक्टर तनू जैन यांनी ही नोकरी सोडून पूर्णवेळ व्यावसायिकतेच्या मार्गावर वाटचाल करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीत तथास्तु आयसीएस नावाचे आयएएस कोचिंग सेंटर स्थापन केले आहे. स्वतःच्या निर्णयाबद्दलचे कारण स्पष्ट करताना डॉक्टर तनू जैन म्हणाल्या, “मी सात वर्षे परिश्रमपूर्वक काम केले. मी यूपीएससी परीक्षेच्या तयारीतील आव्हाने पाहिली. परीक्षेच्या तयारीच्या संघर्षातून मी स्वत: गेली आहे त्यामुळे यूपीएससी परीक्षा देणाऱ्या इच्छुकांना कोणत्या अडचणी येतात हे मला समजते. ते लक्षात घेऊनच मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणे मला त्यावेळी योग्य वाटले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयएएस अधिकारी झाल्यानंतर अवघ्या सात वर्षांनी त्यांनी सामाजिक सेवा उपक्रम, विद्यार्थ्यांना टिप्स देणे आणि पुस्तके लिहिणे सुरू केले. सोशल मीडियावर डॉक्टर तनू जैन खूप सक्रिय आणि लोकप्रिय आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे ९६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यूपीएससी परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना टिप्स देणारे छोटे छोटे व्हिडीओ त्या शेअर करीत असतात. तर असा आहे डॉक्टर तनू जैन यांचा प्रेरणादायी प्रवास!