खूप वर्षाँपूर्वी माटुंगा स्थानकात रेल्वेला आग लागून अनेक लोक त्या आगीत मृत्युमुखी पडलेली आढळली. त्यावेळी तपास करताना रुक्मिणी यांच्या लक्षात आले की, गाडीत कोणीतरी रॉकेल घेऊन जात होते आणि कुठून तरी जळती सिगरेट त्या रॉकेलच्या डब्यावर पडली नि आग लागली. तेव्हा डॉ. रुक्मिणी यांनी सतत पाठ-पुरावा करून रेल्वेमधून ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्यास कायद्याने बंदी घातली.

प्रेतागृह किंवा रोज कामाच्या निमित्ताने गुन्हेगारी जगताशी सबंध अशा क्षेत्रात काम करताना भले भले नाक मुरडतात तिथं स्त्रियांनी या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करणं ही तर फार दूरची गोष्ट आहे. आजपासून सुमारे ५० वर्षापूर्वी जर एखाद्या तरुणीने फॉरेन्सिक अर्थात न्यायवैद्यक क्षेत्रात- ज्यात वैद्यकीय आणि वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग गुन्हेगारी तपासात पुरावे शोधण्यासाठी केला जातो. अशा क्षेत्राची निवड करिअर म्हणून करावी ही निश्चितच आश्चर्यजनक बाब वाटेल.

पण म्हणतात ना नियमाला अपवाद हे असतातच. डॉक्टर रुक्मिणी कृष्ण्मूर्ती या भारताच्या पहिल्या महिला फॉरेन्सिक वैज्ञानिक म्हणून ओळखल्या जातात. आज त्यांची ओळख हेल्की ॲडव्हायसरी लिमिटेड मुंबई या कंपनीच्या सीईओ आणि चेअरपर्सन आणि गुजरातमधील नॅशनल फॉरेन्सिक विद्यापीठाच्या ॲकेडमी कौन्सिल मेंबर म्हणून ओळखल्या जातात. खुपदा आपण चित्रपट मालिकांमधून ऐकलेले असते की, फॉरेन्सिक रिपोर्टनुसार अमुक एखादी गोष्ट मॅच झाली म्हणून आता खरा गुन्हेगार आपल्याला सापडला आहे. ऐकायला वाचायला हे जरी रंजक वाटत असले तरीही प्रत्यक्ष काम करताना मात्र ते तितकेच कसोटी पाहणारे असते.

अशा या आगळ्या-वेगळ्या क्षेत्राची निवड करिअर म्हणून कशी काय केली, याविषयी डॉ. रुक्मिणी सांगतात की, मी रसायनशास्त्रात एमएस्सी केले होते. त्याकाळी मी अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज टाकले होते. तेव्हा तीन वेगळ्या संधी चालून आल्या होत्या. त्यात एक रिझर्व्ह बॅकेत कारकुनी स्वरूपाचे काम होते, दुसरे शिक्षकाचे आणि तिसरे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये संशोधक सहाय्यक म्हणून काम होते.

मी संशोधक सहाय्यकाची निवड केली. कारण मी कॉलेजमध्ये असताना माझ्या एका मित्राला लॅबमध्ये फॉरेन्सिकचे काम करताना बघितले होते. आणि ते मला खूप इंटरेस्टिंग वाटत होते म्हणून मी या कामाची निवड केली. विशेष म्हणजे त्याकाळी म्हणजेच सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी मी एकटीच या क्षेत्रात होते. इतर कोणीही स्त्रिया या क्षेत्राकडे वळत नव्हत्या.

आपल्या पहिल्याच केसचा अनुभव सांगताना त्या म्हणतात की, एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळून मारले होते. माझ्यासाठी तो खूप विदारक अनुभव होता.जळताना त्या स्त्रीला किती यातना झाल्या असतील याचा विचार करूनच मला कसेसे झाले. कारण एक स्त्री या नात्याने मी तिच्या वेदनांकडे पाहात होते. त्यावेळी माझ्या बॉसने मला मोलाचा सल्ला दिला की, आपले काम हे इतर कामांपेक्षा वेगळे आहे, त्यामुळे इथे रोज भंयकर अनुभवांना तोंड द्यावे लागणार आहे. तेव्हा भावनिक न होता काम करायची सवय मनाला लावून घे. त्यांच्या त्या सल्ल्याने माझा कामाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला. मी अधिक सजग होऊन येणाऱ्या कामांना सामोरी जाऊ लागले. त्यानंतर कसोटी पहाणारे अनेक प्रसंग आले, पण मी भावनिकदृष्ट्या कुठेच कोलमडली नाही.

खूप वर्षाँपूर्वी माटुंगा स्थानकात रेल्वेला आग लागून अनेक लोक त्या आगीत मृत्युमुखी पडलेली आढळली. त्यावेळी तपास करताना रुक्मिणी यांच्या लक्षात आले की, गाडीत कोणीतरी रॉकेल घेऊन जात होते आणि कुठून तरी जळती सिगरेट त्या रॉकेलच्या डब्यावर पडली नि आग लागली. तेव्हा डॉ. रुक्मिणी यांनी सतत पाठ-पुरावा करून रेल्वेमधून ज्वलनशील पदार्थ वाहून नेण्यास कायद्याने बंदी घातली. १९९३ चे बॉम्बस्फोट प्रकरण, तेलगी स्टॅम्प घोटाळा असो वा २००८ मध्ये टीव्ही कलाकार नीरज ग्रोव्हर याचे खून प्रकरण असो डॉ. रुक्मिणी यांनी आपल्या कौशल्यपूर्वक कामगिरीने त्या त्या तपासकार्यात नेहमीच मोलाची मदत केली आहे.

पॉलिसी आणि गुन्हेगारी संदर्भातील कामे करताना कधी धमक्यांच्या प्रकाराला सामोरे जावे लागले का, याबाबतचा आपला अनुभव व्यक्त करताना दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की, गमतीचा भाग असा होता की, असे काही फॉरेन्सिक विभाग असतात ही माहिती तेव्हाच्या गुंडाना नव्हती. त्यामुळे ही सर्व कामे पोलिसच करीत आहेत असा त्यांचा समज असायचा. पोलिसांच्या सहकार्यामुळे अशा धमक्या कधी आमच्यापर्यंत पोचल्याच नाही.

फॉरेन्सिक लॅबच्या संचालक पदावर असताना त्यांनी महराष्ट्रात मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि संभाजी नगर या सहा ठिकाणी जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा फॉरेन्सिक लॅब सुरू केल्या. याचा फायदा असा झाला की, तपासकार्यातील कामे अधिक वेगाने व पारदर्शक स्वरुपात होऊ लागली.

या क्षेत्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी खूपच व्यापक आहे. आपल्या अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर या क्षेत्रात त्यांनी आमुलाग्र बदल घडवून आणले आहे. आतापर्यंत त्यांचे १०० हुन अधिक संशोधन पेपर प्रकाशित झाले आहे. या व्यतिरिक्त अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना मार्गदशर्नपर व्याख्यानासाठी बोलविले जाते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारनेदेखील वेळोवेळी त्यांना सन्माननीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या क्षेत्रात काम करीत असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, फॉरेन्सिक क्षेत्राची गरज फक्त पोलिस आणि सरकारलाच नाही तर सामान्य माणसालादेखील असते. कधी कधी सामान्य माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग निर्माण होतात की तिथे फॉरेन्सिकची मदत मोलाची ठरू शकते. या उद्देशातूनच त्यांनी हेल्की ॲडव्हायसरी लॅबची निर्मिती केली. ही अत्याधुनिक तंत्राने उपयुक्त अशी खाजगी फॉरेन्सिक लॅब असून ती आयएसओ प्रमाणित आहे.

एका आगळ्या-वेगळ्या कार्यक्षेत्रात आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर, हार न मानता शून्यातून सुरुवात करून एका अफाट कर्तृत्वाचा डोलारा उभा करणाऱ्या डॉ. रुक्मिणी कृष्णमूर्ती यांच्या कार्याला सलाम.