केंद्र सरकारने २०१९ साली जम्मू- काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय योग्य असल्याचं सांगत कलम ३७० रद्द ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका तरुण खेळाडूचा उल्लेख केला आहे. ती कधीकाळी श्रीनगरमधील दगडफेकीत सहभागी होती. परंतु, कलम ३७० रद्द झाल्यानंतर तिला तिच्यातील फुटबॉलचं कौशल्य दिसलं. तिला त्यानुसार प्रशिक्षण मिळालं आणि आज ती देशातील नामवंत फुटबॉलपटू आहे. ही फुटबॉलपटू म्हणजेच अफशान आशिक. चला तर मग जाणून घेऊयात अफशान आशिक हीचं दगडफेक करण्याचं कारण काय होतं? ती कोण होती? आणि तिला काय व्हायचं आहे? हे तिनं जगाला ओरडून सांगितलं…

एका हातात फुटबॉल, दुसऱ्या हातात दगड

चुकीच्या कारणांसाठी लाइमलाइटमध्ये आलेली काश्मिरी फुटबॉल गोलकीपर अफशान आशिक २०१७ मध्ये चर्चेत आली. डिसेंबर २०१७ मध्ये अफशानचं एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. पाठीवर दप्तर, एका हातात फुटबॉल आणि दुसऱ्या हाताने थेट पोलिसांवर दगडफेक करणारी विशीतील तरुणी. यात अफशान आशिक जम्मू-काश्मीर पोलिसांवर दगडफेक करताना दिसत होती. यावेळी हे खुलेपणानं माध्यमांसमोर तिनं मान्य केलं… ‘होय मी दगडफेक केली… परंतु, मला असं करायचं नव्हतं… मला देशासाठी फुटबॉल खेळायचंय’ असं तिनं म्हटलंय. अफशान ही काश्मीरची पहिली महिला फुटबॉल कोच आहे. अफशानच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या २० मुलींच्या फुटबॉल संघाला सरावासाठी कोठी बाग भागातील सरकारी हायस्कूलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली.

हेही वाचा >> मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म ते आज ४१.०७ कोटींच्या कंपनीच्या अध्यक्ष, फोर्ब्सच्या यादीतील सोमा मंडल कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका मुलाखतीत अफशाननं सांगितलं होतं की, ‘पोलिसांनी आम्हाला वाईट वागणूक दिली. माझ्या विद्यार्थिनींना थप्पड मारली. ते असं वागणार असतील तर त्यांनी आमच्याकडून कोणत्या वागणुकीची अपेक्षा ठेवावी?’ माझ्यावर दगडफेक करणारी असा शिक्का बसला होता, पण मी नेहमीच एक फुटबॉलर होती आणि आहे, असं अफशान सांगते. अफशान आशिकनं गव्हर्नमेंट विमेन्स कॉलेजमधून तिचं शिक्षण पूर्ण केलं असून अफशान आता काश्मीरच्या महिला फुटबॉल संघाची कर्णधार आहे. फुटबॉलपटू बनण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांना ती प्रशिक्षण देते. त्या एका घटनेनं आयुष्याला कलाटणी दिली असं ती आजही सांगते.