काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गणपतीसारखीच सोंड असलेली, मात्र स्त्रीरूप असलेली वैनायकी किंवा विनायकीची मूर्ती वा तिच्या प्रतिमा सापडल्या आहेत. मात्र ती नेमकी कोण, पत्नी, शक्ती की मातृका, हा प्रश्न कायम आहे. पुरातत्त्वतज्ज्ञ आणि प्राच्यविद्यातज्ज्ञ शोध घेत असलेल्या या वैनायकीचे गूढ उकलले तर विनायक म्हणजेच गणपती आपल्याला नव्याने आकळेल.

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यामध्ये असलेल्या ‘आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’च्या एका गोडाउनमध्ये १९०९ साली प्रतिहार शैलीतील एक मूर्ती सापडली, ही मूर्ती गजाननाची आहे, असे सुरुवातीस वाटले, मात्र नंतर व्यवस्थित पाहिले असता ती मूर्ती सोंड असलेल्या स्त्रीरूपाची आहे, असे संशोधकांच्या लक्षात आले. त्या मूर्तीचा कालखंड शैलीनुसार निश्चित करताना लक्षात आले की, ती १० व्या शतकातील आहे. गणपतीसारखीच सोंडधारी पण स्त्रीरूपिणी म्हणून सुरुवातीस तिचे नामकरण विनायकी किंवा वैनायकी असे करण्यात आले. दरम्यानच्या काळात या वैनायकीचा उल्लेख कुठे प्राचीन धर्मग्रंथांमध्ये सापडतोय का, याचीही चाचपणी पुरातत्त्वतज्ज्ञांनी आणि प्राच्यविद्या संशोधकांनी केली. त्या वेळेस तिचे संदर्भही एक एक करत सापडत गेले. काही पुराणांमध्ये तिचा उल्लेख सापडला तो वैनायकी म्हणून. काही कथांमध्येही तिचा संदर्भ सापडला. तेव्हापासून ते आजपर्यंत पुरातत्त्वतज्ज्ञ आणि प्राच्यविद्यातज्ज्ञ या वैनायकीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यात अद्यापही पूर्ण यश आलेले नाही.

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
Three major announcements for RBI customers investors
रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक, गुंतवणूकदारांसाठी तीन प्रमुख घोषणा

गणपतीसारखीच सोंड असलेली मात्र स्त्रीरूप असलेली ही वैनायकी किंवा विनायकी या दोन नावांशिवाय स्त्रीगणेश, गजानन (गजमुख असलेली), विघ्नेश्वरी म्हणूनही शास्त्र-पुराणांमध्ये ती ओळखली जाते. ती नेमकी कोण, हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. काहींच्या मते ती गणेशाची सहचारिणी आहे, काहींच्या मते ती त्याची शक्ती आहे तर काहींच्या मते ती ६४ किंवा ८४ योगिनींपैकी एक आहे, तर काहींच्या मते ती मातृकांपैकी एक असून गणेशाचे आणि तिचे नातेसंबंध हे आई व मुलाचे आहेत. ही एवढी म्हणजेच आई-मुलापासून ते अगदी त्याची शक्ती किंवा सहचारिणी असण्यापर्यंतची त्यांची नाती व्यक्त होण्याची कारणे ही वैनायकीच्या आजवरच्या झालेल्या किंवा करण्यात आलेल्या चित्रणामध्ये दडली आहेत. हे चित्रण कधी तिच्याशी संबंधित कथांमध्ये येते, कधी चित्रांमध्ये पाहायला मिळते तर कधी लेण्यांमध्ये किंवा मंदिरांमध्ये शिल्पित झालेले दिसते. या साऱ्याचा हा अभ्यासात्मक आढावा!

आणखी वाचा – गौरी – विदर्भ आणि कोकणच्या!

१९०९ सालच्या त्या घटनेनंतरची सर्वात महत्त्वाची घटना होती ती १९३१ सालची. आर. डी. बॅनर्जी यांनी त्यांच्या ‘हैहयाज् ऑफ त्रिपुरी अ‍ॅण्ड देअर मॉन्युमेंट्स’ या त्यांच्या पुस्तकामध्ये आणखी एका अशाच सोंडधारी स्त्रीप्रतिमेची म्हणजेच वैनायकीची नोंद केली. हे शिल्प मध्य प्रदेशातील बेडाघाट येथे पाहायला मिळते. त्यानंतर अनेक संशोधकांनी त्यांच्या त्यांच्या परीने घेतलेल्या शोधामध्ये देशभरातील वैनायकींची नोंद होऊ लागली. मग लक्षात आले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत (या दोन्ही ठिकाणी वैनायकी सापडली आहे.) वैनायकीचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रामध्येदेखील तीन वैनायकी सापडल्या आहेत, त्यातील एक प्रतिमा सध्या राज्यात नाही तर इतर दोन प्रतिमा या मंदिरातील शिल्पांमध्ये कोरलेल्या आहेत. किंबहुना यातील एका शिल्पकृतीमुळे या संदर्भातील संशोधनाला वेगळा आयाम मिळाला आहे.

आजवर भारतीयांनी गणपतीकडे पाहिले ते दैवत म्हणून. त्यामुळेच त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. मात्र गणपती या देवतेचा पुरातत्त्वीय अंगाने शास्त्रीय शोध घेण्याची गरज होती. ही गरज पूर्ण केली ती पॉल मार्टिन दुबोस यांनी. जन्माने फ्रेंच असलेले पॉल भारतीय शिल्पशास्त्र आणि वास्तुरचना यांनी प्रभावित होऊन भारतात आले. त्यावर त्यांनी संशोधनही केले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, भारतीयांनीदेखील आजवर गणपतीवर सर्वसमावेशक असे संशोधन केलेले नाही. मग त्यांनीच ते संशोधन करण्याचा ध्यास घेतला. स्वत: संन्यस्त आयुष्य जगत त्यांनी हे संशोधन काम पूर्णही केले. याच संशोधनादरम्यान त्यांना वैनायकीही लक्षात आली. तिचाही शोध त्यांनी सर्वत्र भारतभर फिरून घेतला आणि मग गणपतीवर त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये त्यांनी एक प्रकरण वैनायकीवरच बेतले. त्यांचा हा संशोधन प्रबंध फ्रँको इंडियाच्या प्रोजेक्ट फॉर इंडियन कल्चरल स्टडीजअंतर्गत फ्रँको इंडियानेच ‘गणेशा-द एन्चॅन्टर ऑफ थ्री वल्र्ड्स’ या नावाने प्रकाशित केला. फ्रेंचमध्ये प्रकाशित झालेला हा मूळ शोधप्रबंध इंग्रजीमध्ये आणण्याचे काम प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. किरीट मनकोडी यांनी केले.

पॉल मार्टिन दुबोस यांनी या संशोधनामध्ये भाविकाचा दृष्टिकोन यशस्वीपणे टाळला. त्यामुळे या संशोधनाला शास्त्रीय मूल्य प्राप्त झाले आहे. त्यासाठी ते संस्कृत शिकले, गणेश साहित्य, गणेश प्रतिमा-प्रतीके यांचा सखोल अभ्यास केला. गणेशाचे प्रतिमाशास्त्र, त्यात वेळोवेळी झालेले बदल, भारतीय शिल्पशास्त्राच्या पद्धती-परंपरा आणि गणेशाशी संबंधित सर्व कथा-दंतकथा-रूपके यांचाही अभ्यास केला. त्याच्या शास्त्रीय परिष्करणातून हे संशोधन पुढे आले. वैनायकीचा शोध घेताना पॉल यांना लक्षात आले की, तिच्या इतर प्रचलित नावांबरोबर गणेश्वरी, गणेशनी आणि लम्बोदरी अशीही तिची आणखी तीन नावे आहेत. या साऱ्याचे संदर्भ सापडतात. शिवाय उत्तर भारत आणि मध्य भारतात त्याचप्रमाणे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, ओरिसा आणि आसाम या ठिकाणी ती मोठय़ा प्रमाणावर सापडते, पाहायला मिळते.

आणखी वाचा – पुरुषी मक्तेदारी मोडीत काढणारी मूर्तिकार रेश्मा खातू!

दक्षिण भारतात राजेंद्र चोला या राजाच्या कालखंडात (११ वे शतक) कोरण्यात आलेल्या शिलालेखांमध्येही तिचा उल्लेख पॉलना आढळला. बंगळुरूजवळ असलेल्या कोलार येथे ‘गणेशनी’ असा तिचा उल्लेख असून ६४ योगिनी आणि मातृकांमध्ये तिचा उल्लेख येतो. तसेच मदुराई आणि सुचिंद्रमच्या मंदिरांमध्ये असलेल्या स्तंभांवरही तिची प्रतिमा शिल्पित झालेली दिसते.

उत्तर कर्नाटकातील शिराळी येथील संग्रहालयामध्ये दोन वैनायकी प्रतिमा संग्रहामध्ये आहेत, त्यातील एक लखनौ येथील तर दुसरी महाराष्ट्रात सापडलेली वैनायकीची ब्राँझमधील प्रतिमा समाविष्ट आहे. (महाराष्ट्रातील प्रतिमा १६ व्या शतकातील आहे) म्युनिच म्युझियममध्ये ही वैनायकीची प्रतिमा असून ती भारतातील केरळमध्ये सापडलेली होती. ही प्रतिमाही १६ व्या शतकातीलच आहे. जशी ही प्रतिमा शिल्पकृतींमध्ये दिसते तशीच ती लघुचित्रांमध्ये किंवा इतर चित्रांमध्येही पाहायला मिळते.

प्राचीन भारतीय साहित्यांमध्येही वैनायकीचा संदर्भ येतो. लिंगपुराण, स्कंदपुराणातील काशीस्कंदामध्ये त्याचप्रमाणे गोरक्षसंहितेमध्येही गजानन किंवा वैनायकीचा संदर्भ येतो. विष्णुधर्मोत्तर पुराणामध्ये तिचा उल्लेख मातृका म्हणून येतो. अंधकासुराच्या वधाच्या वेळेस त्याचे रक्त पडल्यानंतर प्रत्येक थेंबातून होणाऱ्या अंधकासुराच्या नव्या निर्मितीच्या वेळेस युद्धात त्याचा पडलेला प्रत्येक थेंब खाली न पडू देता तो भक्षण करण्यासाठी शिव शंकरांनी मातृकांची निर्मिती केली, त्यात वैनायकी होती असा संदर्भ येतो. मत्स्यपुराणामध्येही हीच कथा देण्यात आली असून त्यात शंकराने निर्मिती केलेल्या २०० देवतांमध्ये ती होती, असे म्हटले आहे. याचा अर्थ तिचा संबंध मातृका असण्याशी आहे. शिव शंकरांची शक्तीरूपिणी म्हणून ती गणपतीची आई असा संदर्भ काही संशोधकांनी लावला आहे. म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला गणपतीच्या शिल्पकृतींसमोर सप्तमातृका पाहायला मिळतात. महाराष्ट्रात औरंगाबाद लेण्यांमध्ये गणपतीच्या एका बाजूस मातृका तर दुसऱ्या बाजूस बुद्ध शिल्पित करण्यात आले आहेत. तर मुंबईतील जोगेश्वरी लेण्यांमध्येही गणपतीच्या शिल्पाच्या बरोबर समोरच्या बाजूस सप्तमातृका कोरलेल्या असून त्या शिल्पकृतीची बरीचशी झीज झाली आहे. मात्र त्या सप्तमातृका आहेत, हे पुरते लक्षात येते.

वैनायकीची शिल्पे ही बसलेली, उभी किंवा नृत्यावस्थेतील आहेत. तिला दोन किंवा चार हात दाखविलेले आहेत. दगडामध्ये कोरलेल्या अनेक प्रतिमांची झीज झालेली आहे किंवा मग त्या तुटलेल्या तरी आहेत त्यामुळे तिची अस्त्र-शस्त्रे यांची नेमकी माहिती हाती नाही. पण काही प्रतिमांमध्ये लक्षात आलेल्या अस्त्रांमध्ये परशू, वज्र, साप, तुटलेला हत्तीचा दात (एकदंताशी नाते सांगणारा), मोदकपात्र किंवा वीणा यांचा समावेश आहे. शिवाय अभय किंवा वरद म्हणजे रक्षण करणारी किंवा वर देणारी या मुद्राही तिच्या हातांमध्ये पाहायला मिळतात. या मुद्रांवरून तिचे देवत्व पुरते सिद्ध होते. रिखिआन (१० वे शतक), बेडाघाट (११ वे शतक), हिरपूर, झारिआल (ओरिसा- १० वे शतक) या सर्व ठिकाणी ती मातृका म्हणून किंवा ६४ योगिनींपैकी एक म्हणून येते. प्रसिद्ध अभ्यासक देवांगना देसाई यांनीही त्यांच्या संशोधन प्रबंधामध्ये तिचा उल्लेख योगिनी म्हणूनच केला आहे.

चिदम्बरम आणि मदुराईतील मूर्तीमध्ये ती व्याघ्रपाद म्हणजे वाघाचे पाय असलेली अशी दाखविण्यात आली आहे. जे. ए. बॅनर्जी यांनी त्यांच्या शोधप्रबंधामध्ये तिचा उल्लेख गणेशाची स्त्रीरूपिणी किंवा रिद्धी, सिद्धी, बुद्धी, पुष्टी, भारती किंवा नीला सरस्वतीप्रमाणेच त्याची सहचारिणी म्हणून केला आहे. मात्र यातील एक महत्त्वाचा फरक इथे लक्षात घ्यायलाच हवा तो म्हणजे वैनायकी वगळता सर्व सहचारिणी या मानवी स्त्रीरूपातच शिल्पित किंवा चित्रित झाल्या आहेत. रिखिआन येथील वैनायकीचे ९ व्या शतकातील शिल्प हे सर्वात जुने शिल्प मानले जाते.

वैनायकी ही गणेशाची शक्तीरूपिणी स्त्री असण्याची शक्यता असल्याचे दोनच संदर्भ संपूर्ण भारतात सापडतात. त्यातील एक संदर्भ हा उदयपूरच्या उदयेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये आहे. तर दुसरा संदर्भ म्हणजेच शिल्प १२ ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील औंढय़ा नागनाथ मंदिरावर आहे. या दोन्ही ठिकाणी गणपती वैनायकीसोबत पाहायला मिळतो. त्यातही औंढय़ा नागनाथचे शिल्प सर्वाधिक महत्त्वाचे आहे. कारण हे जगातील एकमेव शिल्प आहे, ज्यात गणपती, सिद्धी, बुद्धी आणि वैनायकीच्या सोबत दिसतो.

आणखी वाचा – गणेशोत्सव विशेष : गणपतीची इकोफ्रेंडली सजावट, फक्त शंभर रूपयांत!

मात्र देवतेची शक्ती म्हणजे त्याची पत्नी नाही हे समीकरणही इथे लक्षात घ्यावे लागते. शक्ती म्हणजे ऊर्जा. अगदी अश्मयुगापासून माणसाला स्त्रीमधील प्रसवण्याची शक्ती म्हणजे ऊर्जा असे वाटत आहे. ती शक्ती आहे, असे माणसाने मानले. म्हणूनच जगभरात सर्वत्र देवतेच्या सापडलेल्या पहिल्या प्रतिमा या लज्जागौरीच्या म्हणजेच मातृकेच्या पायविलग अवस्थेतील तिचे जननेंद्रिय स्पष्टपणे दाखविणाऱ्या अशा आहेत. किंबहुना म्हणून कोणत्याही देवतेची शक्ती किंवा ऊर्जा दाखविताना ती स्त्रीरूपातच दाखविली जाते. मात्र याचा अर्थ ती त्याची पत्नी असा होत नाही. किंबहुना म्हणूनच वैनायकीबाबतचे हे गूढ अद्याप उकललेले नाही. ती नेमकी कोण, पत्नी, ऊर्जा म्हणजेच शक्ती की मातृका हा प्रश्न अद्याप कायम आहे. हे गूढ उकलेले त्या वेळेस विनायक म्हणजेच गणपती आपल्याला नव्याने आकळेल असे संशोधकांना वाटते आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशाशी संबंधित हे स्त्रीरूप समजून घेणे सयुक्तिक ठरावे.

संदर्भ – गणेशा-द एन्चॅन्टर ऑफ थ्री वर्ल्ड्स- पॉल मार्टिन दुबोस, अनुवाद- डॉ. किरीट मनकोडी आणि पुरातत्त्वतज्ज्ञ व प्रतिमाशास्त्रातील जाणकार डॉ. किरीट मनकोडी यांच्याशी वेळोवेळी झालेला संवाद.

विनायक परब – vinayak.parab@expressindia.com