रुबन्स ॲक्सेसरीची संचालक चिनू काला ही जिद्द आणि परिश्रम यांचे उत्तम उदाहरण आहे. चिनूच्या अथक परिश्रमाची आणि चिकाटीची गोष्ट अतिशय प्रोत्साहन देणारी आहे. हातात कपड्यांची एक पिशवी आणि खिशात केवळ ३०० रुपये घेऊन, चिनूने घर सोडले. सलग दोन दिवस मुंबईच्या रेल्वेस्थानकावर झोपण्यापासून, अनेक हलाखीच्या परिस्थिती चिनूने धीटपणे अनुभवलेल्या आहेत. अशी अनेक संकटे येऊनही ती मुळीच डगमगली नाही.

खडतर बालपण आणि संगोपन असूनदेखील जिद्द आणि चिकाटी कोणत्याही अडथळ्यांवर मात करू शकते हे चिनू कालाने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. कौटुंबिक समस्यांमुळे चिनूने वयाच्या केवळ १५ व्या वर्षी घर सोडले. घर सोडताना तिच्याकडे फक्त ३०० रुपये आणि कपड्यांची पिशवी एवढेच सामान होते. प्रतिकूल परिस्थितीत दोन रात्र मुंबईच्या रेल्वेस्थानकावर काढल्यानंतर, तिने सेल्सगर्ल म्हणून काम करण्यास सुरुवात केली; ज्यामधून तिला दिवसाला केवळ २० रुपये मिळत होते. मात्र, चिनूने हार मानली नाही आणि आज ती ४० कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या ‘रुबन्स ॲक्सेसरीज’ची मालकीण आहे.

हेही वाचा : कॅन्सरशी लढत; ६२ वर्षीय महिलेने कर्करोगाच्या अभ्यासासाठी पोहण्यातून उभारला फंड! पाहा…

२०१४ साली बंगळुरूमधील एका मॉलमध्ये तिने ‘रुबन्स ॲक्सेसरीज’चे छोटेसे दुकान सुरू केले. “आतापर्यंत आम्ही लाखो दागिने / ॲक्सेसरीजची विक्री केलेली आहे,” असे चिनूने ‘द वीकेंड लीडर’ला सांगताना म्हटले.

चिनू, तिचा जोडीदार आणि तिच्या मुलीने मिळून, बंगळुरूमधील फिनिक्स मॉलजवळ पाच हजार स्क्वेअर फुटांचे आलिशान घर उभारले आहे. चिनूला BMW ५ सीरिजच्या गाडीतून प्रवास करणे पसंत आहे.

“मी अजूनही दिवसातील १५ तास किंवा त्याहून अधिक वेळ काम करते. ‘रुबन्स’ने भारतातील फॅशन ज्वेलरी मार्केटमधील २५ टक्के (अंदाजे रु. २१,००० कोटी) कमवावे, असे ध्येय आहे,” असे चिनू म्हणते.

चिनूने जेव्हा घर सोडले तेव्हा ती सेंट अलॉयसियस शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. मात्र, घर सोडल्याने तिला तिचे शिक्षण पूर्ण करता आले नाही.

“मी लोकांना आपले सामान घेऊन रेल्वेस्थानकावर जाताना पहिले. मला वाटलं की, तिथे राहण्यासाठी जागा मिळेल. पण नंतर समजले की कोणीही रेल्वेस्थानकांवर कायमस्वरूपी राहू शकत नाही. मी कोपऱ्यात बसून खूप रडले,” अशी आठवण चिनूने सांगितली.

“मी घरोघरी जाऊन चाकू-सुऱ्या व कोस्टर सेट विकत असे; ज्यातून दिवसाला माझी केवळ २० रुपयांची कमाई व्हायची. माझे काहीही ऐकून न घेताच अनेकदा लोक माझ्या तोंडावर दार बंद करून घ्यायचे. १०० लोकांपैकी केवळ दोन किंवा तीन जण मी विकत असलेल्या गोष्टी खरेदी करायचे,” असे चिनू म्हणते. “मी जिथे राहत होते, तो केवळ एक हॉल होता. ना त्यात स्वच्छतागृह होते, ना स्वयंपाकघर,” असे ती सांगते.

हेही वाचा : कोण होती पहिली भारतीय ‘स्टंटवूमन?’ का म्हटले जायचे तिला ‘हंटरवाली’? जाणून घ्या ही माहिती

२००७ साली चिनू कालाने ग्लॅडरॅग्स मिसेस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि त्यात १० वे स्थान पटकावले होते. “पण मला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे नाही याची जाणीव झाली. त्यातून चांगले पैसे मिळत असले तरीही,” असे चिनूने सांगितले. २००४ साली चिनूने अमितसह लग्न केले. अमित ‘रुबन्स’मध्ये डिरेक्टर या पदावर आहे.

सुरुवातीच्या काळात चिनूने ‘रुबन्स ॲक्सेसरीज’ लाँच करण्यासाठी तीन लाख रुपये गुंतवले. “मी छोटे दुकान सुरू केले होते, तेव्हा सर्व ग्राहकांना मी एकटी सांभाळायचे.” मात्र, २०१८ पर्यंत चिनू कालाची बंगळुरूमध्ये दोन आणि हैदराबाद व कोची या शहरांत मिळून एकूण पाच दुकाने सुरू आहेत.

कोविड-१९ महामारीच्या काळात चिनू कालाने ऑनलाइन विक्री करण्यास सुरुवात केली आणि तिथून तिची अधिक भरभराट होण्यास सुरुवात झाली. सध्या रुबन्स ॲक्सेसरीज या फॅशन ज्वेलरी कंपनीचे उत्पन्न हे तब्ब्ल ४० कोटी रुपये इतके आहे, अशी माहिती DNA च्या लेखावरून मिळते.