निसर्गात सृजनाचा उत्सव अखंड चालू असतो. पावसाची रिमझिम चालू झाली की काळ्या आईच्या कुशीतून दोन हात पसरून नाचत तृणपाते बाहेर डोकावते. सोनेरी ऊन खात बाळसेदार होते. त्याच्याही नकळत शेंड्यावर कळी फुटते. यथावकाश फुल उमलते. तो चैतन्याचा अंश बघून मन हरखून जाते. रंग, रुप, आकार, सुवास यांचे अमाप वैभव मिरवत ही निसर्गाची बाग फुलत असते. डोळ्यांनी ते टिपताना एखाद्या व्यक्तीमधील कलाकार जागा होतो. अनुकरण करण्याची वृत्ती उफाळून वर येते आणि त्यातील एखाद्या फुलाची हुबेहुब प्रतिकृती ती व्यक्ती तयार करते. असे करणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे माधुरी किरण दात्ये.
‘देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’ असं म्हणतात. मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या माधुरी यांना ‘देखण्या’ हातांचा वारसा आईकडूनच मिळाला. आई विविध प्रकारचा हलवा करून त्याचे दागिने करण्यात माहीर. या दागिन्यांमध्ये घालण्यासाठी आई क्रेपच्या कागदाची फुले करायची. हा क्रेपचा कागद हळूवारपणे कसा हाताळायचा, त्याला ताण कसा आणि किती द्यायचा, फुल कसं बांधायचं याचे बाळकडू घेतच माधुरी मोठ्या झाल्या.
हातात कला होती आणि सातत्याने काहीतरी करण्याची उर्मी होती. त्यामुळे लग्नानंतर जीवनवेलीवरची ‘नुपूर’ या कळीची निगराणी करता करता त्या ज्येष्ठ कलावती मालती मेहेंदळे यांच्याकडे फुले शिकायला गेल्या आणि मग गेली ८/९ वर्षे फुले फुलवतच राहिल्या आहेत. फुल अगदी हुबेहुब झालंच पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. त्यांच्यातील संयमाची ती परीक्षा असते. हवा तोच आकार येण्यासाठी त्या पाकळ्या स्वतंत्रपणे कापतात. एकाचवेळी अनेक पाकळ्या कापणे, त्या कटाक्षाने टाळतात. त्यामुळे त्यांनी केलेली फुले बघताक्षणी ‘रुपास भाळले मी’ अशी बघणाऱ्यांची स्थिती होते. गेल्या तीन वर्षापासून दर गुरूपौर्णिमेला मेहेंदळे आजींना काहीतरी वेगळे फुल, त्यापासून तयार केलेली कलाकृती भेट म्हणून देन आहेत.
क्रेपपेपर एक किंवा जोड आणि क्राफ्टपेपर वापरून त्या तोरणं, माळा, पुष्पगुच्छ, गजरे, महिरपी, हार, वेण्या, पुष्पस्टँड, फुलांचे आकडे इत्यादी. ‘मागणी तसा पुरवठा’ या नियमाने करतात. त्यामध्ये सर्व रंगाची जास्वंद, झेंडू, कमळ, गोकर्ण, सोनटक्का, प्राजक्त, अस्टर्ड, गुलाब, अत्तर सोनफाचा, अत्तर मोगरा अशा अनेक फुलांचा समावेश असतो. पंचाहत्तरीला पंचाहत्तर फुलांची परडी, मोगऱ्याच्या कळ्यांचा हार, लक्ष्मीपूजनासाठी कमळ करतात. आंब्याची पाने, विड्याची पाने, आपट्याची पाने आणि फुले परदेशात पाठवून त्यांचे ‘क्षण’ फुलवतात. कुठलाही सण फुलांशिवाय जाणार नाही. याची काळजी नुपूर क्रिएशनच्या माध्यमातून त्या तत्परतेने घेतात.
त्यांच्याप्रमाणेच घर आणि रांगोळी ही सौंदर्यवर्धक कल्पना ‘प्रत्येकाला’ जपता येण्यासाठी रोहिणी सुहास दळवी या नाविन्यपूर्ण ‘हात’भार लावत आहेत. ‘प्रत्येकाला अशासाठी म्हणायचं की काहींना रांगोळी काढता येत नाही. पण हवी असते. काहींना वेळ नसतो. काहींना वयपरत्वे खाली बसून किवा वाकून काढता येत नाही. शेजारणीच्या दारात रांगोळी आहे आणि माझ्या नाही, ही भावना काहींना अस्वसथ करते. अशांसाठी रोहिणी यांनी कल्पकतेने सर्वांना आवडतील असे, अत्यंत सुबक, असे रांगोळीचे साचे तयार करवून घेतले आहेत. तेवढंच करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी रांगोळी काढण्यासाठी मेटलचे,काळा आणि गेरूसारख्या तपकिरी रंगाचे आठ वेगवेगळ्या आकारातले हलकेफुलके, सहज उचलून ठेवताय येतील असे पाट तयार केले आहेत. कधी रांगोळी काढायची जागा खडबडीत असते. कधी जागेचा रंग असा असतो की त्यावर रांगोळी दिसतच नाही. त्यामुळे रांगोळीला पार्श्वभूमी आवश्यकच असते. झाडूवाल्याच्या येण्याच्या वेळेचा अंदाज नसतो. अशावेळी रंगीत पाट हा उत्तम पर्याय होतो. आजमितीला रोहिणी यांच्याकडे साडेचारशे रांगोळी डिझाईन आहेत.
खरं तर योगायोगानेच त्या या कलानिर्मितीकडे वळल्या. आकाश आणि जमीन यांचा अगदी कमी जागेत मोहक मेळ घालून चितारल्या जाणाऱ्या रांगोळीचा वारसा त्यांनी जपला होता. रंगरेषांचे वळण लाभलेला हात होताच. त्यातूनच श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांच्या रांगोळीचा साचा अचानक भेट म्हणून मिळाला. त्यामुळे ही थोडी अनोळखी संकल्पना प्रत्येक ‘दारांत’ पोहचवावी या विचाराने उचल खाल्ली. गरजेनुसार साच्यामध्ये हवा तो बदल करून घेतला. पाटाचे कटिंग, फिनिशिंग जरा कष्टप्रद होते, पण मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने त्या हरखून गेल्या. रंगीत पाटावरील अत्यंत सुबक, घोटीव आणि सुंदर रांगोळी बघताक्षणी स्त्री, पुरुष दोघांनाही आवडत गेली. रोहिणी यांनी रांगोळीपाट कसा वापरावा, हे पाटामागे लिहून दिले आहे. शिवाय इच्छा असल्यास या साच्यामध्ये रंग कसे भरायचे, जागा आणि प्रसंगानुसार त्या साच्यापासून वेगळीच रांगोळी कशी तयार करायची. याबाबतही मार्गदर्शन करतात. समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याच्या निर्मितीत त्या गढून गेल्या आहेत.
तर शिल्पा किरण घैसास यांना रंगरेषेतील सौंदर्य टिपण्याची नजर आहे. त्यामुळे त्यांच्या कलानिर्मितीत एक टापटीप, नेमकेपणा दिसून येतो. एका सुईवरचे लोकरीचे क्रोशावर्क करण्यात त्या रंगून जातात. खरं तर अगदी लहानपणी आजोळी बेळगावला त्या गेल्या असतानाच कुतुहलाने त्यांनी सुई हातात घेतली. आणि मग ती त्यांच्या हातात खेळतच राहिली. हौसेने वेळ मिळेल तसा त्या टोपी, मोजे, स्वेटर ही बाळलेणी, पर्सेस करत राहिल्या. आजही ती सुई त्यांनी खाली ठेवलेली नाही. तर वेण्या, तोरणं, गजरा, टेबल रबर, पूजा मॅट, हाव, हेअर क्लीप, अशा अनेक गोष्टी त्या करत आहेत. उठावदार रंगसंगती आणि लक्षणीय सफाईदारपणा यामुळे त्यांनी केलेल्या वस्तू अत्यंत देखण्या दिसतात. साहजिकच आपण त्यांच्या प्रेमात पडतो. शब्दांत त्यांचं रुपलावण्य गुंफता येत नाही. डोळ्यांनाच ते काम करावे लागते.
तोरण लावलेले दार हे मुंडावळ्या बांधून बसलेल्या नवरीप्रमाणे साजिरे गोजिरे दिसते. त्यांनी केलेले, पण त्यांचे किंवा आकाश कंदिलांचे तोरण म्हणजे खास दिवाळीभेटच. टेबल रबर किंवा पूजा मॅट यांच्या डिझाईन्समध्ये इतके वैविध्य की त्याचा कुठेही उपयोग करून घराचा मेकओव्हर करता येईल. त्यांनी केलेल्या रंगीत फुलांच्या हेअरक्लीपमुळे वेषभूषेतील रंगसंगती आयत्यावेळीही साधता येते. मुद्दाम बाजारांत जावे लागत नाही. रसिक मनाची आणि चोखंदळ स्वमत्त्वाची छाप पडते. ती फुललेली हेअरक्लीप जेव्हा डोक्यावर बसते, तेव्हा ‘बघत राहू दे तुझ्याकडे’ अशीच पाहणाऱ्यांची अवस्था होते.
या सगळ्या सौंदर्यवर्धक गोष्टी लोकरीच्या असल्यामुळे धूळ बसून मळल्या तरी धुता येतात. त्यावर मोती लावलेले असले तर मात्र संभाळावं लागतं. अशीही मन प्रसन्न करणारी शिल्पा यांची नवनिर्मिती.
खऱ्याचा भास करून देणारी फुले, उंबरठ्याबाहेर राहून स्वागत करणारी रांगोळी किंवा दाराला सुशोभित करणारे तोरण; या सगळ्या घराला सजविणाऱ्या गोष्टी. ‘ते माझे घर, ते माझे घर, जगावेगळे असेल सुंदर’ हीच प्रत्येकाची भावना असते. स्वत:ला ते आवडत असतेच, पण इतरांच्याही नजरेतून कौतुक झिरपावे, अशी इच्छा असते.
‘रुप पाहता घराचे, सुख झाले हो मनाचे’ हेच खरं…
suchitrasathe52@gmail.com