डॉ. शारदा महांडुळे

आहारशास्त्रातील औषधी गुणधर्माची बहुगुणी अशी पांढऱ्या, हिरव्या व पिवळसर वर्णाची काकडी ही फळभाजी संपूर्ण भारत देशात लोकप्रिय असून ती सर्वत्र पिकते. काकडी खाल्ल्याने शरीरात शीतलता व उत्साह निर्माण होतो. निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे सर्व घटक काकडीत आहेत. हिंदीमध्ये खिरा संस्कृतमध्ये सुशीतला इंग्रजीमध्ये कुकुंबर आणि लॅटिनमध्ये कुकुमिस सटायव्हस म्हणून ओळखली जाणारी काकडी कुकरबिटेसी या कुळातील आहे. काकडीमध्ये उन्हाळी काकडी, क्षीरा कर्करी राजील कर्कटी आणि हिरवी अखूड काकडी असे तीन प्रकार आहेत. या तीनही काकडय़ांमध्ये औषधी गुणधर्म आहेत.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदिकदृष्ट्या काकडी ही शीतल, पित्तशामक, पाचक आणि मूत्रल आहे. काकडीचे बी शीतल, मूत्रल, पुष्टीकारक आहे. काकडीच्या या गुणधर्मामुळे ती खाल्ली असता शरीरातील अंतर्गत स्राव व मूत्रप्रमाण वाढते व पर्यायाने मूत्रविकार दूर होतात.

काकडीत विपुल प्रमाणात खनिजे आहेत. अनेक जण काकडीची साल काढून काकडी खातात; परंतु शक्यतो साल काढूच नये. कारण हे काकडीच्या सालीलगतच क्षार व जीवनसत्त्वे यांचे विपुल प्रमाण असते. काकडीमध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशिअम, मीठ, मॅग्नेशिअम, गंधक, सिलिकॉन, ग्लोरीन, बम्लोरीन व तंतुमय पदार्थ ही पोषकद्रव्ये मिळतात.

सहसा काकडी ही कच्ची खावी, कारण कच्ची काकडी ही पौष्टिक व पचण्यास हलकी असते.

उपयोग :

* काकडी ही पित्तशामक असल्याने अपचन, उलटी, मळमळ, पोटात गुब्बारा धरणे

या विकारांवर काकडीचा नियमित जेवणात वापर करावा.

* भूक मंद झाली असेल तर काकडीचे काप करून पुदिना, काळे मीठ, लिंबू रस, मिरे व जिरेपूड घालून खावेत. यामुळे भूक चांगली लागते.

* चेहऱ्याचा टवटवीतपणा आणि सौंदर्य वाढवण्यासाठी काकडीचा रस व मध यांचे मिश्रण चेहऱ्यास हलक्या हाताने चोळून लावावे.

* निद्रानाश ही समस्या भेडसावत असेल तर काकडीचे काप डोक्यावर ठेवून झोपावे.

* डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी काकडी आणि बटाटे कुस्करून एकत्र करून डोळ्यांभोवती दररोज लावावा. सुकल्यानंतर तो धुऊन टाकावा.

* चेहऱ्यावरील वांग व काळपटपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस, लिंबुरस व दूध एकत्र करून कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावावे व हलक्या हाताने मसाज करावा.

* शरीरावरील भाजलेल्या जखमेची आग होत असेल तर काकडीचा रस लावावा, यामुळे तेथील आग थांबते.

* मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या हातापायांची अनेक वेळा जळजळ होत असते, अशा वेळी काकडीचे काप तळहातावर व तळपायावर चोळावेत.

* काकडी ही शीतल व सारक आहे. त्यामुळे मलावष्टंभाची तक्रार असणाऱ्या रुग्णांनी रोज काकडीचे सेवन करावे. यामुळे आतडय़ातील मळ पुढे ढकलण्यास मदत होते व पोट साफ होते.

* काकडी, गाजर, बीट व कोथिंबीर यांचा रस एकत्र करून प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होते व उत्साह निर्माण होतो. तसेच शरीरात युरिक अ‍ॅसिड साठून होणारे गाऊट, आर्थोरायटिस व सांधेदुखी यांसारखे रोग दूर होतात.

* आम्लपित्त, गॅसेस व आंत्रव्रण (अल्सर) यांसारखे विकार असल्यास काकडीचा कीस किंवा काकडीचा रस दर २-४ तासांनी प्यावा. यामुळे पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.

* अपचन होऊन उलट्या होत असतील तर काकडीचे बी वाटून ताकामधून घ्यावे. यामुळे पित्त, दाह, वारंवार तहान लागणे हे विकार कमी होतात.

* लघवी होताना जळजळ होत असेल तर काकडीरस लिंबुरस, जिरेपूड व खडीसाखर घालून प्यावा. यामुळे लघवीची जळजळ दूर होते.

* काकडीचा कीस चेहरा, मान यावर नियमितपणे लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमे, पुटकुळ्या, सुरुकुत्या दूर होऊन चेहरा कांतिमान होतो. तसेच हा रस केसांना लावल्यास त्यामध्ये असणाऱ्या सिलिकॉन व गंधकामुळे केस गळायचे थांबतात.

सावधानता : काकडी ही शीत गुणधर्माची असल्याने वर्षां आणि शरद ऋतूत जास्त प्रमाणात खाऊ नये. खायचीच असेल तर थोड्या प्रमाणात व तीही फ्रिजमध्ये न ठेवलेली, सामान्य तापमानाची खावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sharda.mahandule@gmail.com