विविध कारणे आणि विविध लक्षणे असे हे पैतिक म्हणजेच पित्ताचे विकार असतात. बऱ्याच व्याधींमध्ये लक्षणे बऱ्यापैकी समान असतात पण पित्ताच्या व्याधींमध्ये अनेक प्रकारची लक्षणे कमी- अधिक तीव्रतेने दिसतात. व्यक्तीपरत्वे ही लक्षणे वेगवेगळ्या रूपात सामोरी येतात. हेतू समान असला, कारण एक असलं तरी व्यक्तीपरत्वे लक्षणे बदलत जातात. जसं जसा काळ जाईल तस तशी तीव्रता वाढून अजून काही लक्षणे/ उपद्रव सुरू होतात. अगदी दर माणसागणिक दिसणारे हे पैतिक विकार बऱ्यापैकी किचकट, त्रास देणारे, दैनंदिन जीवन विस्कटून टाकणारे असतात. औषधी चिकित्सा केवळ तात्पुरते लक्षण समाप्ती करू शकते, पण पूर्णपणे शुद्धी/ लक्षणांपासून सुटका जरा किचकट आहे. कारणांपासून निवृत्ती, आहार आणि विहारात बदल केले तर बऱ्याच अंशी उपशम मिळतो.

आणखी वाचा : ‘पीसीओडी’मध्ये उपयुक्त आहार विहार

अवेळी जेवण, रात्री जागरण, सततचे फास्ट फूड, सतत मांसाहार, जास्त प्रमाणात चहा-कॉफीचे सेवन, व्यायामाचा अभाव, हॉटेलमधील सततचे खाणे, कोल्ड्रिंक, तिखट तळलेले पदार्थ जास्त खाणे, मानसिक तणाव, वेदनाशामक गोळ्यांचे अतिसेवन, मद्यपान इत्यादी एक ना अनेक कारणांमुळे पित्त होणे सुरू होते व कारणे चालू राहिली की वाढत जाते. मळमळ होणे, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, चक्कर, छातीत, पोटात वेदना होणे, जळजळ होणे, तोंडाला पाणी सुटणे इत्यादी अनेक विविध प्रकारची लक्षणे दिसू लागतात. पुढे जाऊन दुर्लक्ष करत राहिले तर पुढे पित्ताचे खडे, आमाशयातील अल्सर, आतड्यांना छिद्र पडणे, पॅनक्रियाजला सूज येणे इत्यादी अनेक उपद्रवांना सामोरे जावे लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा : रजोनिवृत्ती आणि आहार

आहारातील आणि विहारातील बदल खूप साधे, सोपे व अतिशय परिणामकारक ठरतात. औषधाची आवश्यकता खूप कमी लागते आणि दैनंदिन जीवनातील सततचा त्रास कमी होतो.

आहारातील पुढील उपाययोजना नक्कीच मदत करतील.

  • शिळे अन्न खाऊ नये.
  • तूर डाळीच्या ऐवजी मूग डाळीचा वापर करावा.
  • तेल व मसाल्याच्या पदार्थ मसाल्यांचा वापर मर्यादित ठेवावा.
  • चहा कॉफीच्या प्रमाणावर नियंत्रण हवे. उपाशीपोटी चहा कॉफी घेणे टाळावे.
  • सतत बाहेर खाणे टाळून घरगुती जेवणावर भर द्यावा.
  • हिरवी मिरची, गरम मसाले यांचा वापर टाळावा.
  • आंबवलेले पदार्थ सतत खाऊ नयेत. उदाहरणार्थ इडली, ढोकळा इत्यादी.
  • दही (आंबट), आंबट फळे टाळावी.
  • भरपूर प्रमाणात पाणी घ्यावे.
  • चिंचेऐवजी कोकमाचा वापर करावा.
  • साळीच्या लाह्या, राजगिरा लाह्या खाव्यात.
  • काळ्या मनुका, अंजीर रोज खावेत.
  • साळीच्या लाह्यांचे पाणी उपयुक्त आहे.
  • जास्त साखरेचे, मैद्याचे, पॅकेट फूड टाळावे.
  • मिठाचा वापर प्रमाणात असावा.
  • चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी या अवस्थेत जास्त उपयुक्त.
  • उपाशी राहणे/ अतिखाणे टाळावे.
  • मलावष्टंभ (कॉन्स्टिपेशन) टाळावे.
  • पदार्थांबरोबरच तयार करण्याच्या /स्वयंपाकाच्या कृतीमध्ये सुद्धा बदल करावा.
  • सिमला मिरची, पोहे, मेथी इत्यादी पदार्थांचा वापर वैयक्तिक अनुभवाप्रमाणे करावा. पण शक्यतो टाळावे.

आणखी वाचा : अँटिऑक्सिडंटस् चा खजिना

विहारातील बदल पुढील प्रमाणे करावेत.

  • जेवणाच्या वेळा पाळाव्यात.
  • रात्री जेवण खूप उशिरा करणे टाळावे.
  • बैठे काम टाळावे किंवा दर एक तासाने उठून थोड्या हालचाली कराव्यात.
  • रात्रीचे जागरण टाळावे.
  • सकाळी लवकर उठून व्यायामाची सवय ठेवावी.
  • जेवण झाल्या झाल्या झोपू नये.
  • मद्यपान, धूम्रपान टाळावे.
  • वेदनाशामक औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.
  • मानसिक ताण व्यवस्थापनासाठी ध्यानधारणा इत्यादीचा अवलंब करावा.
  • हेतू काय आहे हे बघून योजना केल्यास नक्कीच लवकर व कायमचा आराम मिळेल.

dr.sarikasatav@rediffmail.com