डॉ. स्वाती गायकवाड
बाळाला जन्म दिल्यानंतर ती महिला खूप आनंदी आहे असं सगळ्यांना वाटतं. पण तिचं मन मात्र सतत उदास असतं, तिला बाळाकडे पाहून आनंद होत नाही, सतत थकवा जाणवतो,र डावंसं वाटतं, मी चांगली आई होऊ शकत नाही असे नकारात्मक विचार मनात येतात. पण जर अशावेळी तिला तिच्या कुटुंबाचा आधार, डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार मिळाले तर ती पूर्णपणे बरी होऊ शकते.

अलीकडेच घडलेली ही घटना… उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे एका महिलेने आपल्या अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रिजमध्ये ठेवले आणि ती झोपी गेली. ही बातमी वाचून अनेकांना वाटेल की, ‘माता न ही वैरीण…’ परंतु गरोदरपणाच्या संपूर्ण प्रवासात महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात, त्याचप्रमाणे बाळाच्या जन्मानंतरही स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्समध्ये चढ-उतार होत असतात हे कोणी लक्षात घेत नाही.

यामध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोनल बदलांचा थेट परिणाम स्त्रीच्या मानसिक स्थितीवर होतो. यामुळे महिलेच्या मनात वाईट विचार येण्याची शक्यता असते. काही प्रकरणांमध्ये आत्महत्या (Suicidal thoughts) करण्याचाही विचार येतो. प्रसूतीनंतर महिलांचं मानसिक आरोग्य खालावतं, त्यामुळे अशा वेळी त्यांनी अधिक समजून घेण्याची आणि त्यांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. साधारण १० पैकी १ ते २ महिलांना ही समस्या होऊ शकते. ही फक्त ‘मूड स्विंग्ज’ची समस्या नाही, तर हा उपचाराची गरज असलेला अक मानसिक आजारच आहे.

बाळाला जन्म दिल्यानंतर ती महिला खूप आनंदी आहे असं सगळ्यांना वाटतं. पण तिचं मन मात्र सतत उदास असतं, तिला बाळाकडे पाहून आनंद होत नाही, सतत थकवा जाणवतो,र डावंसं वाटतं, मी चांगली आई होऊ शकत नाही असे नकारात्मक विचार मनात येतात. पण जर अशावेळी तिला तिच्या कुटुंबाचा आधार, डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार मिळाले तर ती पूर्णपणे बरी होऊ शकते.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

• सतत उदास वाटणे, रडू येणे.

• शारीरीक ऊर्जा कमी होणे, थकवा जाणवणे.

• बाळाबद्दल प्रेम न वाटणे किंवा बाळाची जास्त चिंता वाटणे.

• आत्मविश्वास गमावणे.

• झोप न लागणे किंवा खूप झोप येणे.

• भूक न लागणे किंवा जास्त खाणे.

• निराशा, अपराधीपणाची भावना जाणवणे.

• काही वेळा स्वतःला किंवा बाळाला इजा करण्याचे विचार मनात येणे.

उपचाराच्या दृष्टीने आई झालेल्या या महिलेला तिच्या कुटुंबीयांचा आधार सर्वांत महत्त्वाचा वाटतो. तिला समजून घेणं, घरकाम व बाळाची जबाबदारी वाटून घेणं, तिला जास्तीत जास्त विश्रांती देणं, सकारात्मक वातावरण निर्माण करणं या गोष्टी उपयुक्त ठरतात. यासोबतच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, समुपदेशन आणि गरज असल्यास औषधोपचारांचीही आवश्यकता भासते. योग्य आहार, पुरेशी झोप, हलका व्यायाम, योग आणि ध्यान यांचादेखील तिला फायदा होतो.

वेळीच उपचार मिळाले तर एखादी महिला या पोस्ट पार्टम डिप्रेशनमधून पूर्णपणे बरी होऊ शकते. आई निरोगी आणि आनंदी असेल तर बाळही निरोगी व सुरक्षित राहते. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहणे आणि महिलांना आवश्यक तो आधार देणे समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे.