गृहिणी असो किंवा नोकरदार महिला, आपल्या महिन्याच्या बजेटमध्ये सगळे खर्च बसवायचं टेन्शन प्रत्येक महिलेलाच असतं. शक्य तितकं सेव्हिंग करण्याचा प्रयत्न प्रत्येक महिला करतच असते. पण कित्येकदा पगार चांगला असेल आणि कर्जाचं तितकंसं टेन्शन नसेल तर खर्च होतो, असं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. लक्झरी आयट्म्सवर किंवा उगाचच गरज नसलेल्या वस्तूंचीही खरेदी केली जाते.  ‘सेल’ आहे म्हणून घर सजावटीसाठी उगाचच काही वस्तू घेतल्या जातात. कालांतराने त्याबद्दल काहीवेळेस पश्चातापही होतो. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळेच दर महिन्याला किमान काही रक्कम तरी बचत म्हणून बाजूला काढण्याची सवय ठेवा. ही थोडी थोडी रक्कम अनेकदा आपत्कालात उपयोगी पडू शकते. वेळेवर अशी बचत केली तर गरजेच्या वेळेस तुमच्यावर कुणापुढे हात पसरायची वेळ येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा-  १९९१ चा अर्थसंकल्प 

आपल्या खरेदीच्या सवयींवर नीट लक्ष ठेवलंत तरी तुमचा खर्च कमी होऊ शकतो. उगाचच वायफळ खर्च होणार नाही. फायनान्शियल प्लानिंग म्हणजेच आर्थिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींनीही खूप फरक पडतो. तुमच्याकडे येणारे पैसे आणि होणारे खर्च याची व्यवस्थित नोंद करून ठेवलीत तर तुम्हाला तुमचा खर्च आणि बचत अशी विभागणी करणंही सोपं जाऊ शकेल. बचतीसाठीच्या अगदी साध्या सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नोकरदार महिला, व्यावसायिक किंवा गृहिणींसाठीही या अगदी उपयुक्त आहेत.

यादी केल्याशिवाय शॉपिंग करु नका

नोकरदार महिलांचा पगार झाल्यावर पहिल्या दोन आठवड्यांत त्या भरपूर शॉपिंग करतात, असं एक निरीक्षण आहे. गृहिणीही त्यांच्या हातात पैसे आले की कित्येकदा शॉपिंग करायला सुरुवात करतात. मग काही वेळेस गरजेच्या वस्तू बाजूला राहतात आणि अनावश्यक गोष्टीच घेतल्या जातात. परिणामी खर्च वाढतो. यावर उपाय म्हणजे खरेदीला जाण्यापूर्वी किंवा ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वीही शॉपिंग लिस्ट करा. त्यामध्ये सगळ्यांत अत्यावश्यक गरजेच्या गोष्टी कोणत्या आहेत, हे पुन्हा पुन्हा तपासा. असे केल्याने कोणत्या गोष्टी गरजेच्या नाहीत किंवा लगेचच घेतल्या नाहीत तरी चालू शकतं हे तुमच्या लक्षात येईल आणि आपोआपच तुमच्या फालतू खर्चावर आळा बसेल.

हेही वाचा- वित्तरंजन : प्रजासत्ताक भारताचे पहिले अर्थमंत्री आणि अर्थसंकल्प

शॉपिंग हा छंद होऊ देऊ नका

हल्ली ऑनलाईन शॉपिंगमुळे घरबसल्याही खरेदी केली जाते. त्यामुळे कित्येकदा गरज नसलेल्या वस्तू घेतल्या जातात. सतत सर्फिंग करता करताही उगाचच खरेदी केली जाते. लक्षात ठेवा, घरातलं सामान किंवा कपडे यांच्याबरोबर तुमच्या आवडीच्या वस्तूंची खरेदी नक्की करा पण शॉपिंगला तुमची सवय किंवा छंद बनवू नका. सेल आहे म्हणून गरज नसलेल्या गोष्टी घेऊ नका. कित्येकदा त्या वस्तूंची गरजही नसते हे नंतर लक्षात येतं.

मॉलऐवजी दुकानात जा

खरंतर हल्ली अनेक मॉल्समध्ये सवलतींचा वर्षाव होत असतो. पण किराणा सामान किंवा अन्य घरगुती साहित्य घ्यायला मॉलमध्ये जाणार असाल तर एकतर आधीच यादी तयार करा. प्रत्येक खरेदी मॉलमधून करण्याचं टाळा. तुमच्या जवळपासची किराणा दुकाने, फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स आदी दुकानेही बघून ठेवा. तिथे कधीतरी फेरफटका मारा. कदाचित तुम्हाला तुमच्या जवळच्या किराणा दुकानदाराकडे अधिक चांगल्या वस्तू, चांगल्या दरानेही मिळू शकतील. एखाद-दुसरी वस्तू घ्यायची असेल तर अजिबात मॉलमध्ये जाऊ नका. त्या एका वस्तूच्या खरेदीसाठी मॉलमध्ये गेल्यास हमखास अनावश्यक इतर खरेदीही केली जाते.

हेही वाचा- सोने २०२३ मध्ये कितपत चमकेल?

दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी आणि वापर

शक्यतो किराणा सामान भरताना आपल्या घरातील माणसे गृहीत धरुनच भरले जाते. तरी शक्य असेल तर प्लानिंग करा. त्यानुसार भाज्या, किराणा खरेदी केलात तर वायफळ खर्च होणार नाही आणि वस्तूही वाया जाणार नाहीत. तुमच्या घरातील लोकांच्या जेवणाचा अंदाज तुम्हाला असतो. तो लक्षात घेऊनच स्वयंपाक करत जा. एखाद्या वेळेस अन्न जास्त झालं तर ठीक आहे पण उगाचच जास्त स्वयंपाक केल्यास अन्न वाया जातं आणि पैसेही.
भावनेच्या आहारी जाऊन खरेदी करु नका

खरेदी करताना कोणत्याही भावनेच्या आहारी जाऊ नका. चांगला सेल लागला आहे असं कुणीही सांगितलं आणि आपल्याला गरज नसेल तर शॉपिंग करु नका. अनेक शॉपिंग वेबसाईट्सचे ऑनलाईन शॉपिंग फेस्टिवल्स, मेगा सेल सतत सुरु असतात, त्यांचे नोटिफिकेशन्स बंद करा. गरज नसताना त्या वस्तू घेतल्या जातात. कितीही वाटलं, जवळच्या मैत्रीणिंनी घेतलं तरी आपल्याला त्याची गरज नसेल तर त्या वस्तू घेऊ नका. अशा वेळेस शॉपिंग कार्टमध्ये एखादी वस्तू  अॅड केल्यावर अर्धातास तशीच राहू देत. मग परत एकदा ती वस्तू/कपडे बघा. कदाचित तेव्हा तुम्हाला ती अनावश्यक असल्याचंही जाणवेल.

हेही वाचा- ‘बाजारातील माणसं’ : शेअर बाजाराचा ज्ञानकोश

शक्यतो क्रेडिट कार्ड वापरु नका

तुमच्याकडे पैसे नसतील तरीही खरेदी करता येईल यासाठी क्रेडिट कार्डचा पर्याय आहे. पण गरजेच्या वस्तू, किराणा सामान, लाईटबिल्स अशा गोष्टींसाठी क्रेडिट कार्ड वापरा. पैसे नसताना आपली गरज भागली जावी यासाठी क्रेडिट कार्ड वापरले जावे, शक्यतो चैनीच्या वस्तू, कपडे यावर उगाचच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करु नका. क्रेडिट कार्डमधून जो खर्च केला जातो ,त्यावर व्याज भरावं लागतं हे लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवा की, तुमची आर्थिक सुरक्षा तुमच्याच हातात असते.

(शब्दांकन : केतकी जोशी)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to save money properly dpj
First published on: 22-01-2023 at 10:36 IST