‘मंगळसूत्र’ हा सौभाग्यालंकारातील सर्वात श्रेष्ठ अलंकार मानला जातो. विवाहित स्त्रिया मंगळसूत्र परिधान करतात. मंगळसूत्र का घालावे, कोणासाठी घालावे आणि कुठे घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. सध्या सोशल मीडियावर मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरलाय. अभिनेत्री राधिका देशपांडेनी तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलेय, ” मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार. माझं लग्नं नुकतंच झालं असो किंवा नसो, माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे ह्याची आठवण तुम्हाला करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते.” यापूर्वी क्षिती जोगनेसुद्धा मंगळसूत्र घालण्याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं होतं. ती म्हणाली होती, “माझ्या मनात असेल तेव्हा मंगळसूत्र घालेन.” खरंच लग्नानंतर मंगळसूत्र घालणे, महत्त्वाचे आहे का? का लोकांना लग्नानंतर मंगळसूत्र घालणे अपेक्षित असतं? आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

भारतीय संस्कृतीमध्ये मंगळसूत्राचे महत्त्व

भारतीय संस्कृतीमध्ये मंगळसूत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा नवरदेव नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो तेव्हा विवाह संपन्न होतो. मंगळसुत्राशिवाय विवाह संपन्न होत नाही. कुंकू, चुडा आणि मंगळसूत्र ही सौभाग्याची प्रतिके मानली जातात. लग्नानंतर कायम गळ्यात कायम मंगळसुत्र दिसते. मंगळसुत्रामुळे महिलेच्या वैवाहिक जीवनाविषयी माहिती मिळते. पण पुरुषांसाठी असा कोणता नियम नव्हता जे फार चुकीचे आहे. खरं तर मंगळसुत्र कधी, कोणासाठी, कुठे घालावे ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. हल्ली महिला ही बाब समजून आवडीनुसार मंगळसूत्र घालतात. लग्नानंतर महिलांनी मंगळसूत्र घालावेच, असा कुठेही नियम नाही.

अभिनेत्री काय म्हणाल्या?

Mangalsutra
(Photo : Loksatta Graphic Team)

मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे लिहिते, “मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार. माझं लग्नं नुकतंच झालं असो किंवा नसो, माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे ह्याची आठवण तुम्हाला करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते. त्यामुळे आत्ताच सांगते मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही. फरक पडतो. मुळात मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केंव्हा, कधी, कशाला ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला का देऊ?
धमकी वजा सूचना समजा.
उत्तर द्यायची वेळ नाही पण आज मला प्रश्न नक्कीच पडला आहे. कोण होतात हे स्त्री धनाचा हिशोब, झडती, माहिती घेणारे? हे सगळं घेऊन माझं सोनं वाटून द्यायला तो सत्यनारायणाचा प्रसाद आहे? माझं सोनं हे माझं आहे, ते सौभाग्याचं लेणं आहे. आम्ही स्त्रिया सहज बोलता बोलता त्याला ‘प्रीटी ज्वेलरी‘ असं बोलून जातो. पण बहुतांश भारतीय स्त्रियांकरता सोनं, जे आई-वडिलांनी, सासु-सासऱ्यांनी दिलं आहे, जे तिच्या किंवा नवऱ्याच्या परिश्रमातून विकत घेतलं आहे, अशा सोन्याचं वजन किती बरं असेल? काही गोष्टी आकड्यात मोजता येत नसतात. अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांना ते नाही कळायचं. आम्ही स्त्रिया मंगळसूत्राला जीवापाड जपतो. काळजी पोटी ते ठराविक ठिकाणी घालत नाही. माझ्या घरात तर मंगळसूत्र ठेवायची एक स्वतंत्र जागा आहे. घर घ्यायची वेळ आली तेंव्हा मी माझं सोन विकलं पण मंगळसूत्र मुठीतून सुटलं नाही. आणि ह्या धनाचा हिशोब आणि वाटप आम्ही होऊ द्यायचा, ह्या डाव्या नेत्यांच्या आणि त्यांच्या पार्टीच्या धोरणांच्या पूर्णत्वा करता! मागे टिकली/बिंदी वरून चर्चा उधळली, इतक्यात मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरलं तर उद्या लग्न संस्कृती वर काहीतरी घणाघाती बोलतील. तर “मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही!” विषय संपला. हा फोटो २००५ सालचा आहे, माझ्या लग्नातला. विधी सुरू होण्या आगोदरचा असल्यामुळे ह्यात मंगळसूत्र नाही पण तेंव्हा पासून हा दागिना सौभाग्याचं लेणं ठरला. फोटो जुना आहे पण जुनं ते सोनंच नाही का? म्हणूनच टिकवून ठेवायचं.”

काही दिवसांपूर्वी क्षिती जोगने एका मुलाखतीत मंगळसुत्र घालण्याबाबत स्पष्टपणे सांगितले होते. ती म्हणाली होती, “मी कुठेतरी गेले होते. तेव्हा मी मंगळसूत्र घातलं नव्हतं. लग्नानंतर एक दीड वर्षात कुठल्यातरी कार्यक्रमाला गेले होते. तू मंगळसूत्र नाही घातलं? तुझं नुकतंच लग्न झालंय ना?, असं विचारायला लागले. म्हटलं, त्याला माहितीये ना मी त्याची बायको आहे आणि मला माहिती आहे ना तो माझा नवरा आहे. तुला माहित असो किंवा नसो. मला काय फरक पडतोय. म्हणजे ते घातल्याने काय होणार आहे? मला मंगळसूत्र खूप आवडतं. तो खूप सुंदर दागिना आहे, असं माझं मत आहे. पण ते माझ्या मनावर आहे. माझ्या मनात असेल तेव्हा मी साडी, गजरा, टिकली, सगळं म्हणजे बापरे आणि नाही तर नाही. पण मी हे तुमच्यासाठी करत नाही.”

पुढे ती सांगते, “मी माझ्यासाठी करते. मला माहिती आहे. माझं लग्न झालंय. मंगळसूत्र घातलं काय किंवा न घातलं काय.मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ते त्याला (नवऱ्याला) नाही विचारत? की अरे तुझं लग्न झालंय ती मुलगी किती छान दिसते असं का म्हणालास तू? असं नाही होतं ना म्हणजे तो सहज गप्पा मारतो ना. अरे ही किती छान दिसते, ते चालतं. तर असे बोर लोकं असतात. त्यांना माझ्या मते वेल्ला टाइम असतो वेल्ला. आणि घरी वेळीच लहानपणी आईने फटके नाही घातले ना. मला तर नेहमी असं वाटतं, आईने वेळीच धपाटे घालते असते ना तर ही वेळ नसती आली,”

हेही वाचा : पन्नाशी ओलांडलेल्या महिला इंन्फ्युएन्सर्स! वयाची चौकट मोडून निर्माण केलं स्वत:चे स्थान, पाहा कोण आहेत त्या?

स्त्रीधन महत्त्वाचं, पण नेहमी का घालायचं?

हो, मंगळसुत्र स्त्रीधन आहे. सौभाग्यालंकारातील सर्वश्रेष्ठ अलंकार आहे. पण नेहमी घालायचा अट्टहास कशासाठी? प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. जो तो त्याच्या आवडी-निवडी प्रमाणे कपडे दागिने घालू शकतो. त्यामुळे लग्नानंतर महिलांनी सतत मंगळसूत्र घालावे, ही अपेक्षा चुकीची आहे. तिला आवडेल तेव्हा ती मंगळसूत्र काय तर कोणताही दागिना घालून शकते. तिला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, हे विसरता कामा नये.

कोणतीही परंपरा फक्त स्त्रियांच्या पदरी का?

भारतीय संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून स्त्रिची प्रतिमा पतीच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी अशी रेखाटली आहे. त्यामुळे नवऱ्यासाठी कपाळावर टिकली लावणे, भांगात कुंकू भरणे, गळ्यात मंगळसूत्र घालणे हे फक्त महिलेकडून अपेक्षित केले जाते पण लग्नानंतर पुरुष पत्नीसाठी काय वेगळं परिधान करतो, याचा विचार केला तर असमानता दिसून येईल. आज स्त्री सुशिक्षित झाली आहे. तिला चांगल्या वाईट, उचित अनुचित काय आहे, याबाबत ती वेळोवेळी सतर्क राहते. ‘नाही’ ला ‘नाही’ आणि ‘हो’ ला हो म्हणण्याची ताकद स्त्रियांकडे आहे. त्यामुळे हल्ली महिला मंगळसुत्राबाबतही खूप स्पष्ट मत मांडताना दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण कुठून सुरू झाले?

मंगळसूत्राचे हे प्रकरण नेमकं कुठून सुरू झाले आणि हा विषय आता का चर्चेत आला आहे? असा प्रश्न तु्म्हाला पडू शकतो. राजस्थानच्या एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते,“काँग्रेसने ज्या योजना आणल्या त्यातून त्यांची धोरणं जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांना सगळी मदत करणं आहे. जे घुसखोर आहेत त्यांना काँग्रेसची मदत होते आहे. मी माता भगिनींना सांगू इच्छितो की यांचा अर्बन नक्षलवादाचा विचार हा तुमच्या गळ्यात तुमचं मंगळसूत्रही ठेवणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक जण यावर व्यक्त होताना दिसत आहे.