दररोज नोकरीनिमित्त प्रवास करताना महिला सुरक्षा, महिला डब्यातील फेरीवाल्यांचा वावर, गरोदर आणि आजारी महिला, महिला डब्यांची संख्या वाढीची गरज इत्यादी समस्या लता ताईंच्या लक्षात आल्या. तेव्हा महिलांचे हे प्रश्न घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांच्या सातत्याने भेटी, त्यासाठी लागणारी निवेदनं, त्यावर महिलांची स्वाक्षरी मोहीम हे धडक काम लताताईंनी सुरू केले. अन्यायाला प्रतिकार करण्याची ताकद आणि नेतृत्व गुण लत ताईंच्या अंगी बालपणापासून मुरलेला आहे.

काळाचौकी येथील अभ्युदय नगर परिसरात लताताईंचे बालपण गेले. स्वाभिमान, नेतृत्व या गुणांबरोबर वैचारिक बैठक येथेच तयार झाली. मध्यमवर्ग व कनिष्ठ मध्यमवर्ग, कामगार वस्ती, लालबावटा कामगार संघटना, संघटनेचे नेते, कामगारांचे हक्क आणि अधिकार यांसाठी होणाऱ्या चळवळी, या संघटनेच्या सभा यांचा संस्कार लताताईंवर हात गेला आणि नेतृत्व करण्याचं बाळकडू त्यांना इथूनच मिळालं.

हे ही वाचा… समुपदेशन…. तुम्ही कर्मकांडाचा अट्टाहास करीत आहात का?

शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर १९८४ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचानालनालयात लताताईंना नोकरी लागली. अन्यायाचा प्रतिकार करणं हे स्वभावच असल्याने या कार्यालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात दाद मागण्याचा चंग लताताईंनी बांधला. १९९३मध्ये स्थापन झालेल्या राज्य कर्मचारी संघटनेमध्ये सदस्य म्हणून लताताईंनी काम करायला सुरुवात केली. राज्य कर्मचारी संघटनेमार्फत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला.

स्वतःची नोकरी आणि काम सांभाळून लताताईंना कर्मचारी संघटनेचे काम करणे शक्य झाले ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तसेच सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे असे त्या सांगतात. त्यांच्या कामाचा आवाका बघून त्यांची राज्य कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड झाली.

नोकरी करत असल्याने डोंबिवली ते सीएसएमटी असा रोजचा प्रवास लताताई करत होत्या. डोंबिवली हे फार पूर्वीपासून गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखले जाते. रोजच्या प्रवासात लोकलमध्ये सकाळ-संध्याकाळच्या मैत्रिणींचा समूह तयार झाला. हा प्रवास करताना प्रवासी महिलांचे अनेक प्रश्न लताताईंच्या लक्षात आले. मग महिलांचे हे प्रश्न घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांच्या सातत्याने भेटी घेणं, त्यासाठी लागणारी निवेदनं, त्यावर महिलांची स्वाक्षरी मोहीम हे धडक काम लताताईंनी सुरू केले. यामध्ये त्यांच्या रेल्वे प्रवासातील मैत्रिणींनी त्यांना उत्तम साथ दिली. त्यांच्या या कामाची दखल रेल्वे प्रवासी महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष विश्वनाथ धात्रक यांनी घेतली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे २०१० मध्ये लताताईंनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्य म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. २०१० मध्ये सुरू केलेलं रेल्वे प्रवासी महासंघाचे काम करताना महासंघाचे संस्थापक व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे प्रवाशांना नेहमी चांगल्या सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी लताताईंनी अथक प्रयत्न केले आणि हे काम सुरूच आहे. त्या वेळप्रसंगी मंत्री, आमदार, खासदार, रेल्वे प्रशासन यांना जाब विचारण्याचेही धाडस दाखवतात.

हे ही वाचा… २० व्या वर्षी लग्न; वयाच्या चाळीशीत ८ हजारांचं कर्ज घेऊन आज उभं केलंय ८०० कोटींचं साम्राज्य; बॉलीवूडमध्येही योगदान, कोण आहेत ‘त्या’?

गेल्या काही वर्षांपासून प्रचंड गर्दीमुळे डोंबिवली ते दिवा दरम्यान चालत्या लोकलमधून पडून जबर जखमी झालेल्या प्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ अस्वस्थ करणारी आहे. त्यांना लवकरात लवकर औषधोपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज आहे. आणि त्यासाठी डोंबिवली ते मुंब्रा रेल्वेला समांतर रस्त्याची मागणी महासंघाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम महासंघाच्या अध्यक्ष या नात्याने लताताई करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना काळात राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडे सतत संपर्क करत लाखो उपनगरीय रेल्वे प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करण्याची परवानगी लताताईंनी प्रवासी महासंघाचे माध्यमातून मिळवून दिली होती. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घाटकोपर स्टेशनवरील अपघातात आपले हात गमावलेली मोनिका मोरे, गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत पावलेला डोंबिवलीचा भावेश नकाते यांना न्याय मिळवा म्हणून रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्ष, रेल्वेमंत्री यांना भेटून प्रसंगी रस्त्यावर उतरून त्यांचा निषेध करण्याचे धाडस लताताईं व सोबत प्रवासी महासंघाने दाखवलं. प्रवाशांची गैरसोय, त्यांची सुरक्षितता याविषयी अत्यंत पोटतिडकीने बोलण्याची रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. त्ंयानी प्रवाशांच्या समस्यांची दखल घेण्यास रेल्वे प्रशासनालाही भाग पाडले. याचेच फलित म्हणून उपनगरीय रेल्वे स्टेशनवर मोठे ब्रिज, लिफ्ट, सरकते जिने व इतर अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. गेली २५ वर्षे लताताई रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी सातत्याने काम करत आहेत. रेल्वे प्रशासनाशी प्रसंगी लढा देत आहेत, त्यांच्या या कामाला काही अंशी यशही आले आहे. गरोदर महिलांना अपंगांच्या डब्यांमधून प्रवास करण्याची परवानगी आणि महिलांसाठी टिटवाळा आणि बदलापूर वरून सुटणाऱ्या लोकलमध्ये महिलांकरिता विशेष ३ डबे राखीव ही त्याची महत्त्वाची कामे आहेत.