Loksabha Election 2024 : सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. १९ एप्रिल ते १ जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पाड पडतील. कोणता पक्ष निवडून येणार, कोणाच्या खांद्यावर देशाची धुरा येईल, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. एक सुजाण मतदार म्हणून योग्य उमेदवार निवडून आणणे, ही आपली जबाबदारी आहे, पण मत दिल्यानंतर उमेदवाराने आपली जबाबदारी पार पाडली नाही, तर मतदार निराश होतो.

दर पाच वर्षांनी निवडणुका येतात पण देशातील अशा अनेक समस्या आहेत ज्या नेहमीच अनुत्तरित राहतात. विशेषत: महिलांच्या समस्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मतदार म्हणून महिलांची भूमिका जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

२०१९ – २०२४ अन् महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच…

स्त्री शिक्षण, स्त्री आरोग्य, स्त्री सुरक्षा, स्त्री स्वातंत्र्य याविषयी आपण नेहमी बोलतो; पण खरंच स्त्री सुरक्षित आहे का, असा प्रश्न विचारला तर २०१९ पासून ते २०२४ पर्यंतची सर्व प्रकरणे समोर येतील. मग २०१९ मध्ये हैद्राबाद येथील प्रियंका रेड्डीचं बलात्कार प्रकरण असो, २०२० ला हाथरस येथे १९ वर्षीय दलित मुलीवर केलेला सामूहिक बलात्कार असो एवढंच काय तर महाराष्ट्रात सुद्धा २०२१ मध्ये उस्मानाबादमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता, २०२२ मध्ये साताऱ्यात लिंबू डोक्यावर फिरवून कथित जादूटोणा करत तरुणीवर बलात्कार करण्यात आला. २०२३ मधील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि दर्शना हत्या प्रकरण आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये एका पर्यटक महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे प्रकरणही ताजे आहे… यापेक्षाही दुर्दैवाची बाब म्हणजे न्याय मागणाऱ्या ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकला यावर्षी अखेर कुस्ती सोडावी लागली. स्त्री स्वातंत्र्य सोडा, पण स्त्री सुरक्षा ही दूरपर्यंत कुठेच दिसत नाही.

मग अशात निवडणूकीत कोणाला निवडून द्यावे, हा प्रश्न महिलांना कायम पडतो. काही तरुणींशी संवाद साधला ज्या पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदान करताना त्या महिला म्हणून कोणत्या पक्षाला मतदान करणार, त्यांना नेता कसा असावा असे वाटते, याशिवाय महिलांचे प्रश्न समजून त्यांची या लोकसभा निवडणुकीविषयी काय भूमिका आहे, याविषयी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

१. महिला सुरक्षेच्या बाबतीत आताचं सरकार कुठेतरी मागे पडतं

जनतेसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी कोणता उमेदवार कोणत्या सुविधा पुरवणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उमेदवाराने अशी कामे करावीत की, लोकांनी त्यांचे कामे पाहून त्यांना मतदान केले पाहिजे. सध्या आमदार सहज पक्ष बदलताहेत पण पक्षांतर करणे खूप चुकीचे आहे, पक्षाची साथ सोडू नये असे मला वाटते. महिलांच्या हिताचा विचार केला तर महिला सुरक्षेसाठी आताचं सरकार कुठेतरी मागे पडतंय. दर दिवशी महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येतात. अशावेळी कारवाई किंवा शिक्षा होणे गरजेचे आहे. मला एक महिला पंतप्रधान म्हणून बघायला आवडेल. स्मृती इराणी यांनी पंतप्रधान व्हावं असं मला वाटतं.

– तनिषा परदेशी

२. एक महिला उमेदवारच महिलांना समजू शकते.

लोकसभेत मतदान करताना जो उमेदवार जनतेच्या समस्या दूर करेल, त्यालाच मतदान करायला आवडेल. निवडून आलेल्या उमेदवाराकडून कोणती अपेक्षा ठेवावी या पेक्षा जास्तीत जास्त महिला उमेदवार निवडून याव्यात, असा मी विचार करते. एक महिला उमेदवारच महिलांना समजू शकते. बेरोजगारी कमी करणे, शेतकऱ्यांना मदत करणे, स्त्री सुरक्षेसाठी पुढे येणे इत्यादी गोष्टी निवडून आलेल्या नेत्याने न सांगता केल्या पाहिजे. पक्षफुटी असो किंवा पक्षांतर बघून वाटतं की फसवणूक सगळीकडे होत आहे, पण आपण जिथे आहोत तिथे राहावं. प्रामाणिकपणे राहावं, मतभेद होत असतात पण असे पक्ष बदलणे खूप चुकीचे आहे.

महिलांवर बलात्कार आणि अत्याचाराच्या अनेक घटना समोर येतात, मला वाटते की सरकारने महिला सुरक्षेच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. अनेकदा महिला बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा होते पण शिक्षा संपल्यानंतरही त्यांची विकृती संपत नाही. त्यांना कठोर शिक्षा होणे खूप गरजेचे आहे. शिवाजी महाराजांच्या काळात अशा लोकांना कठोर शिक्षा व्हायच्या. आपण सुद्धा असा कठोर कायदा करावा.

– समृद्धी दळवी

हेही वाचा : Shreyanka Patil : आरसीबीची चाहती बनली आरसीबीचीच स्टार! कोण आहे २१ वर्षीय श्रेयंका पाटील? जाणून घ्या, तिचा रोमांचक क्रिकेटचा प्रवास

३. महिला सुरक्षेचा मुद्दा कायमच चिंतेचा विषय आहे

मतदान करणे ही माझी जबाबदारी आहे पण ज्या उमेदवाराला मी निवडून देत आहे त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की, त्यांनी जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्यात. खरं तर गावात खूप समस्या आहेत, कित्येक गावात वीज नाही, प्यायला पाणी येत नाही, शौचालय नाही, याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे. महिला सुरक्षेचा मुद्दा कायमच चिंतेचा विषय आहे. बलात्कारची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. आरोपींना शिक्षा होते, पण पैसे देऊन त्यांना सोडून दिले जाते,असे ऐकिवात आहे. पक्षांतराच्या बाबतीत बोलायचं तर अनेक पक्षातील नेत्यांचा त्यांच्याच पक्षातील लोकांबरोबर मेळ नाही. एक चूक लपवण्यासाठी दुसऱ्या पक्षात जातात, हे खूप चुकीचे आहे.

– साक्षी कोंडे

४. पक्षापेक्षा देशाचा विकास जास्त महत्त्वाचा.

जो पैशांचा किंवा स्वत:चे खिसे भरण्याचा विचार करत नाही तर
फक्त जनतेचा विचार करतो, अशा उमेदवारालाच मी मतदान करेन. उमेदवारांनी जनतेचा विचार करावा. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करावा. गोरगरीबांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या गरजा पूर्ण करणे गरजेचे आहे. मतदाराची नेहमीच फसवणूक होते. मते मिळाली की, जनतेला विसरतात. फक्त जनतेचे मत घेण्यासाठी येतात पण त्यांच्या गरजा किंवा सुविधा यांची चौकशी करण्यासाठी कोणताही नेता निवडून आल्यानंतर कधीही दिसत नाही.

महिला सुरक्षेसंदर्भात सांगायचं तर अनेक कठोर कायदे तयार करण्याची आवश्यकता आहे किंवा जे कायदे आहेत त्याची योग्य अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, जे अजूनही होत नाही. उमेदवारांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, पक्षापेक्षा देशाचा विकास जास्त महत्त्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक नेत्याने देशाच्या विकासाचा विचार करायला हवा. सुप्रियाताईंनी देशाचे नेतृत्व करावे, असे मला वाटते.

– दिव्या अरगाडे

५. महिला सुरक्षेसाठी कायदे आहेत पण त्याची नीट अंमलबजावणी होताना दिसत नाही.

लोकसभेसाठी मी पहिल्यांदा मतदान करणार आहे. मी भारताची एक जबाबदार नागरिक होण्याचा प्रयत्न करणार आहे. आपलं मत एका अशा चांगल्या नेत्याला दिलं पाहिजे ज्यामुळे आपल्याला फायदा होईल आणि आपला विकास होईल, असं मला वाटतं. याशिवाय सध्या जे दिसतंय त्यावरून सांगतेय की, पक्षफुटी किंवा पक्षांतर करणे खूप चुकीची गोष्ट आहे. काम करायचं आहे तर कोणत्याही पक्षातून जनतेसाठी काम करू शकतात.
महिला सुरक्षेच्या बाबतीत आपल्या देशात महिला अद्यापही सुरक्षित नाही. कायदे केले आहे पण त्याची नीट अंमलबजावणी होताना दिसत नाही. कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे. रात्री अपरात्री बाहेर पडावे का, असा प्रश्नच महिलांना कधीच पडू नये, इतकी सुरक्षा आपल्या देशात असणे गरजेचे आहे.

– स्वामिनी रोडे

६. मतदारांची फसवणूक करू नका

एक मतदार म्हणून मला असं वाटते की, माझं मत वाया जाऊ नये. जे सरकार जनतेची सेवा करणार, त्यांच्या हितासाठी लढणार अशा लोकांना मी मत दिलं पाहिजे. नेत्याने त्याच्या मतदारसंघात विकास कामे केली पाहिजेत. उमेदवाराने लोकांचा विचार करणे गरजेचे आहे. कारण मतदार त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून देतात. मतदारांची फसवणूक करू नका, हेच माझे म्हणणे आहे. याशिवाय सुप्रियाताई सुळे या अशा नेत्या आहेत ज्या महिलांसाठी काम करू शकतात. त्यामुळे त्यांचं नेतृत्व यावं,असं मला वाटतं.

– साक्षी तिळेकर

महिला मतदारांनी पुढे येऊन महिलांच्या समस्या मांडणे खूप गरजेचे आहे. मतदानाचा हक्क महिला- पुरूष दोघांना समान आहे पण अशावेळी आपल्या हक्कासाठी महिलांनी लढायला हवे आणि एका पात्र उमेदवाराला निवडून द्यायला हवे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणींनी लोकसत्ताशी बोलताना त्यांचे विचार मांडले. यंदाच्या लोकसभेच्या निवडणूकीविषयी तुमचे काय मत आहे, आम्हाला नक्की सांगा.