पश्चिम बंगालमधील एका छोट्याशा गावातील एक त्रिकोणी कुटुंब. आई-बाबा आणि एकुलती एक मुलगी. तीदेखील हुशार. अशावेळेला, घरच्यांची लेकीकडून काय अपेक्षा असणार, तर तिने डॉक्टर्स-इंजिनिअर किंवा प्रोफेसर यांपैकी कोणतेही क्षेत्र करिअर म्हणून निवडावे आणि आयुष्यात सेटल व्हावे. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
ही कहाणी आहे प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर अपरूपा डे हिची. प. बंगालमधील तिहाना या एका छोट्याशा गावात अपरूपा आपल्या आई-वडिलांबरोबर राहत होती. निसर्गरम्य अशा गावात चारचौघींप्रमाणे अपरूपाचेदेखील आयुष्य सुरळीत चालू होते. मुळातच अभ्यासात हुशार असल्यामुळे दहावी -बारावीच्या पायऱ्या यशस्वीरित्या पार केल्या. भौतिकशास्त्र या विषयात रस असल्यामुळे पुढे याच विषयात मास्टर्स करायचे असे निश्चित केले.
एके दिवशी सहज फिरायला म्हणून कॅमेरा घेऊन आपल्या कुटुंबियांबरोबर गावाच्या जंगलात गेली. तिथे गंमत म्हणून भरपूर फोटो काढले. आणि त्या दिवसापासून तिच्यात फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. कधीही फावला वेळ मिळाला की ती आईबरोबर जंगलात फोटोग्राफी करायला जात असे. आईलादेखील जंगलची चांगली माहिती असल्यामुळे आई तिला फोटो काढण्याबाबत मार्गदर्शन करीत असे.
हा सराव करता करता अपरूपादेखील आता वेगळ्या कोनातून फोटो घेऊ लागली. तिची ही आवड बघून तिच्या वडिलांनी तिला खास स्वरुपाची लेन्स असलेला कॅमेरा आणून दिला. त्यामुळे अपरूपाला आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफर हे क्षेत्र करिअर म्हणून खुणावू लागले. तेव्हा घरच्यांनी समजाविले की, हौस म्हणून हे ठीक आहे. आधी शिक्षण पूर्ण कर आणि मग जे करायचे आहे ते कर. या क्षेत्राकडे कसे काय वळलो, यामागचा रंजक किस्सा सांगताना दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, घराबाहेर ठेवलेले अन्न, देवासमोरचा प्रसाद अचानकपणे गायब होऊ लागला. यामागच्या कारणाचा शोध चालू असताना,अचानकपणे एक दिवस एक जंगली जनावर देवासमोरील प्रसाद खाण्यासाठी आले, त्यावेळी पट्कन कॅमेऱ्यामध्ये तिने त्याची हालचाल टिपली आणि सहज म्हणून तो फोटो सोशल मिडीयावर प्रसिद्ध केला.
हा फोटो पाहून, परिचयातली एक व्यक्ती म्हणाले की, हा प्राणी आमच्या घरीसुद्धा येतो. या जंगली जनावराचा कसा बंदोबस्त करायचा याचा मी विचार करीत होतो. पण तुझ्या फोटोखाली लिहिलेल्या ओळी वाचून मीदेखील आता त्याच्यासाठी घराबाहेर अन्न ठेवत जाईन.
यावरून मला समजले की,ए क छोटासा फोटो खूप काही बदलू शकतो. मग हळूहळू जंगलात जाऊन प्राण्यांचे वेगवेगळ्या कोनातून फोटो टिपण्याचा छंद जडला. एका विशिष्ट प्रकारच्या तोंड असलेल्या मगरीच्या पाण्यातला फोटोला वाईल्डलाईफ फोटोग्राफीकडून विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा फोटो चांगलाच चर्चेत राहिला. तेव्हा आता हेच आपले करिअर असं ठरवलं.
भौतिकशास्त्रात मास्टर्स पूर्ण केल्यानंतर, वाईल्डलाईफ फोटोग्राफीचे युट्यूबवरील व्हिडीओ बघून त्या संदर्भात संशोधन करून स्वत:च ते तंत्रज्ञान आत्मसात केले. आणि वेगवेगळ्या जंगलात जायला सुरुवात केली.
या क्षेत्राविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करताना दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणते की, माझ्या या निवडीला आई-वडिलांनी नेहमीच मला पाठिंबा दिला आहे. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा ते माझ्यासोबत जंगलात येत असत.
खरं तर हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. एकटी मुलगी तीदेखील जंगलात जाऊन काम करणार याचा खूप ताण नातेवाईकांनी-परिचयातील लोकांनी आम्हाला दिला. दरवेळी आई किंवा वडिलाना सतत बरोबर जंगलात येणं शक्य नसायचे. शिवाय कधी कधी अपेक्षित फोटो टिपण्यासाठी बराच वेळ भयाण शांततेत बसून राहावे लागत असे. प्राणी यायच्या वेळा एकतर भल्या पहाटेच्या किंवा संध्याकाळ नंतरच्या असे. शिवाय जंगलच्या पार आत जायचे असेल तर तुम्हाला गाडीदेखील नीट चालविता आली पाहिजे. त्यामुळे गाडी चालवायला शिकले.
फोटोग्राफी करीत असताना माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. माझ्यातला संयम तर चांगलाच विकसित झाला. पण एखादी गोष्ट करायची असे जर का मनापासून ठरविले तर त्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करता येते. आता हेच पाहा ना, बऱ्याचदा फोटोग्राफीच्या निमित्ताने वेगवेगळ्या परिसरातील जंगले पालथी घालावी लागतात. कित्येकदा अनोळखी परिसरात एकट्याने हिंडावे-फिरावे लागते. अनेक रात्री रेल्वे स्थानकावर थांबवून काढल्या आहेत.
पण त्याही परिस्थितीत वेळोवेळी फोनद्वारे मी कुटुंबियांच्या संपर्कात असते. केवळ एक मुलगी आहे म्हणून आव्हाने स्वीकारू नये, हा दृष्टीकोन माझ्या पालकांनी कधीच माझ्यासमोर ठेवला नाही याचा मला खूप अभिमान आहे.
अपरूपाच्या फोटोंची भुरळ फक्त भारतीयांनाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील पडली आहे. नॅशनल जिओग्राफी, बीबीसी अर्थ, ॲनिमल प्लॅनेट यँसारख्या अनेक मान्यवर संस्थांनी तिच्या कामाची दखल घेतली आहे. इतकेच नाही तर निकोन इंडियाची ती ब्रांड ॲम्बेसिडरदेखील आहे. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या फोटोग्राफरच्या दृष्टीने ही खरोखरीच अभिमनास्पद अशी कामगिरी आहे.
सोशल मिडीयावरील अपरूपाचे प्रसिद्ध झालेले फोटोज किंवा व्हिडीओ तुम्ही पहिले तर, तुम्हाला सहज जाणविल की तिचे फोटो खूप काही बोलून जातात. मग ते फोटो प्राण्यांचे असो वा पक्ष्यांच्या विविध मूड्स मधले, त्यांच्या रंगछटा, त्यांच्या लकबी, त्यांचे भाव मनावर एक वेगळीच जादू करतात.
करिअरचे क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येकाची अशी काही खास आव्हाने असतात. अपरूपा या आव्हानांना नुसतीच भिडत नाही तर त्यातून एक जादुई दुनिया आपल्यासमोर मांडते. भारतातील मोजक्याच महिला वाईल्डलाईफ फोटोग्राफरपैकी एक असलेल्या अपरुपाची ही यशोगाथा वेगळी वाट चोखाळणाऱ्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.