डॉ. निर्मला रवींद्र कुलकर्णी
कोणतीही देवता देवतास्वरूप कधी धारण करते? तर तिच्या कोणत्यातरी गुणाने ती जनमानसावर ताबा मिळवते तेव्हा. ही महागौरी शांत आणि पवित्र आहे. ती ठामही असावी. शुभ्रता तिचा भाग बनून गेली आहे. शुभ्रता हे अमलत्व, कोणताही मल नसण्याची स्थिती आहे. कोणत्याही वाईट‌ विचारानं तिचं मन गढूळ झालेलं नाही. पांढरा रंग शांततेचा द्योतक आहे. मनुष्याला फक्त भौतिक समृद्धीची आस नसते, तर शांतता त्याला अधिक हवीहवीशी वाटते. सहस्रारचक्राशी संबंधित अशी ही देवता आहे.‌ भक्तांना सद्विचार शिकवणारी आहे.

दुर्गादेवीला साधारणतः इ.स.पू. ७०० पासून भारतीय जनमानसामध्ये स्थान आहे हे ग्रांथिक उल्लेखावरून समजते. तिची अनेक रूपे ग्रंथांमधून आणि मूर्तींमधून वर्णन केलेली आढळतात. स्थानपरत्वे आणि कालपरत्वे या मूर्ती बदलत जातात. दुर्गादेवी नऊ प्रकारच्या मूर्तीमध्ये किंवा यंत्रामध्येही चित्रित करण्याची पद्धत आहे. काही मंदिरांमध्ये नऊ दुर्गा शिल्पांमध्ये एकत्र दाखवण्याचीही पद्धत आहे.

भविष्यपुराणात स्कंदयामल तंत्रग्रंथांचा उल्लेख करून या नऊ दुर्गांची लक्षणं सांगितली आहेत. यामधल्या मुख्य दुर्गेला अठरा हात असतात. ती मातृस्वरूप असल्यामुळे तिचे स्तन आणि मांड्या विशाल असतात. ती विविध अलंकारांनी नटलेली असते. तिच्या भोवतीच्या दुर्गांना सोळा हात असतात. अर्थातच अशा अनेक हात असलेल्या दुर्गा शिल्पांमधून एकत्र दाखवणं कठिण आहे. या दुर्गा सध्याच्या प्रचलित नवदुर्गांहून वेगळ्या आहेत.

त्यांची नावे पुढीलप्रमाणे – रुद्रचण्डा, प्रचण्डा, चण्डोग्रा, चण्डनायिका, चण्डा, चण्डवती, चण्डरूपा, अतिचण्डिका आणि उग्रचण्डिका.

मधली दुर्गा अग्निवर्णाची. इतर दुर्गाचे वर्ण गोरोचना, लाल, काळा, निळा, पांढरा, करडा, हळदीचा पिवळा आणि गुलाबी असतो. मधली दुर्गा आलीढासनामध्ये असते. आलीढासन ही एक उभं रहाण्याची स्थिती आहे. यांमध्ये उजवा पाय पुढे असतो आणि डावा पाय मागं असतो. योगासनांमध्ये वीरासन असतं तशी साधारण स्थिती असते. तिच्याजवळ सिंह दाखवलेला असतो. तिने एका हातात असुराचे केस पकडलेले असतात. इतर दुर्गा कमलाकार रथात बसलेल्या दाखवतात.

मार्कंडेय पुराणात आलेल्या देवी माहात्म्यामध्ये दुर्गम राक्षसाचा देवीने वध केला म्हणून तिला दुर्गा म्हणतात‌ असं म्हटलं आहे. अशा रीतीने पार्वतीची अनेक रूपं आहेत, अनेक नावं आहेत.‌ प्रत्येक नावाची व्युत्पत्ती देणाऱ्या कथाही काही ग्रंथांमध्ये येतात. वर वर्णन केलेल्या प्रत्येक नवदुर्गेचा चण्ड या शब्दाशी संबंध आहे. परंतु आधुनिक नवदुर्गांपैकी एक कालरात्री सोडली तर बाकी सर्वजणी अगदी सौम्य वाटतात. गौरीच्या बाबतीतही असेच म्हणता येईल.

विष्णुधर्मोत्तरपुराणामध्ये गौरीच्या मूर्तीचे लक्षण दिले आहे ते असे-

गौरी कुमारिकारूपा ध्यायमाना महेश्वरैः।

वरदाभयहस्ता सा द्विभुजा श्रेयसे सदा।।

गौरी ही कुमारिकेच्या रूपात दाखवावी. श्रेष्ठ देव ( किंवा शंकर) तिचे ध्यान करतात. तिला दोन हात दाखवावेत. एक हात वरद मुद्रेमध्ये आणि दुसरा अभय मुद्रेमध्ये दाखवावा. वरदमुद्रेमध्ये (डावा) हाताची बोटे खालच्या बाजूला वळवून दाखवतात आणि अभयमुद्रेमध्ये उजव्या हाताची बोटे वरच्या बाजूला वळलेली दाखवणात. वरद म्हणजे वर, ईप्सित गोष्ट देणारा हात. अभय म्हणजे ‘ घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.’ असं सूचित करणारी हाताची स्थिती.

धर्मशास्त्रामधला ‘अष्टवर्षा भवेद्गौरी’ (मुलगी आठ वर्षांची झाली की ती गौरी होते.) हा दंडक विष्णुधर्मोत्तरासमोर असावा. म्हणून तिला ‘कुमारिका’ म्हटले आहे.

विष्णुधर्मोत्तरातला पुढचा श्लोक पुढीलप्रमाणे आहे

अक्षसूत्राभये पद्मं तस्याधश्च कमण्डलुः।

गौर्या मूर्तिश्चतुर्बाहुः कर्तव्या कमलासना।।

गौरीची मूर्ती चार हात असललेलीही करावी. एका हातात जपमाला, दुसऱ्या हात अभयमुद्रेमध्ये, तिसऱ्या हातात‌ कमळ आणि यांच्या खालच्या हातात‌ कमण्डलू‌ दाखवावे. ती कमलावर बसलेली करावी. साहित्यामध्ये पार्वतीचे गौरी हे नाव म्हणूनच वापरले जाते. ती गौरवर्णी होती, म्हणून ती गौरी आहे.‌

रूपमंडन नावाचा एक संस्कृत ग्रंथ आहे. त्यामध्ये गौरी ‘गोधासना’ दाखवावी असं सांगितलं आहे. गोधा म्हणजे मगर. पार्वती, चंडी आणि गौरी यांच्या मूर्तींच्या पायापाशी अनेकदा मगर दाखवतात, त्यांचे ते वाहन असावे. बंगालमधल्या गौरीच्या किंवा चंडीच्या काही मूर्तींच्या पायापाशी मगर दाखवलेली असते.

कामरूप म्हणजे आसाम.‌ आज तिथे कामाख्या देवीचं मंदिर आहे. पण सातव्या शतकात‌ ह्यू एन् त्संग आसामात काही काळ राहिला होता. तो कामाख्येचा उल्लेख करत नाही. याचा अर्थ सातव्या शतकात ही देवी तेवढी प्रसिद्ध नसावी. दहाव्या शतकामध्ये तिथे वनमाल नावाचा राजा राज्य करीत‌ होता. तसंच बाराव्या शतकात इन्द्रपाल नावाचा राजा राज्य करत होता. त्यांच्या अभिलेखांमध्ये आज कामाख्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीचे नाव महागौरी होते असे दिसते. कामाख्या ही कुमारिका म्हणून ओळखली जात नाही.

परंतु देवीकवचामधल्या नवदुर्गामध्ये समाविष्ट झालेली महागौरी वरील वर्णनापेक्षा बरीच वेगळी आहे. ती कुमारिका नाही. ती वयानं प्रौढ असावी. तिचा मंत्र तिचं वर्णन करतो ते असे –

श्वेते वृषे समारुढा श्वेताम्बरधरा शुचिः।

महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।

(पांढरा बैल हे तिचं वाहन आहे. शुभ्र वस्त्रे धारण करणारी, पवित्र आणि महादेवाला आनंद‌ देणारी ही महागौरी मला शुभ फल‌ देवो.)

या नवदुर्गा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या अवस्था आहेत असे म्हटले तर हे वर्णन‌ प्रौढ स्त्रीचेच वाटते. ती आपल्या पतीला आनंद देते आहे. ती कालीप्रमाणे भयावह नसून, पवित्र आणि सौम्य आहे.

कोणतीही देवता देवतास्वरूप कधी धारण करते? तर तिच्या कोणत्यातरी गुणाने ती जनमानसावर ताबा मिळवते तेव्हा. ही महागौरी शांत आणि पवित्र आहे. ती ठामही असावी. शुभ्रता तिचा भाग बनून गेली आहे. शुभ्रता हे अमलत्व, कोणताही मल नसण्याची स्थिती आहे. कोणत्याही वाईट‌ विचारानं तिचं मन गढूळ झालेलं नाही. पांढरा रंग शांततेचा द्योतक आहे. मनुष्याला फक्त भौतिक समृद्धीची असं नसते, तर शांतता त्याला अधिक हवीहवीशी वाटते. सहस्रारचक्राशी संबंधित अशी ही देवता आहे.‌ भक्तांना सद्विचार शिकवणारी आहे.