नागरी सेवा परीक्षा ही भारतातील एक देशव्यापी स्पर्धात्मक परीक्षा आहे. परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारत सरकारच्या उच्च नागरी सेवांमध्ये भरतीसाठी घेतली जाते. यूपीएससीच्या उमेदवारांना ही परीक्षा पास होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. काही जणांना तर आयएएस, आयपीएस किंवा आयएसएस होण्यासाठी तीन ते चार प्रयत्न करावे लागतात. पण, अनेक जण याला अपवाद असतात. ते पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवतात. तर आज आपण अशाच एका खास महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची आता उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चला तर पाहूयात यांचा जीवनप्रवास.
उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव एस. एस. संधू यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता १९८८ बॅचच्या आयएएस अधिकारी राधा रतूडी यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्यामुळे आता उत्तराखंड राज्याला राधा रतूडी यांच्या रुपाने पहिल्या महिला मुख्य सचिव मिळाल्या आहेत.
कुटुंब :
आयएएस राधा रतूडी यांचे पती अनिल रतूडी हे उत्तराखंड पोलिस महासंचालक पदावरून निवृत्त झाले आहेत. तसेच त्यांचे वडीलही सरकारी कर्मचारी होते.
शैक्षणिक प्रवास :
आयएएस राधा रतूडी यांच्या करिअरची सुरुवात पत्रकारितेपासून झाली होती. त्यांनी मुंबईत १९८५ मध्ये इतिहास विषयात पदवी संपादन केली. मास कम्युनिकेशनमध्येही त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठात पब्लिक पर्सोनेल मॅनेजमेंटमध्ये एमए केले. यादरम्यान त्यांनी नागरी सेवांचीही तयारी सुरू केली.
हेही वाचा…आधी डॉक्टर अन् मग IAS अधिकारी! वाचा ‘डॉक्टर तनू जैन’ यांची प्रेरणादायी कहाणी…
राधा रतूडी यांची सुरुवातीला मध्य प्रदेशमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीत राधा रतूडी यांनी डेहराडूनच्या जिल्हाधिकारी, राज्य मुख्य निर्वाचन अधिकारी व अपर मुख्य सचिव महिला सशक्तीकरण म्हणून आदी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तसेच त्या दहा वर्षे उत्तराखंडच्या मुख्य निवडणूक अधिकारी होत्या.
तसेच राधा रतूडी यांच्याबद्दल खास गोष्ट सांगायची झाल्यास त्यांनी एकाच प्रयत्नात यूपीएससी, सीएसई परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. १९८५ मध्ये ग्रॅज्युएशननंतर त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना भारतीय माहिती सेवा १९८६ ची बॅच देण्यात आली. पण, तरीही त्या पुन्हा परीक्षेला बसल्या आणि आयपीएस झाल्या. तसेच तिसऱ्या प्रयत्नात भारतीय प्रशासकीय सेवेत आयएएस (IAS) म्हणून दाखल झाल्या.