प्राची साटम

‘१२ हॅक्स टू लूक गुड इन फोटोज्’, “क्या आपकी स्माइल अजीब है, जब आप हसते हो, तो क्या लोग आपपे हसते है, घबराईये नही, अब आ गया है हमारा प्रॉडक्ट जो ये सारी समस्याए दूर करेगा.” मागचे दोन तास सतत सुरु असणा-या इन्स्टाग्राम रील्स अखेर मी बंद केल्या आणि तयारी करण्यासाठी आरशासमोर उभा राहिलो. अजून एक फंक्शन, पुन्हा एकदा सगळ्यांशी खोटं खोटं गोड बोला आणि तेच तेच ते खोटं हसा. जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आपलं हसणं फारसं काही चांगलं नाही, हेही जाणवायला लागलं त्याला. सुंदर एकरेषीय दंतपंक्ती नाही पण निदान दिसायला बरी अशी दंतकळी तरी हवी होती असं मला सतत वाटे.

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

आजकाल मी मोकळेपणाने हसणं बंद केलंय, मी फार वाईट दिसतो तसं हसताना. एकदा हसताना अशीच माझी नजर समोरच्या आरश्यावर गेली आणि माझं सताड उघडलेलं तोंड, माझे मिचकुले झालेले डोळे पाहून माझं हसणं पार गायब झालं. मी इतका कुरुप दिसतो हसताना.. इतका कुरुप? माझा स्वतःवरच विश्वास बसेना. माझ्या आजुबाजूला असलेल्या लोकांनी मला हे कधीच सांगितलं कसं नाही… किंवा त्यांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला असेल ज्याच्याकडे माझं लक्षच गेलं नाही कधी?

माझं ते आरशातलं रुप पाहिल्यानंतर मी माझ्या हसण्याबाबतीत बराच सजग झालो. जेव्हा जेव्हा हसण्याचा प्रसंग येई तेव्हा तेव्हा मी स्वतःला आवर घाले, माझं हसणं नियंत्रित करुन ते चांगलं आणि आकर्षक कसं दिसेल याचा मी चक्क सराव करे. हळूहळू माझं मुक्तपणे हसणं बंद झालं, मी दोन मिनिटं विचार करुन मग हसायला लागलो.

त्या दिवशी मी तिच्या पलंगाशी बसलेलो, अंथरुणाला खिळलेल्या, स्वतःचं बोटही दुसऱ्याच्या मदतीशिवाय न हलवता येणाऱ्या माझ्या आज्जीची मालकी फक्त तिच्या डोळ्यांवर उरली होती. तिचं मरण आमच्यासकट तिच्याहीसाठी उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळा झाला होता. सध्या होणाऱ्या या लाहीलाहीतून तोच तर सर्वांना मुक्त करणार होता. तो दिवस कदाचित; तोच होता याची जाणीव तिला झाली असावी. मी बाजूला बसल्यावर ती मला पाहून चक्क हसली. अगदी गोड, मनापासून. आपल्याबरोबर खूप वेगळं काही घडणार आहे, आणि त्या वेगळेपणासाठी आपण मनापासून उत्सुक आहोत, असं जेव्हा वाटतं तेव्हा आपण जसे हसतो, अगदी तसंच हसली ती. त्यात कोणताही अभिनिवेश नव्हता, कोणताही खोटेपणा नव्हता, होता फक्त निर्मळ आनंद आणि लिंबूसरबतात टाकलेल्या मिठाएवढं दुःख.

हसण्यात बेमालूम मिसळलेलं ते दुःख त्या हसण्याची अवीट गोडी अजूनच वाढवत होतं. ती हसली आणि मला दिसलं तिचं बोळकं झालेलं तोंड, चेहऱ्यावर पसरलेलं सुरकुत्यांचं जाळं, सुकलेले ओठं, डोक्यावर कसेबसे टिकलेले दोन-चार केस, भुवयांच्या नावावर असलेल्या दोन बारीक रेघा… पण तिचं ते हसणं या सगळ्याच्या पलीकडचं होतं. तिचं हसणं ती तिच्या डोळ्यांतून व्यक्त करत होती. तिचे डोळे…प्रचंड थकलेले, निस्तेजाच्या पायरीशी उभे असलेले… आणि त्या हास्याने जणू काही, क्षणार्धात त्यांना तेजाची पायरी ओलांडायला भाग पाडलं होतं. ती खूप सुंदर दिसत होती तेव्हा… त्यानंतरच्या दोन सेकंदातच ती गेली. तिच्या डोळ्यातलं तेजही तिच्याबरोबरच निघून गेलं. जगणं जोपर्यंत सुसह्य असतं तोपर्यंतच ते मरणापेक्षा चांगलं असतं. पण ते हसणं, ते आता तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर पसरलं होतं. जाता जाता तिने मला माझं हसू परत मिळवून दिलं होतं. हास्य म्हणजे आपल्या मनाचा आरसा असतो, बाहेरचा, काचेचा आरसा त्या आतल्या आरश्याला कधीच पकडू शकत नाही. आता मी मनापासून हसतो..मनमुराद…मी माझं कुरुप हास्य लपवत नाही कारण ते लपवता येत नाही.