पावसाळा आला की रानभाज्यांची चर्चा सुरू होते. अनेक ठिकाणी रानभाज्या महोत्सव भरवले जातात. आपण सगळे या महोत्सवांना आवर्जून भेटही देतो. काही भाज्या हौसेने विकतही घेतो. या महोत्सवात मांडलेल्या भाज्या- ज्या पाऊसकाळात उगवलेल्या असतात तेवढ्याच रानभाज्या असतात. ठराविक कालावधीतच त्या उगवतात असा एक स्वाभाविक गैरसमज यामुळे पसरतो.
खरं तर कंदमुळं, पानं, फुलं, फळं अशा वनस्पतीजन्य सगळ्या भागांचा आपण आहारात उपयोग करत असतो. त्यामुळे वर्षभर आपल्या भोवताली असलेल्या वनस्पतींचा वापर आपण आपल्या आहारात करतो त्या रानभाज्याच तर असतात. जसा ऋतू असेल तशा भाज्या आपल्याला मिळत राहतात. त्यामुळे फक्त पावसाळ्यातच रानभाज्या मिळतात हा समज चुकीचा आहे. पावसाळ्यात पावसाच्या संतत धारेमुळे जमिनीतील सुप्त बीज अंकुरून जमीन हिरवीगार होते. भाजी म्हणून आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील अशा पुष्कळ वनस्पतींना धुमारे फुटतात. पण रानभाज्या म्हणून आपण जर व्याख्या करायला गेलो तर फक्त पावसाळ्यातच उगवणाऱ्या भाज्या अशी ही मर्यादित व्याख्या करता येत नाही. रानातल्या, परसातल्या, भोवतालच्या अशा सर्व वनस्पतींचा समावेश आपण रानभाजी या सदरात करू शकतो.
अळू, मायाळू, फोडशी, करटुलं, केना, कुर्डू, चिवळ, घोळ, आंबांडी या आता आपल्याला परिचित आणि आपल्या भाजी बाजारात पावसाळ्यात सहजी मिळणाऱ्या भाज्या आहेत. पावसाळ्यात तर या भाज्या मुबलक मिळतातच, पण अशा स्वच्छ नैसर्गिक पद्धतीने वाढणाऱ्या भाज्या आपल्याला वर्षभर मिळू शकतात. पावसाळ्यात दिंड्याची भाजी सर्वत्र आढळते. कोकणात सगळीकडे मुबलक प्रमाणात दिंडा वाढतो. रूंद हिरव्या पानांची आणि मजबूत देठाची ही भाजी पौष्टिक तर आहेच, पण चविष्टही आहे.
शेवग्याच्या शेंगांप्रमाणे हिचे लांब देठ सोलून घेऊन त्या देठांची भाजी केली जाते. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीने ही भाजी करतात. आपल्या नजरेला परिचित, पण गुणांनी अपरिचित अशी लोकवाड्.मयात स्थान मिळवलेली ही बहुगुणी भाजी एकदा तरी करून बघावी अशीच आहे.
अशीच एक दुसरी भाजी म्हणजे कुडा. कुड्याची फुलं, पानं आणि शेंगा या सगळ्यांची भाजी होते. कुड्याचं पाळ म्हणजे साल उगाळून देतात हे आपल्याला माहीत आहे. कुटजारीष्ट हे आयुर्वेदिक औषधेही आपल्याला ठाऊक आहे. पावसाळ्यात या कुड्याला भरपूर शेंगा धरतात. या कोवळ्या शेंगांची भाजी करतात. कुड्याला जेव्हा फुलं येतात तेव्हा त्यांच्या फुलांचीसुद्धा चवदार भाजी होते. जवळ जवळ वर्षभर वापरता येणारी अशी ही रानभाजी आहे.
पाऊस सरल्यावर नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान पाथरी नावाची जमिनीलगत वाढणारी रानभाजी माळावर, रस्त्याकडेला, शेताच्या बांधावर सर्वत्र आढळते. या पाथरीच्या पानांची भाजी केली जाते. डाळं दाणे घालून, बेसन लावून यांची ताकातली भाजी सुरेख होते.
एकदा एका स्काऊटच्या शिबिराला वाड्याला गेले होते. तिथे एका पाड्यावर मी पाथरीची भाजी खाल्ली. पाथरीची भाजी आणि भाकरी फार झक्कास बेत होता तो. पाथरीची पानं भाजीसाठी आणि काही खरचटलं, लागलं तर जखमेवर चाळून लावण्यासाठी असा याचा दुहेरी उपयोग होतो. मटारू नावाची अजून एक रानभाजी- जिच्या कंदांचा उपयोग भाजी म्हणून होतोच, पण हिच्या कोवळ्या पानांच्या वड्या फार छान होतात. मटारूचा वेल मी सध्या कुंडीत लावला आहे. पावसाळ्यात तो फार झपाट्याने फोफावतो. याची हृदयाकार हिरवी गच्च पानं दिसायला इतकी सुरेख दिसतात. घरी सहज वाढवता येणारी अशीही एक बहुउपयोगी रानभाजी आहे. शेवगा हा आजकाल भारीच नाव कमावता झालाय. मोरिंगा पावडर, मोरिंगा टॅबलेटस् असं बरंच काही बाजारात उपलब्ध असतं. पण शेवग्याची कोवळी पानं निवडून, ओल्या खोबऱ्याबरोबर त्याची जी भाजी होते त्याची सर कशालाच नाही. पावसाळ्यात कोवळी पानं आणि वसंतात शेवग्याची गोडसर वासाची फुलं आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या शेकटाच्या म्हणजे शेवग्याच्या शेंगा ही रानभाजीच तर आहे. त्यामुळे रानभाज्या आणि पावसाळा इतकाच संबंध न जोडता त्या वर्षभर कशा मिळवायच्या हे जाणून घेतलं तर भाज्यां मधलं वैविध्य सहज जपता येईल.
या लेखात आपण काही थोड्या रानभाज्या पाहिल्या, पण अजूनही बऱ्याच अशा भाज्या आहेत ज्या अगदी डोळ्यांसमोर आहेत, पण आपण त्यांच्या फायद्यांबाबत अनभिज्ञ आहोत. त्या सगळ्यांची ओळख करून घेऊया पुढच्या लेखात. तोवर पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद जरूर घ्या.
mythreye.kjkelkar@gmail.com