Mumbai Local Ladies Coach Logo: ‘Change Is The Only Thing Constant’, असं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, याचा अर्थ काय तर, ‘बदल ही एकमेव अशी गोष्ट आहे जी कायम आहे’. आपण जितक्या लवकर एखादा बदल स्वीकारतो, तितका मनस्ताप कमी होतो, असं म्हणतात! पण बदल स्वीकारणं म्हणजे स्वतःची ओळख विसरणं असा अर्थ होत नाही ना? बदल म्हणून आपण जी बाब स्वीकारतोय ती खरंच आपल्यासाठी फायद्याची आहे का? आपलं स्वत्त्व त्यातून मांडता येऊ शकतं का? सर्वात महत्त्वाचं, ती गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक आहे का? असे प्रश्न न विचारता स्वीकारलेला कोणताही बदल हा लादलेला नियम व थोपलेली ओळखच ठरतो. जशी ओळख मुंबई लोकलने तब्बल पाच वर्षांपूर्वी महिलांना मिळवून दिली. आज अचानक मुंबई लोकलमधील महिलांचा विषय काढायचं कारण म्हणजे लंडन की लाली या इन्स्टाग्राम चॅनेलच्या युजरने अलीकडेच शेअर केलेला एक व्हिडीओ, ज्यात या परदेशी तरुणीने खरोखरच विचारात पाडेल असा प्रश्न विचारला आहे.

झालं असं की, लंडन की लाली या अकाउंटवर काही दिवसांपूर्वी एक रील अपलोड करण्यात आली होती. यामध्ये सदर युजर ही मुंबई लोकलच्या डब्याबाहेर उभी आहे आणि ती आपल्याला लेडीज कोचवरील महिलांचा प्रातिनिधिक लोगो दाखवते. ती म्हणते की, “मला आज तुम्हाला एक वादग्रस्त बाब दाखवायची आहे. लोकलच्या डब्यावर मी महिलांचा प्रातिनिधिक चेहरा पाहिला. यामध्ये महिलेला पॅन्ट, शर्ट, सूट घालून दाखवले आहे. मी जेवढा प्रवास केला तेव्हा मला असे कपडे घातलेल्या महिला कुठे दिसल्याच नाहीत. हा लोगो कदाचित पाश्चिमात्य देशांना पाहुन, किंवा असं म्हणूया प्रगत विचार दाखवण्यासाठी बदलला असावा, पण मुळात जी भारतीय महिलांची ओळखच नाही, जे कपडे भारतीय वातावरणानुसार साजेसे नाहीत, आपल्या इथे घातले जात नाहीत. त्यातून महिलांचं प्रतिनिधित्व कसं करता येईल?”

खरोखरंच विचार करायला भाग पाडणारी बाब आहे, नाही का? आपल्याकडे लोकल ट्रेनच्या डब्यात सकाळी चारच्या ट्रेनपासून ते रात्री १२- १ पर्यंतच्या प्रवासात असंख्य महिला प्रवास करतात. प्रत्येकीचं काम,धर्म, चेहरा,ओळख सगळंच वेगळं असतं. अनेकजणी साड्या नेसून येतात, काही पंजाबी ड्रेस घालतात, काही कुर्ते घालतात, काही जीन्स- टॉप, काही शॉर्ट्स, काही शर्ट पॅन्ट, प्रत्येकीचा पेहराव तिच्या आवडीनुसार असतो. हे सगळं वैविध्य बाजूला ठेवून भलत्याच एखाद्या देशातली मॉडर्न ‘बाई’ सुटाबुटात वावरते म्हणून तशी ओळख महिलांवर लादण्याची गरजच काय? मुळात सूटबूट ही फॅशनची निवड झाली जी त्या त्या देशातील वातावरण, संस्कृतीनुसार केली जाते. याला प्रगतीचं किंवा हुशारीचं प्रतीक म्हणणं म्हणजेच स्वतःच स्वतःचं मूल्य कमी करून घेणं आहे.

आता, कामावर जाणाऱ्या महिलांचं प्रतीक म्हणून जरी हा बदल केला असला असं समजायचं झालं तरी, अगदी माशाच्या टोपल्या घेऊन जाणाऱ्या, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या, पालिकेच्या कर्मचारी, बँकांमध्ये, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एवढंच कशाला रेल्वेमध्ये काम करणाऱ्या महिला सुद्धा सुटाबुटात कामाला जाताना दिसत नाहीत. त्या वर लिहिलेल्या पर्यायांपैकी त्यांना आवडतील ते कपडे घालतात, मग नक्की कोणत्या ‘वर्किंग वुमन’चं प्रतिनिधित्व या लोगोमधून होणं अपेक्षित आहे असाही प्रश्न पडतो.

२०१९ मध्ये हा लोगोचा बदल किंवा असं म्हणूयात ओळख बदलण्याचा प्रपंच पण अशाच वादातून सुरु झाला होता. तुम्हाला आठवत असेल तर, यापूर्वी महिलांच्या डब्यावर, साडीचा पदर डोक्यावर घेतलेल्या महिलेचा चेहरा लोगो म्हणून असायचा. तेव्हा सुद्धा लोकांनी (काही महिलांनी) असा युक्तिवाद केला होता की, महिला एवढ्या प्रगती करत असताना त्यांना अजून ‘डोक्यावर पदर घेऊन फिरणाऱ्या’ अशीच ओळख का द्यावी? हे ही म्हणणं अगदी चुकीचं नाही, म्हणजे जरी आता महिला सुटाबुटात वावरत नसल्या तरी डोक्यावर पदर घेऊनही वावरत नाहीच की. मुद्दा काय तर ही दोन्ही रूपं ही टोकाची आहेत, आणि खरी स्त्री त्या टोकांच्या मध्ये प्रवास करतेय. आपल्याला तिची ओळख, ओळखायला हवी.

हे ही वाचा<< “बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?

जर लोकलच्या डब्यावर महिलांचं प्रातिनिधिक रूप हवं असं वाटत असेल तर या क्रिएटिव्ह मंडळींना एकदा खरंच रोज प्रवास करणाऱ्या महिलांना डोळ्यासमोर ठेवून पाहायला हवं. मग काखेतली पर्स छातीपर्यंत गच्च आवळून नी पदर कंबरेला खोचून उभ्या असलेल्या महिलेचं चित्र साकारलंत तरी वावगं ठरणार नाही.