कधीकधी आपल्या मनातील शंकांचं अवघ्या काही क्षणांत भीतीत रुपांतर होतं. आणि मग त्या भीतीचं मनात काहूर माजू लागतं. एखाद्या व्यक्तीबाबत आपल्या मनात शंका निर्माण होते आणि… काही दिवसांपूर्वी असाच एक प्रसंग माझ्याबरोबर घडला. मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी मी ऑनलाइन ऑटो बुक केली. आधी कधीही या मैत्रिणीच्या घरी मी गेले नव्हते. त्यामुळे तिने पाठवलेल्या पत्त्यानुसार मी लोकेशन सेट केलं होतं. तिची बिल्डिंग मला नेमकी कुठे आहे हे ठाऊक नव्हतं. पण, त्या रस्त्यावरुन मी अनेकदा गेले होते. त्यामुळे रस्ता ओळखीचा होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थोडावेळ वाट पाहिल्यानंतर रिक्षा आली. दुपारची वेळ होती, त्यामुळे सूर्य डोक्यावर होता. रिक्षा येताच मी नेहमीप्रमाणे आधी रिक्षाचालकाकडे पाहिलं. सावळा रंग, पांढऱ्या रंगाचे कपडे आणि डोक्यावर टोपी…रिक्षाचालक मुस्लिम असल्याचं लक्षात येताच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी रिक्षात बसले, त्याला ओटीपी सांगितला. पण, त्याच्याकडून थोडा मुजोर व्यक्तीप्रमाणे रिप्लाय आला. रिक्षा जसजशी पुढे जात होती, तसतसं माझ्या मनात भीती घर करत होती.

मनात भीती असली तरी ती चेहऱ्यावर दाखवायची नाही, हे मी पक्क केलं होतं. थोडं पुढे गेल्यानंतर माझं लक्ष रिक्षाच्या आतील बाजूस असलेल्या नंबरवर गेलं. रिक्षाच्या आतही नंबरप्लेट होती. मी हळूच त्याचा फोटो काढून माझ्या मैत्रिणीला पाठवला. एरव्ही मी असं कधीच करत नाही, पण त्यादिवशी कुणास ठाऊक एक वेगळीच भीती माझ्या मनात निर्माण झाली होती. रिक्षात मुलीवर अतिप्रसंग, रिक्षाचालकाच्या गैरवर्तनामुळे मुलीने रिक्षातून मारली उडी…अशा बातम्यांचे मथळे माझ्या डोक्यात घुमत होते.

हेही वाचा>> सूनेला पायातील चप्पल म्हणणाऱ्याच्या घरी…‘मुलगी झाली हो!’

मी मोबाईलवर गुगल मॅप ऑन ठेवला होता. लोकेशनवर पोहोचण्यासाठी दहा मिनिटे असतानाच रिक्षाचालकाने रिक्षा उजव्या बाजूला वळवली. माझ्या मॅपनुसार आम्हाला सरळ जायचं होतं. पण, त्याने अचानक टर्न घेतल्याने मी जरा घाबरलेच. थोडा धीर करत मी त्याला “आपल्याला सरळ जायचं होतं”, असं सांगितलं. त्यावर त्याने “इथून पण रस्ता आहे. मला इथून रस्ता दाखवत आहे”, असं उत्तर दिलं. पण, माझ्या मॅपमध्ये हा रस्ता दिसत नसल्याचं मी त्याला सांगितलं. शेवटी त्याने रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी केली. दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. अशातच रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला मग त्याने रस्ता विचारला. त्याने रस्ता बरोबर असल्याचं सांगितलं.

थोडं पुढे गेल्यानंतर मग माझ्या मोबाईलमधला मॅपही अपडेट झाला. माझ्याही मॅपवर मग त्या बाजूनेही रस्ता असल्याचं दिसलं. त्या रिक्षाचालकाने मला मैत्रिणीच्या बिल्डिंग खाली नेऊन सोडलं. मी त्याला थँक्यू म्हटलं… पण, या प्रसंगानंतर माझं मलाच कसं तरी वाटू लागलं. रिक्षाचालक केवळ मुस्लिम आहे, या एकाच कारणाने माझ्या मनात शंका निर्माण झाली होती. त्याच्या जागी एखादा मराठी रिक्षाचालक असता, तर मी कदाचित असं वागलेही नसते. या प्रसंगानंतर माझ्या बुद्धीची मलाच कीव करावीशी वाटत होती.

हेही वाचा>> “एक वर्ष घरात राहिल्याने माझा नवरा परत येईल का?”

‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतरही असंच घडलं होतं. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर मुस्लीम धर्माच्या व्यक्ती दिसताच माझा भाऊ त्यांच्याकडे बघत राहिला. त्यानंतर मी त्याला म्हटलं, “सगळे सारखे नसतात.” त्यालाही ते ठाऊक होतचं. पण, कधीकधी आपण आपल्याही नकळत समोरचा व्यक्ती एका विशिष्ट धर्माचा आहे, म्हणून त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहतो. कितीही नाही म्हटलं तरी तेच विचार आपल्या डोक्यात घुमत असतात. खरं तर आजच्या जगात इतक्या घटना आजूबाजूला रोज घडत असताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणं कठीण होऊन बसलं आहे. अतिप्रसंग करणारे सगळेच रिक्षाचालक किंवा इतर नराधाम हे केवळ मुस्लीम धर्माचे नसतात. खरं तर गुन्हेगाराला धर्मच नसतो. पण, तरीही तेच विचार आपल्या डोक्यात का बरं येत असतील? हिंदू रिक्षाचालक मुजोर असूनही त्यांच्याबद्दल अशा भावना मनात का येत नाहीत? मला वाटतं, याचं एकमेव कारण म्हणजे सामाजिक तेढ, जातीयवाद आणि मीडियाचा प्रभाव.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim auto driver experience when he changed path i got scared kak
First published on: 23-06-2023 at 16:30 IST