‘नृत्य’ म्हणजे ‘कीर्ती कला मंदिर’… हा भाव नाशिककरांच्या मनात निर्माण झाला तो रेखा नाडगौडा यांच्या अथक प्रयत्नांतून… नाशिकमध्ये कथक नृत्य शैलीचा प्रसार करण्यासाठी रेखाताई यांनी पन्नास वर्षापूर्वी ‘कीर्ती कला मंदिर’ या नृत्य संस्था सुरू केली. संस्था आज ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने संस्था आणि रेखाताई यांच्या आजवरच्या वाटचाली विषयी जाणून घेऊ.रेखाताई यांनी वयाच्या दहाव्या वर्षी कथक शिकण्यास सुरुवात केली. गुरू नटराज पंडित गोपीकृष्ण आणि पंडिता शमा भाटे यांचे शिष्यत्व स्वीकारण्यापूर्वी नाशिकमध्ये गुरू हैदर शेख यांच्याकडून त्यांनी कथकचे धडे घेतले.

नृत्याची कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ नृत्याची आवड, शिकण्याची जिद्द व तळमळ यांमुळे त्या कथकमध्ये निपुण झाल्या. पुढे त्यांनी नृत्य निर्मिती आणि नृत्यदिग्दर्शनही केले. त्यांची कलात्मकता आणि कौशल्य विविध नृत्य महोत्सवांमध्ये वाखाणली गेली. कथक शिक्षणाचा विशिष्ट टप्पा गाठल्यानंतर नाशिकमध्ये ‘कीर्ती कला मंदिर’ या संस्थेची स्थापना करून कथक नृत्याच्या प्रचाराचे आणि प्रसाराचे काम सुरू केले ते आजवर अखंडपणे चालू आहे. या शिकवणीच्या वाटेवर आपल्या शिष्यांना तसेच नृत्यप्रेमींना युवा कलाकारांबरोबरच बुजुर्ग कलाकारांची कला अनुभवता यावी यासाठी त्यांनी आपले गुरू नटराज पंडित गोपीकृष्ण यांच्या स्मरणार्थ १९९४ पासून नाशिकमध्ये तीन दिवसीय नृत्य महोत्सव सुरू केला. गेली तीस वर्षे हा महोत्सव नाशिककरांना नृत्यातील वैविध्यपूर्ण कलाकृतींचा आनंद देतो आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन कलाकार नाशिकच्या व्यासपीठावर आपली नृत्यकला सादर करतात.

कीर्ति कला मंदिरच्या माध्यमातून रेखाताई यांनी नाशिकच्या नृत्यांगनांना भारतातील प्रमुख शहरांमध्ये आणि त्याचबरोबर परदेशातही व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये शरद चंद्रिका महोत्सव, कला संगम, रामदास संगीत महोत्सव, गोपीकृष्ण संगीत महोत्सव ठाणे, संस्कृती महोत्सव आणि सीएइन महोत्सव यांचा समावेश आहे. अलीकडेच लखनऊमध्ये संगीत नाटक अकादमी, दिल्ली यांनीआयोजित केलेल्या नृत्य प्रणिती महोत्सवात लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अलीकडील ११-१२-१३ हा शंभर वर्षांनी येणारा योग म्हणून ११ मात्रा रुद्रताल बारामात्रा ठुमरी आणि चौताल आणि तेरा मात्रांचा श्रीराम जय राम जय जय राम हा १३ अक्षरी मंत्र आणि त्यावर तेरा मात्रांचा रासताल असे या विशिष्ट दिवसाचे महात्म्य या दिवशी कथक नृत्यातून सादर केले.

वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करताना दृढनिश्चय, संयम, जिव्हाळा आणि प्रेमाने त्या मागील ४९ वर्षे विद्यार्थ्यांना घडवते आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कीर्ती कला मंदिराच्या शाखा आंतरराष्ट्रीय स्तरावर युके. युएसए मध्ये सुरू आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत सुरसिंगार संसद मुंबई तर्फे सिंगरमणी, आंध्र प्रदेश भाषा समिती कलाकर भूषण, हिंदी प्रचार समिती, नाशिक संस्कृती वैभव, नाशिक गौरव,सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, देशस्थ रुग्वेदी संस्थेच्या वतीने जीवन गौरव, जागतिक धम्म शांतीदूत पुरस्कार, अखिल ब्राह्मण संस्थेतर्फे समाज गौरव पुरस्कार, व्यंकटेश बालाजी ट्रस्टतर्फे जीवनगौरव पुरस्कार आदी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. उद्या म्हणजे २३ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘सुवर्णरेखा’ या महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणून सुरू होतो आहे. या शुभारंभाला लंडन स्थित कीर्ती कला मंदिराची पहिली नृत्यांगना अश्विनी काळसेकर हीच्या नृत्याने महोत्सवास सुरुवात होणार आहे. नाशिककरांच्या साक्षीने आणि पंडिता शमाताई भाटे, देवयानी फरांदे आणि दीपक करंजकर यांच्या सन्माननीय उपस्थितीत हा शुभारंभाचा सोहळा रंगणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षभर उदयोन्मुख कलाकारांबरोबरच डॉक्टर सुचिता भिडे चाफेकर, राजेंद्र गंगाणी ,पंडिता शमाताई भाटे, पंडित सुरेश तळवलकर, चारुदत्त आफळे, या महोत्सवात सहभागी होणार आहेत. एप्रिल महिन्यात संपूर्ण भारतातील नावाजलेल्या ५० नृत्य संस्थांच्या गुरूंचा गौरव आणि त्या गुरूंच्या शिष्यांचा कलाविष्कार ‘कलाहोत्र’च्या माध्यामातून होईल.