डॉ. निर्मला रवींद्र कुलकर्णी
आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. नवरात्र उत्सव हा महिषासुरमर्दिनी दुर्गादेवीचा उत्सव. दुर्गादेवी अनेक रूपांनी भारतीय संस्कृतीमध्ये आविष्कृत झालेली दिसते. देवीकवचामधल्या एका श्लोकात दुर्गेच्या नऊ रूपांची नावे येतात. दुर्गेच्या या नऊ अवस्था या नावांनी प्राचीन ग्रंथांमध्ये परिचित नसल्या तरी या अवस्था वेगळ्या नावांनी प्राचीन ग्रंथांमध्ये प्रसिद्ध आहेत. यातल्या काही अवस्थांच्या मूर्तीही आढळतात. दुर्गेची ही विविध रूपे आजच्या आधुनिक जगाला अनेक गोष्टींची शिकवण देतात. या नऊ रूपांच्या माहितीबरोबरच या रूपांपासून आधुनिक जगाला मिळणाऱ्या प्रेरणांचा विचार करणारी मालिका आजपासून सुरू करत आहोत…

पार्वतीला मुळातच एक स्वतंत्र रूप आहे. प्राचीन भारतात नांदत असलेली मातृसत्ताक विचारधारा तिच्या रूपातून कुठंतरी झिरपते. तिच्या हरितालिका रूपातून आणि नवरात्राच्या पहिल्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या शैलपुत्री या रूपामधून निर्णयक्षमता असणारी ठाम युवती दिसते. आपणा सर्वांना स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला शिकवणारी शैलपुत्री…

प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये दोन प्रकारच्या विचारसरणी एकत्र विणलेल्या दिसतात. एक- पित्याला मुख्य मानणारी पितृसत्ताक आणि दुसरी- मातेला प्रधान मानणारी मातृसत्ताक. या दोन्ही विचारसरणींचा समन्वय अगदी प्राचीन वाङ्मयामध्येही आपल्याला दिसतो. कालांतराने पुरुषदेवतेला पाठिंबा देणारी शक्ती या विचारामधून शक्तिदेवतेचा शाक्तपंथ अस्तित्वात आला. काही अभ्यासक स्त्री किंवा स्त्रीशक्तीला जगताचे उत्पत्तिस्थान मानणारी विचारधारा विकसित झाली आणि या विचारधारेमधून शाक्तपंथ उदयाला आला असे मानतात. काहीही असो स्त्रीच्या अनेक रूपांचा देवी म्हणून स्वीकार झाला हे खरे.

नवरात्रोत्सव हा दुर्गेचा उत्सव. दुर्गादेवीचा उल्लेख सर्वप्रथम आलाय तो तैत्तिरीय आरण्यकामध्ये. या ग्रंथात दुर्गा असा नसून दुर्गिः असा आहे. ‘कात्यायनाय विद्महे कन्याकुमारि धीमहि| तन्नो दुर्गिः प्रचोदयात्|’ (तैत्तिरीय आरण्यक १०.२.३). विश्वामित्रांनी रचलेला सूर्याचा गायत्री छंदातला मंत्र वैदिक काळातच खूप प्रसिद्ध झाला. त्या चालीवर अगदी वैदिक काळातच त्यातल्या व्याकरणाकडे किंवा वाक्यरचनेकडे लक्ष न देता अनेक देवतांचे मंत्र रचले गेले. तशाच प्रकारचा हा दुर्गादेवीचा गायत्री मंत्र. सायणाचार्य हे तैत्तिरीय आरण्यकाचे भाष्यकार. ते या मंत्राचा संदर्भानुसार अर्थ लावतात. भाषा वैदिक आहे त्यामुळे नंतरच्या व्याकरणाच्या चौकटीत बसणारी नाही असेही सांगतात. सायणाचार्यांनी दिलेला अर्थ आहे -कात्य म्हणजे गजचर्मधारी शंकर. त्याने उत्पन्न केलेल्या दुर्गेला आम्ही जाणून घेतो. दुरितांचे नाश करणाऱ्या कन्याकुमारीचे आम्ही ध्यान करतो. या दुर्गेने आम्हाला प्रेरणा द्यावी. दुर्गा शब्दाचा अर्थही जिच्या उग्र स्वरूपामुळे जी दुर्लभ आहे, सहज कृपा करत नाही (‘दुःखेन गम्यते अत्र) अशी देवी म्हणजे दुर्गा.

कालांतराने नवरात्रोत्सव सुरू झाला आणि महिषासुरमर्दिनीची कथा प्रचारात आली. महिषासुराचा वध करणारी ही देवी सिंहावर आरूढ होऊन येते. वाहन हे वस्तुतः देवतेचे मूळ स्वरूप असावे असा एक विचार आहे. त्यानुसार, सिंह खरे म्हणजे सिंहिण हे दुर्गेचे किंवा महिषासुर मर्दिनीचे मूळ स्वरूप असावे. सिंहिण रेड्याला मारतांना प्राचीन मानवाने पाहिले असावे. त्याला त्या सिंहिणीमध्ये अन्यायाविरुद्ध लढणारी स्त्री दिसली असावी. अशाच तरल प्रतिभेमधून महिषासुरमर्दिनी निर्माण झाली असावी. हंपीला विरूपाक्षाचे मंदिर आहे. त्यांच्या बाह्य प्रांगणात महिषासुरमर्दिनीचे एक लहानसे देऊळ आहे. या देवळात मानवी आकृती असलेली देवीची मूर्ती आहेच. पण त्या मूर्तीच्या खालच्या बाजूला सिंह आणि रेडा यांचे युद्ध दाखवणारीही एक मूर्ती आहे. अशा मूर्ती वरील सिद्धांताला दुजोरा देतात. निसर्गातल्या अशा काही घटनांनी प्राचीन मानवाला स्त्रीस्वरूपाची आठवण करून दिली असावी आणि यामधूनच अन्यायाविरुद्ध खवळून उठणाऱ्या स्त्रीची अनेक रूपे दुर्गादेवीमध्ये प्राचीन मानवाने पाहिली असावीत.

आज प्रचारात असलेल्या नवदुर्गांचा उल्लेख देवीकवचामध्ये आला आहे. शाक्ततंत्राचा विकास झाल्यावर योगाला पोषक अशा या दुर्गेच्या नऊ अवस्था आहेत असं मानलं जातं. प्राचीन ग्रंथांमध्ये मात्र खालील नावाने प्रचारात असलेल्या नवदुर्गांचा उल्लेख येत नाही. देवीकवचामध्ये वर्णन करण्यात आलेल्या अवस्था या प्रत्येक स्त्रीमध्ये दिसणाऱ्या अवस्था असाव्यात असे वाटते.

प्रथमं शैलपुत्रीति द्वितीयं ब्रह्मचारिणी|

तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् |

पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनी तथा|

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् |

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः|| देवीकवचम् ३-५||

(दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री, दुसरे ब्रह्मचारिणी, तिसरे चंद्रघंटा, चौथे कूष्मांडा, पाचवे स्कंदमाता, सहावे कात्यायनी, सातवे कालरात्री,आठवे महागौरी आणि नववे सिद्धिदात्री असे आहे)

यातले पहिले स्वरूप शैलपुत्री असे आहे. शैलपुत्री म्हणजे पर्वतकन्या पार्वती. हीच उमा हैमवती या नावाने केनोपनिषदामध्ये अहंकारग्रस्त देवांचा पराभव करते असे वर्णन येते.

पार्वती ही हिमालयाची मुलगी. शंकर हिमालयावर तप करत होते. त्यांच्यासाठी पार्वती रोज फुले घेऊन जात असे. शंकर आणि पार्वतीचा पुत्र संपूर्ण जगताला छळणाऱ्या तारकासुराचा वध करेल अशी भविष्यवाणी देवांना माहित होती. पण तपस्वी शंकराचे मन लग्नासाठी कसे वळवायचे? इंद्राने मदनावर ही जबाबदारी सोपवली. मदन आपली पत्नी रती आणि इतर कामोद्दीपक साधनांसह शंकराच्या तपश्चर्येच्या ठिकाणी पोहोचला. पार्वती शंकराची पूजा करायला आल्या क्षणी मदनाने आपला बाण शंकरावर रोखला. आपले चित्त मदनामुळे विचलित होते आहे हे शंकराच्या लक्षात आले. त्यानी आपल्या तिसरा डोळा उघडून मदनाला भस्मसात् केले आणि तपश्चर्येसाठी दुसरीकडे निघून गेले. पार्वती सुरुवातीला भांबावून गेली, पण नंतर लग्न करीन तर शंकराशीच अशी प्रतिज्ञा तिने केली. ही कथा अनेक पुराणांमध्ये येते. पार्वतीचे पर्वतकन्या हे रूप अनेक ठिकाणी संस्कृतीने जपले आहे. या शैलपुत्रीचा मंत्र आहे-

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।

।वृषारूढां । शूलधरां । शैलपुत्रीं। यशस्विनीम् ।

केशरचनेवर चंद्रकोर धारण करणाऱ्या वृषभावर आरूढ झालेल्या हातात त्रिशूळ धारण करणाऱ्या कीर्तियुक्त शैलकन्येला मी इच्छापूर्तीसाठी वंदन करते/ करतो.

पार्वतीचे हे स्वरूप आधुनिक स्त्रीला, विशेषतः तरुणींना प्रेरणादायी आहे. पार्वतीला मुळातच एक स्वतंत्र रूप आहे. प्राचीन भारतात नांदत असलेली मातृसत्ताक विचारधारा तिच्या रूपातून कुठंतरी झिरपते. तिच्या हरितालिका रूपातून आणि नवरात्राच्या पहिल्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या शैलपुत्री या रूपामधून निर्णयक्षमता असणारी ठाम युवती दिसते. आपणा सर्वांना स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला ही शैलपुत्री प्रेरणा देवो ही प्रार्थना.