डॉ. अपर्णा गोविल भास्कर
जगभरातील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्यपणे आढळून येणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार २०२० मध्ये २.३ दशलक्ष महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. दरवर्षी सहा लाखांहून अधिक महिला स्तनाच्या कर्करोगाने आपले प्राण गमावतात. विशष म्हणजे लठ्ठ महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक आहे.

लठ्ठपणापणा अनेक आजारांना आमंत्रण देतो जसे की- टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग… लठ्ठपणा आता अन्ननलिका, पोट थायरॉईड, स्वादुपिंड, मोठे आतडे, प्रोस्टेट, पित्ताशय, गर्भाशय, अंडाशय, मल्टीपल मायलोमा आणि स्तनासंदर्भात कर्करोगालाही आमंत्रण देऊ शकतो.

रजोनिवृत्तीपूर्वी आणि नंतर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्यासाठी लठ्ठपणा हा एक मुख्य जोखीमेचा घटक ठरत असल्याचे आढळून आले आहे. सामान्य वजन असलेल्या महिलांच्या तुलनेत लठ्ठ महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका १.२९ पट वाढतो. लठ्ठपणा असलेल्या महिलांमध्ये ट्युमर पसरण्याची शक्यतादेखील जास्त असते.

सर्वच वयोगटातील महिलांमध्ये लठ्ठपणा हा आजाराच्या वाईट परिणामांशी संबंधित असल्याचे म्हटले जाते, म्हणून स्तनाच्या कर्करोगावर लठ्ठपणाचा परिणाम समजून घेणे गरजेचे आहे.

लठ्ठपणा स्तनाच्या कर्करोगाची उत्पत्ती, निदान आणि उपचारांवर अनेक प्रकारे परिणाम करतो.

१. चरबी ही चयापचयदृष्ट्या सक्रिय ऊती आहे आणि अनेक हार्मोन्सच्या उत्पादनास कारणीभूत ठरते. लठ्ठपणा असलेल्या महिलांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात इस्ट्रोजेन उत्पादन होते.

२. लठ्ठ महिलांना अतिरिक्त चरबीमुळे स्वयं स्तन तपासणी दरम्यान स्तनात लहान गाठी जाणवण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच जेव्हा त्याचे निदान होते तेव्हा ट्युमर आकाराने वाढलेला असतो.

३. लठ्ठपणा असलेल्या महिलांना नियमित स्क्रीनिंग मॅमोग्राफी करण्याचे प्रमाण कमी असते. लठ्ठपणाशी शरीराच्या नकारात्मक प्रतिमेमुळे किंवा शरीरयष्टीबाबत संकोच जाणवल्याने होऊ शकते.

४. लठ्ठपणा असलेल्या महिलांमध्ये मृत्यूची भीती, आत्मविश्वास खालावणे आणि संकोच वाटण्याचे प्रमाण अधिक असते आणि बऱ्याचदा यामुळे त्यांना वैद्यकीय निदान व उपचारात विलंब होतो.

५. कधी कधी डॉक्टर लठ्ठ महिलांबद्दल चुकीची मतं मांडू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयांवर परिणाम होऊ शकतो.

६. लठ्ठपणा असलेल्या रुग्णांना भूल देणे आणि कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. बऱ्याचदा त्यांना टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासोच्छवासाच्या समस्या, हृदयरोग इत्यादींचा धोका असू शकतो. शस्त्रक्रिया करण्यास जास्त वेळ लागू शकतो.

७. लठ्ठपणा व स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांमध्ये ट्युमर काढून टाकल्यानंतर पुनर्रचनात्मक (रिकंस्ट्रक्टीव्ह) शस्त्रक्रिया टाळल्या जातात. पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेनंतर त्यांना शस्त्रक्रियेच्या गुंतागुंत होण्याची शक्यता दुप्पट असते.

८. या रुग्णांना रेडिओथेरपीच्या अधिक डोसची आवश्यकता भासू शकते ज्याचा हृदय आणि फुफ्फुसांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

९. स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर लिम्फोएडेमा ही एक भयानक गुंतागुंत आहे आणि सामान्य महिलांच्या तुलनेत लठ्ठपणा असलेल्या महिलांमध्ये ती अधिक सामान्य असल्याचे आढळून येते.

१०. लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये केमोथेरपीचा योग्य डोस घेणे आव्हानात्मक असते. कमी डोस घेतल्याने एकूण रोगाच्या परिणामावरही विपरित परिणाम होऊ शकतो आणि या रुग्णांमध्ये रोगमुक्त जगण्याची शक्यता कमी होते.

स्तनाच्या कर्करोगावर वजन कमी केल्यास होणारा परिणाम :

अभ्यासातून असे दिसून आले आहे की थोडेसे वजन कमी केल्यानेदेखील स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, २ ते ४.५ किलो वजन कमी करणाऱ्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका १३ टक्क्यांनी कमी होतो. ९ किलो किंवा त्याहून अधिक वजन कमी करणाऱ्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका २६% कमी होता.

रोगाचा प्रतिकूल परिणाम प्रभावीपणे कमी करण्यासाठी लठ्ठपणावर रोगाच्या तीव्रतेनुसार उपचार करणे आवश्यक आहे. जास्त स्थूल असलेल्या रुग्णांना योग्य आहार आणि जीवनशैली व्यवस्थापन, वजन कमी करण्याची औषधे किंवा वजन कमी करण्यासाठी एंडोस्कोपिक थेरपीचा फायदा होऊ शकतो. तथापि, वाढते वजन आणि बीएमआयसह, केवळ या उपचारपद्धती प्रभावीपणे कार्य करू शकत नाहीत. बीएमआय ३५ व त्यापेक्षा अधिक रुग्ण आणि बीएमआय ३० किंवा त्याहून अधिक असलेले रुग्ण मेटाबॉलिक/ बॅरिएट्रिक सर्जरीचा लाभ घेऊ शकतात. अलीकडील एका अभ्यासानुसार, बॅरिएट्रिक/ मेटाबॉलिक सर्जरीमुळे लठ्ठपणाशी संबंधित कर्करोगाचा एकूण धोका २०% पेक्षा कमी होतो.