रविवारी सुप्रिया एका तरुणाला भेटली होती. गेल्या दोन वर्षांत बऱ्याच ‘स्थळां’च्या भेटी होऊनही काही जुळलं नव्हतं. त्यामुळे कालच्या स्थळाची उत्सुकता मनात घेऊन सोमवारी तिची मैत्रीण निशा, कॅंटीनला तिची वाट बघत बसली होती. सुप्रिया दिसल्याबरोबर, ‘यावेळीही नाही जमलं. मला माहीतच होतं.’ हे सुप्रियाच्या चेहऱ्यावर दिसलं, तेव्हा निशाने काहीच विचारलं नाही. कॉफीचे घोट घेता घेता सुप्रिया अचानक उसळली. “दर वेळी असंच होतं. जो मुलगा मला बरा वाटतो, त्याचा नकारच येतो. आधी आमच्या समाजात शिकलेले मुलगे कमी, शिक्षण कितीही असो, पुरुषी अहंकार असणारच. त्यात एखादा बरा वाटला तर असं का होतं? इतकी वाईट आहे का गं मी?” सुप्रियाचे डोळे पाणावले.
“काय बोलणं झालं तुमचं?” निशानं विचारलं. “मला डिसेंट वाटला, हाय-हॅलो झाल्यावर मी त्याला लगेच सांगून टाकलं, की आम्ही तिघी बहिणीच आहोत, त्यामुळे आई-वडिलांची जबाबदारी आमच्यावरच आहे. मी थोरली असल्यामुळे घरी निम्मा पगार देणार आहे. तुला चालणार असेल तरच पुढे जाऊ. त्यानंतर थोडं बोलणं झालं, पण नंतर अपेक्षेप्रमाणे त्याचा नकाराचा मेसेज आला, संपलं. ”
निशा काहीच बोलली नाही.
“असं का गं निशा? वडिलांना समाजाबाहेर लग्न चालणार नाही. त्यांना हार्टचं दुखणं आहे. माझ्यात हिम्मत नाही त्यांना दुखवायची. मधली बहीण साधी आहे, कमी शिकलीय, अपेक्षाही कमी आहेत. पण आधी माझं लग्न व्हायला पाहिजे. धाकटीला समाजाबाहेरचा बॉयफ्रेंड आहे, पण ती पळून वगैरे गेली तर आमची लग्नं जमणार नाहीत म्हणून ती थांबलीय. माझ्या लग्नासाठी सगळंच अडकलंय, प्रत्येक जण मलाच बोलतोय. ‘मला लग्नच नको, बहिणींची करा’ म्हणते, तेही घरी मान्य नाही. काय करू मी? आणि हे मुलगे तरी असे का सगळे?”
हेही वाचा… मैत्रिणींनो, भाज्यांची सालं, देठं वाया घालवू नका! या टिप्स वाचा-
“तुला खरंच लग्न करायचंय का? अशी अजूनही कधीकधी शंका येते मला. ‘समाजाबाहेरचा नको’ म्हणून तुझ्या बाबांनी प्रवीणला नाकारल्यापासून तू बिथरल्यासारखीच वागत होतीस.”
“सुरुवातीला झालं होतं तसं. प्रवीणला विसरता येत नव्हतं. पण आता लग्न करायचंय मला. या स्वार्थी मुलांना मी अर्धा पगार घरी देणं मान्य नसतं. शिकलेली बायको पाहिजे ती तिच्या पगारासाठीच.”
“काही मुलांच्या नकाराचं वेगळं कारणही असू शकेल ना?”
“काय असणार?”
“तुझा या तरुणांशी संवाद कोणत्या पद्धतीने होतो? तेही महत्त्वाचं आहे ना? हाय-हॅलो झाल्याझाल्या मी अर्ध्या पगाराचं सांगून टाकलं असं तू मघाशी म्हणालीस. तुझ्या अशा बोलण्यामुळे कदाचित त्यांना फक्त तुझा ‘ॲटिट्यूड’ ठळकपणे जाणवत असेल.”
“असू शकेल. मला कोणतीच गोष्ट सहज मिळालेली नाही. शिकण्यासाठीसुद्धा मला दर टप्प्यावर भांडावं लागलेलं आहे. त्यामुळे ‘मी म्हणेन ते करीन’ हा स्वभाव आहेच.”
हेही वाचा… मैत्रिणींनो, आर्थिक गुंतवणूक करायचीय?… मग ‘या’ ६ गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवं!
“मला वाटतं सुप्रिया, जगावरची चीड आणि काही गृहीतकं डोक्यात ठेवूनच तू मुलांशी बोलतेस. आपला समाज, घरचे असे का? बाबांना हार्ट प्रॉब्लेम का आहे? मला भाऊ का नाही? आपल्या समाजात शिकलेली मुलं का नाहीत? माझ्यात बंधन तोडायची हिम्मत का नाही? या सगळ्यांवरचे राग डोक्यात असतात, बॅकग्राऊंडला ‘प्रवीण’ असणारच. त्याच्या जोडीला, मुलगे स्वार्थीच, पुरुषी अहंकार, माहेरी पगार द्यायला नाहीच म्हणणार ही गृहीतकं. या सर्वांमुळे तुझ्या बोलण्यातून आणि देहबोलीतून तुझ्या मनातला अविश्वास, चीड, ॲटिट्यूडच मुलांपर्यंत पहिल्यांदा पोहोचत असणार. ‘या मुलीला माझ्याबद्दल समजून घेण्यात रस नाही आणि वर इतका ताठा असेल तर नको रे बाबा’ असंही वाटू शकतं ना एखाद्या चांगल्या मुलालासुद्धा?
“ओळख झाल्या झाल्या पहिल्यांदा आपल्या अटी सांगण्याऐवजी, मैत्रीने, मोकळेपणाने सुरुवात केलीस, एकमेकांचे स्वभाव समजून घेण्याइतका अवकाश दिलास आणि नंतर अटी – नव्हे, तुझ्यावर असलेल्या घरच्या जबाबदारीबद्दल सांगितलंस तर? तुझा प्रांजळपणा समोरच्याला जाणवला, तर तुझ्या अटींकडेही तो सकारात्मकतेनं पाहू शकेल. एखाद्या नव्या रिलेशनशिपला सामोरं जाताना, मनात सहज, मोकळेपणा हवा की डोक्यात नकार, चीड आणि गृहीतकांचा कल्लोळ? हा चॉइस तुझ्याच हातात आहे ना?” आत्तापर्यंतच्या स्थळांच्या भेटींची क्षणचित्रं डोळ्यासमोर येऊन सुप्रिया विचार करायला लागली… काही गोष्टी तिला पटायला लागल्या होत्या.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com