‘मुंबईत आई-मुलीच्या नात्याला काळिमा, लालबाग परिसरात राहणाऱ्या मुलीने केली आईची हत्या…’ ही बातमी काही दिवसांपूर्वी पेपरात वाचली अन् माझ्या पायाखालची जमीनच सरकली. बातमीचं हेडिंग वाचल्यानंतर पुढे ती बातमी वाचण्याची हिंमतच होत नव्हती. पण तरीही मी बातमी वाचण्यास सुरुवात केली. या बातमीच्या सुरुवातीचा परिच्छेद वाचून मला धक्काच बसला.

मुंबईतील लालबाग परिसरात २३-२४ वर्षांच्या रिंपल जैन या मुलीने आई वीणा जैन यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे तीन महिने घरातच ठेवले होते. या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे, असे त्या बातमीच्या पहिल्या परिच्छेदात लिहिले होते. त्यानंतर पूर्ण बातमी वाचली आणि दोन मिनिटे शांत बसले. ती बातमी वाचून काय बोलावे, काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळत नव्हते. पण या घटनेनंतर मन हेलावून गेले आणि एक सर्वसामान्य मुलगी म्हणून, आईचे तुकडे करणाऱ्या त्या मुलीला विविध प्रश्न विचारावेसे वाटले. आईच्या मृतदेहाचे एखाद्या निर्दयी कसायाप्रमाणे तुकडे करताना तुला काहीच कसे वाटले नाही? तू कधीतरी धडपडली असशीलच की, तेव्हा तिने केलेल्या मलमपट्टीचीही आठवण तुला झाली नाही का?

kids at home
शाळांना सुट्ट्या लागल्या, मुलांना कुठे ठेवायचं? पालकांच्या प्रश्नांची सोपी उत्तरे!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर

‘आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई!!’ या कवितेच्या ओळी प्रत्येक लहान मुलाला तोंडपाठ असतात. पण ही घटना वाचताना त्याच ओळी सर्रकन डोळ्यासमोरून गेल्या. बाळाची लागलेली पहिली चाहूल ते त्याने आई म्हणून हाक मारणे हा प्रवास प्रत्येक स्त्रीसाठी खासच असतो. आई ही तुम्हाला हवं-नको ते सतत बघत असते. आपली आवड-निवड तिला तोंडपाठ असते. कधी आजारी पडलो तर ती उशाशी बसून राहते. रात्रभर काळजीत तळमळत असते. कधी पडलो, धडपडलो आणि तोंडातून ‘आईईई’ निघाले तरी लगेचच तिला ते कळते. तिचा जीव आपल्यासाठी कायमच तुटत असतो. पण तिचे तुकडे करताना तुझा जीव कसा कळवळला नाही गं…?

एक मुलगी म्हणून तर मला तुझा भयंकर राग येतोय. तुझ्या आईने तुला जन्म दिला, तुला लहानाचे मोठे केले, तुला न्हाऊ घातले, तुझे लाड केले, तुला हवं-नको ते सर्व काही तिने तुला नक्कीच दिले असणार. पण तू मात्र वयात आल्यानंतर आईचा सांभाळ करण्याऐवजी तिच्याशी एखाद्या हैवानाप्रमाणे वागलीस. पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात तू तुझ्या आई खून केला नाहीस, असे म्हटलेस.

रिंपल, जेव्हा तुझी आई पहिल्या मजल्यावरून खाली पडली आणि ती काहीही हालचाल करत नाही हे तुझ्या लक्षात आले, तेव्हा तू ताबडतोब नातेवाईकांना, शेजाऱ्यांना किंवा डॉक्टरला फोन का केला नाहीस? तुझ्यावर आईच्या खुनाचा आळ येईल, असे तुला वाटले आणि तू तिच्या मृतदेहाचे तुकडे केलेस आणि तब्बल तीन महिने त्याबरोबर तू राहिलीस, हे तर किळसवाणे आहे.

धारदार शस्त्रांनी जेव्हा तू तुझ्या आईचे हात धडापासून वेगळे केलेस, तेव्हा तुला तुझ्या आईने त्याच हातांनी घास भरवले हे आठवले नाही का? जेव्हा तू तिच्या शरीराचे तुकडे करत होतीस, तेव्हा तुला आईने केलेली मलमपट्टी आठवली नाही का? तुझ्यात शिरलेल्या हैवानाला, तुम्ही माय-लेकींनी एकत्र घालवलेल्या गोड क्षणांची आठवण तू का करून दिली नाहीस? तुझे वय कळते झाले होते. तुझी आई तुला हवं-नको ते सर्व काही बघत होती. पण तरीही तू तिच्याशी अशी क्रूर का वागलीस?

रिंपल, तू तुझ्या आईचा खून केलेला नाहीस, असं जरी तू म्हणत असलीस, तरी मृत्यूनंतर तू तिला दिलेल्या वेदना या त्यापेक्षाही वाईट आहेत. म्हणजे मृत्यूनंतर वेदनाच संपतात, मृतदेहाला ती काय जाणीव असणार? पण आम्हा सर्वांना आईची ती स्थिती पाहून वेदना झाल्या. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असे आपण शाळेपासून अनेकदा ऐकलेले असते. आपली आई जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. डोक्यावरून हात फिरवणारी, मायेने जवळ घेणारी आणि प्रसंगी ओरडणारी पण तितकाच जीव लावणारीही तीच असते. पण त्याच आईशी इतके उलट्या काळजाच्या माणसासारखे वागताना तुला जराही दयामाया वाटली नाही का?

पोलीस प्रशासन आणि न्यायालय तुला योग्य ती शिक्षा सुनावेलच, पण जिच्या पोटी जन्म घेतलास तिने उद्या स्वप्नात येऊन तुला हे प्रश्न विचारले तर तू त्यांची काय उत्तरे देणार आहेस. यामागे तुझा हेतू काहीही असला तरी तुला मायेने जवळ घेणारा जीव तूच स्वत:पासून दूर केलास. तुझ्यासाठी हीच मोठी शिक्षा आहे, असे मला वाटते.

– एक सर्वसामान्य मुलगी