अॅड. तन्मय केतकर
आपल्याकडे प्रचलित कायदेशीर तरतुदींनुसार हिंदूंना एकच विवाह करण्याची परवानगी आहे. पहिला विवाह कायद्याने कायम असताना आणि पहिला जोडीदार हयात असताना दुसरा विवाह केल्यास त्याला कायदेशीर दर्जा मिळत नाही, परिणामी तो अवैध आणि बेकायदेशीर विवाह ठरतो. अर्थात अशा सगळ्या कायदेशीर तरतुदी असूनही आजही अनेक पुरुष पहिली पत्नी हयात असताना आणि पहिला विवाह कायद्याने संपुष्टात आलेला नसताना दुसरा विवाह करतात हे सामाजिक वास्तव नाकारण्यासारखे नाही.
पहिली पत्नी हयात असताना केलेल्या अशा दुसर्या लग्नाच्या पत्नीस कौटुंबिक निवृत्तीवेतन आणि इतर लाभ मिळतील का ? असा प्रश्न कर्नाटक उच्च न्यायालयासमोर उपस्थित झाला होता. या प्रकरणात पतीच्या निधनानंतर कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्याकरता दुसर्या पत्नीने केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने फेटाळली होती. त्याविरोधात वरिष्ठ खंडपीठाकडे दाद मागण्यात आली. वरिष्ठ खंडपीठाने-
१. याचिकाकर्ती महिला ही मयत इसमाची पहिली पत्नी हयात असताना केलेल्या दुसर्या विवाहातील दुसरी दुसरी पत्नी आहे हे वादातीत वास्तव आहे.
२. दुसर्या विवाहाच्या वेळेस पहिली पत्नी हयात होती आणि पहिला विवाहदेखिल कायद्याने संपुष्टात आला नव्हता.
३. अशा दुसर्या विवाहातील जोडीदारांच्या संबंधांना मान्यता दिल्यास, अशा सर्वच कर्मचार्यांना चुकीचा संदेश जायची शक्यता असल्याने असे घडणे व्यापक हिताच्या विरोधात आहे.
४. कायद्याचा विचार करता हिंदू विवाह कायदा कलम १७ अंतर्गत बहुपत्नीत्व हा गुन्हा आहे.
५. निवृत्तीवेतन नियमांनुसार, कौटुंबिक निवृत्तीवेतन हे वैध पत्नीस देय आहे. कायद्याने अवैध विवाहातील जोडीदारास देय नाही, अशी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवून अपील फेटाळले.
आणखी वाचा-प्रेरणा देवस्थळी, भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी
दुसरा विवाह करणे, त्या विवाहाच्या अनुषंगाने पती-पत्नी म्हणून एकत्र राहणे हे आजच्या सामाजिक परीस्थितीत शक्य असले तरीसुद्धा जेव्हा कायद्याचा आणि कायदेशीर वैधतेचा प्रश्न येतो तेव्हा असा विवाह आणि असे वैवाहिक संबंध अवैध आणि बेकायदेशीरच ठरतात हे अधोरेखित करणारा म्हणून हा निकाल महत्त्वाचा आहे.
विशेषत: या प्रकरणातील परीस्थितीप्रमाणे काहीवेळेस पुरुषाचा पहिला विवाह ज्ञात असूनही स्त्रिया त्याच्याशी दुसरा विवाह करण्यास तयार होतात. दुसर्या विवाहाकरता महिला तयार होण्यामागे पुरुषाचे पहिल्या पत्नीसोबत संबंध कायम नसणे किंवा विभक्त राहत असणे अशी काही संभाव्य कारणे असतात. पुरुषाचे पहिल्या पत्नीसोबत संबंध नसले, ते विभक्त राहात असले, तरी सुद्धा जोवर त्यांच्या विवाहाला कायदेशीर पूर्णविराम मिळत नाही तोवर त्यांचा विवाह आणि वैवाहिक नातेच कायदेशीर ठरणार; आणि दुसर्या महिलेचा विवाह आणि वैवाहिक नाते हे बेकायदेशीरच ठरणार हे वास्तव महिलांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
आणखी वाचा-बलात्कार पीडितेची ‘टू फिंगर टेस्ट’ करणारे गैरवर्तनाबद्दल दोषी धरले जातील- मद्रास उच्च न्यायालय
जेव्हा कायदेशीर हक्क मागण्याची वेळ येते तेव्हा कायद्याच्या चौकटीतल्या गोष्टीच महत्त्वाच्या ठरतात, मग पहिल्या विवाहात काय अडचणी होत्या, काय वाद होता, ते विभक्त का राहात होते अशा बाकी सगळ्या बाबी गौण ठरतात हे महिलांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. पहिली पत्नी हयात असताना आणि तिच्याशी झालेला विवाह कायम असताना, आपण दुसरा विवाह केल्यास पतीच्या हयातीतच नव्हे तर त्याच्या पश्चातसुद्धा आपल्याला त्याची पत्नी म्हणून कायदेशीर दर्जा आणि लाभ मिळणार नाही ही पक्की खुणगाठ महिलांनी बांधणे आवश्यक आहे. म्हणूनच शक्यतोवर अशा पुरुषाशी दुसरा विवाह करण्याच्या भानगडीत पडूच नये आणि तरी त्याच्याशीच विवाह करायचाच असेल, तर आपल्या विवाहा अगोदरच त्याच्या पहिल्या विवाहाला कायदेशीर पूर्णविराम देण्याचा आग्रह महिलांनी करणे अगत्याचे आहे.