तुझं घर आता हेच आहे असं समजून इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला तुला शिकायला हवं फक्त शांत राहून चालणार नाही… असं शेजारच्या काकू त्यांच्या सूनेला सांगत असताना माझ्या कानी पडलं. कामाला निघालेली मी; त्या काकूंचं हे वाक्य माझ्या डोक्यातून काही गेलं नाही. लग्न झाल्यावर नव्या घराशी, माणसांशी जुळवून घ्यायला एका स्त्रीला वेळ मिळायला नको का? लग्न झाल्यावर लगेचच त्या स्त्रीला सगळं यायला हवं असा अट्टहास का? लग्न झालेली स्त्री म्हणजे सूपरवुमन वाटते का? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामानिमित्त मला पनवेलला पोहोचायचं होतं. डोक्यात काकूंचं तेच वाक्य गोंधळ घालत होतं. डोक्यातील विचार बाजूला ठेवून जरा मोबाईमध्ये मन रमवायचं ठरवलं. इतक्यात शिवडी स्थानकावर ट्रेन थांबताच काही स्त्रियांचा ग्रुप ट्रेनमध्ये चढला. या चार ते पाच स्त्रिया माझ्या समोरच्याच सीटवर येऊन बसल्या. या स्त्रियांचंही सासूबाई पुराण सुरु झालं.

बाईचा जन्म खरंच फुकट आहे गं… लग्न झाल्यापासून धडपडतेय पण सासूबाईंना मात्र त्याची किंमत नाही. आताही घरातून निघताना लवकर घरी ये नाहीतर बसशील मैत्रिणींबरोबर फिरत असा टोमणा मारलाच. बरं ऑफिससाठी घरातून बाहेर पडताना, ऑफिसमधून घरी गेल्यावर सगळी कामं मीच आवरते तरीही तेच तेच नेहमी ऐकायला मिळालं की संताप होतो गं… असं त्या ग्रुपमधील एका मैत्रिणीने ट्रेनमध्ये बसल्या बसल्या आपलं मन मोकळं करायला सुरुवात केली.

आणखी वाचा – वयाच्या ३१व्या वर्षी नशिबाने माझा नवरा हिरावून नेला पण…

इतर दोघीजणी शांत तिचं बोलणं ऐकत होत्या. इतक्यात एक तिची समजूत काढत म्हणालीच. जाऊ दे गं घरोघरी त्याच परी… माझ्या घरीही तेच आहे. माझं तर नवीन लग्न झालं तेव्हा आधी घरातील पुरुष मंडळींनी जेवायचं आणि नंतरच घरातील स्त्रियांनी असा नियम होता. मी घरात इतकं सांगूनही अजूनही हा नियम काही बदलेला नाही. शिवाय प्रत्येक गोष्टीसाठी नियम. हे कपडे घालू नकोस. बाहेर कुठे गेलं की लवकर घरी यायचं. आज हाच पदार्थ बनव असे कित्येक नियम. पण सासूबाईंच्या काही उपदेशांकडे कानाडोळा केला की आयुष्य सहज सुंदर वाटू लागतं एकदा प्रयत्न करून बघ. या स्त्रियांचं बोलणं ऐकून माझं डोकंच काम करायचं बंद झालं.

त्याच ग्रुपमधील इतर दोघीजणी पटकन म्हणाल्या अगं शांत व्हा थोडा श्वास तर घ्या… तुमचंही म्हणणं बरोबरचं आहे म्हणा… आमच्या सासूबाई आम्हाला समजूतदार मिळाल्या आहेत. आम्हाला सांभाळून घेतात म्हणून तुमचं दुःख आम्हाला समजायचं नाही. हे सगळं बोलणं मी शांतपणे ऐकत होती. इथे सासूबाईंच्या दोन बाजू मला पाहायला मिळाल्या. दोघी जणींच्या सासूबाई अगदी समजूतदार तर ग्रुपमधल्या दुसऱ्या दोघींच्या सासूबाई काही वेगळ्याच अगदी सेलिब्रिटींच्या सासूबाईंसारख्याच…

सेलिब्रिटींच्या सासूबाई मुद्दाम म्हटलं कारण दोन ते तीन दिवसांपूर्वीच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या सूनबाई अभिनेत्री शिवानी रांगोळेंसाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे त्यांनी शिवानीचं भरभरून कौतुक केलं. इतकंच नव्हे तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधील अभिनेत्री नम्रता संभेरावने मध्यंतरी माझ्या सासूबाईंचा पाठिंबा आहे म्हणून मी आज कलाक्षेत्रामध्ये काम करू शकते असं म्हणत तिने सासूबाईंचं कौतुक केलं होतं. दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, अंकिता लोखंडे यांसारख्या इतर काही अभिनेत्रीही आपल्या सासरकडच्या मंडळींचं कौतुक करताना दिसतात.

सांगायचा उद्देश इतकाच की सासू-सूनांचं नातं आजही काही घरांमध्ये फारसं बळकट झालेलं दिसत नाही. आजही त्याच टिपिकल चौकटीमध्ये हे नातं अडकून पडलेलं दिसतं. स्त्रियांनीच स्त्रियांना पुढे जाण्यासाठी नवी उमेद, हिम्मत व पाठिंबा दिला तर आज घरातील प्रत्येक सून कोणतीच पर्वा न आपल्या क्षेत्रामध्ये गगन भरारी घेईल एवढं नक्की!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship between mother in law and daughter in law celebrity actress life after marriage see details kmd
First published on: 31-10-2022 at 14:30 IST