मनापासून केलेल्या मेहनतीचे फळ हे कायमच मिळत असते आणि तसेच काहीसे तेलंगणाच्या डी. अनन्या रेड्डी हिच्याबरोबर झाले आहे. अनन्या रेड्डीने प्रचंड मेहनत करून २०२३ च्या नागरी सेवा परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

पहिल्याच प्रयत्नात एवढे दमदार यश मिळविल्याचे श्रेय अनन्या नशीब, देवावरील विश्वास आणि कुटुंबाचा व मित्रांचा पाठिंबा यांना देते. मेहबूबनगर या जिल्ह्यात राहणाऱ्या अनन्याने मंगळवारी जाहीर झालेला हा निकाल पाहिला आणि तिच्या आनंदाला कोणतीही सीमा राहिलेली नाही.

“मला हा निकाल पाहून प्रचंड आनंद होत आहे… मी माझ्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही इतका मला आनंद झाला आहे”, असे अनन्याने म्हटले असल्याची माहिती ग्रेटआंध्राच्या लेखावरून समजते.

हेही वाचा : सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास

अनन्या रेड्डीने परीक्षेसाठी कशी तयारी केली होती?

अनन्याने एवढ्या मोठ्या परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्यासाठी केवळ अँथ्रोपॉलॉजी या विषयासाठी कोचिंगची मदत घेतली असली तरीही इतर कोणत्याही विषयासाठी खास प्रशिक्षण घेतले नव्हते. ही परीक्षा स्वतःच्या जिद्दीवर तिने उत्तीर्ण केली आहे.

खरे तर अनन्याला आपण या परीक्षेत तिसऱ्या क्रमांकावर येऊ, असे मुळीच वाटले नव्हते. तिला केवळ उत्तीर्ण झालेल्यांच्या यादीत यायचे होते. यूपीएससीची परीक्षा देण्याची ही तिची पहिली वेळ असली तरीही तिने दिलेली परीक्षा आणि मुलाखत ही त्यांच्यासाठी समाधानकारक होती.

अनन्याने २०२१ मध्ये दिल्लीतील मिरांडा हाऊस येथून भूगोल विषयात आपले पदवी शिक्षण पूर्ण केले होते. या परीक्षेसाठी तिने स्वतःच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजूंचा विचार करून, स्वतःसाठी बनविलेल्या योजनांचे पालन केले, त्यानुसार अभ्यास केला.

प्रीलिम्ससाठी अनन्याने खरे तर थोड्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला होता. त्या वेळेस ती भरपूर गोष्टी वाचण्यावर भर देत होती. मात्र, मुख्य परीक्षेकरिता तिने उजळणीवर भर दिला होता. परंतु, तिचा खरा कस या मुलाखतीदरम्यान लागल्याचे अनन्याने सांगितले आहे. मुलाखत घेताना खरे तर तिच्या आत्मविश्वासाचीच परीक्षा घेतली, असे तिला वाटते.

हेही वाचा : VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”

अनन्याच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय आहे; तर आई गृहिणी आहे. त्यांच्या घरात नागरी सेवांमध्ये यशस्वीरीत्या प्रवेश करणारी ती पहिलीच आहे. अनन्या तिचा तणाव दूर करण्यासाठी कधी मित्र-मैत्रिणींशी बोलून मन मोकळे करायची, तर कधीतरी चक्क क्रिकेट पाहून आपला ताण घालवायची. सर्वांचा लाडका विराट कोहली हा तिचा आदर्श असल्याचेही तिने तिच्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

अनन्याच्या घरच्यांनी तिला हव्या त्या कोर्सची निवड करण्याची मुभा दिली होती. खरे तर ती कलेक्टर होणार, असे तिचे आजोबा म्हणायचे. यूपीएससी-२०२३ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल लागल्यानंतर, तेलंगणा व आंध्र प्रदेश या तेलुगू भाषिक राज्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेलुगू भाषिक राज्यातील एकूण ५० उमेदवारांची नागरी सेवेसाठी निवड झाल्याने मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनन्याने राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल तिचे भरपूर कौतुकदेखील केले.