डॉ.शारदा महांडुळे

जगभरातील अर्ध्यापेक्षा अधिक जनतेचे तांदूळ हे प्रमुख अन्न आहे. तांदूळ हा प्राचीन काळापासून आशियात तयार होतो. ख्रिस्तपूर्व ३,००० वर्षांपासून तो भारतात आला आहे. पूर्वीच्या काळी त्याला ‘नीवार’ असे म्हणत. मराठीत ‘तांदूळ’, हिंदीमध्ये ‘चावल’, संस्कृतमध्ये ‘तंडूल’, इंग्रजीमध्ये ‘राईस’, तर शास्त्रीय भाषेत ‘ओरायझा सटायव्हा’ (Oryza Sativa) या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती ‘पोएसी’ कुळातील आहे. भारतात तांदूळ सर्वत्र होतो. विशेषत: दक्षिण गुजरातमध्ये व महाराष्ट्रात कोकणामध्ये तांदळाचे पीक घेतले जाते. आंध्र, तमिळनाडूतील चेन्नई, बंगाल येथेही उच्च प्रतीचा तांदूळ तयार होतो. तांदळाचे आकारमानानुसार, शुभ्रतेनुसार, सुगंधानुसार व चवीनुसार अनेक प्रकार पडतात. उदाहरणार्थ : बासमती, इंद्रायणी, आंबेमोहर, चिन्नोर, जिरे साळ, कोलम, दिल्ली यांसारखे असंख्य प्रकार आहेत.

या सर्व प्रकारांपैकी बासमती हा प्रकार चवीला सर्वोकृष्ट मानला जातो, तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून तांबड्या रंगाचा हातसडीचा तांदूळ उत्कृष्ट मानला जातो. तसेच आयुर्वेदिक दृष्टिकोनातून व्रीही (साठ दिवसांनी पिकणारा तांदूळ साठेसाळी) हा श्रेष्ठ सांगितला आहे. तांदळाची लावणी करण्यापूर्वी प्रथमतः त्याची रोपे तयार करावी लागतात. ही रोपे दीड ते दोन हात उंच वाढतात. या रोपांना सर्व बाजूंनी पाने लगडलेली असतात. या पानांतून गोल व पोकळ असा दांडा बाहेर निघतो व या दांड्याच्या टोकाशी ओंब्या असतात. ओंब्यामध्येच तांदळाचे दाणे तयार होतात. सुरुवातीस हे रोप हिरव्या रंगाचे असते. जेव्हा तांदूळ तयार होतो, तेव्हा हे रोप परिपक्व होऊन पिवळसर रंगाचे होते.

औषधी गुणधर्म :

स्वादुपाकरसाः स्निग्धा: वृष्याबद्धाल्पवर्चसः । कषायानुरसाः पथ्या: लघवो मूत्रला हिमा: ।।

आयुर्वेदानुसार : तांदळामध्ये तांबड्या रंगाचा हातसडीचा तांदूळ श्रेष्ठ प्रतीचा असतो. तो खाण्यास गोड व पौष्टिक असतो. तसेच स्निग्ध, मूत्रल, पचण्यास हलका, तहान भागविणारा व त्रिदोषशामक आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : तांदळामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, ‘ब’ जीवनसत्त्व, आर्द्रता, प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पौष्टिक घटक असतात.

उपयोग :

१) तांदूळ पूर्ण अन्न असल्याने आहारामध्ये भात खाणे उत्कृष्ट असते. पण त्यामध्ये सुद्धा दही-भात, दूध-भात व ताक भात खाणे आरोग्यास हितकारक असते. फक्त दूध-भात खायचा असेल तर भात शिजविताना मीठ घालू नये.

२) शेतामध्ये नवीनच निर्माण झालेला तांदूळ वापरावयाचा असेल, तर तो थोडासा भाजून त्याचा भात करावा किंवा आहारामध्ये कमीत कमी सहा महिने जुना तांदूळ वापरावा. कारण नवीन तांदळामुळे शरीरामध्ये आमनिर्मिती होऊ शकते.

३) वरण-भात बनविताना शक्यतो तुरीच्या डाळीऐवजी मुगाची डाळ वापरावी. मुगाची डाळ ही पचनास हलकी व पित्तशामक असते.

४) लहान मुले व रुग्णांसाठी तांदळाच्या कण्या व मूगडाळीची भरड एकत्र पातळ शिजवून त्याला जिरे, गायीचे तूप व कोथिंबीर यांची फोडणी देऊन प्यायला दिल्यास थकवा जाऊन उत्साह निर्माण होतो.

५) तांदळाच्या पेजेमध्ये मध घालून दिल्यास जास्त प्रमाणात लागणारी तहान कमी होते.

६) उष्णतेचा त्रास जाणवून शरीराचा दाह होत असेल, तर अशा वेळी तांदळाच्या लाह्या बारीक करून त्याचा काढा बनवावा व त्यामध्ये एक चमचा बारीक केलेली खडीसाखर मिसळून वारंवार प्यायला दिल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो.

७) भूक न लागणे, अपचन, आम्लपित्त, जुलाब, उलट्या, वारंवार तहान लागणे या विकारांवर तांदळाच्या लाह्या चघळाव्यात. या लाह्या शीत, लघु, पचण्यास हलक्या, अग्निप्रदीप्त करणाऱ्या व उत्साहवर्धक असल्यामुळे वरील विकार दूर होतात…

८) तांदळामुळे धातूंचे पोषण उत्तम रीतीने होत असल्यामुळे लहान बालके, गर्भवती स्त्रिया व बाळंतिणीच्या आहारामध्ये यापासून कल्पकतेने बनविलेल्या विविध पदार्थांचा वापर करावा.

९) तांदळापासून खिचडीभात, मसालेभात, डाळभात, केसरी भात, नारळी भात, पुलाव, बिर्याणी असे विविध प्रकार बनविता येतात.

१०) तांदळाच्या पिठापासून दशमी, भाकरी, पुरी, पराठे, धिरडे, खीर, इडली, डोसा, अंबोळ्या असेही पदार्थ बनविता येतात. हे सर्व पदार्थ आरोग्यास सकस व पौष्टिक असतात.

सावधानता :

आधुनिक काळात हातसडीच्या तांदळावरील कोंडा, साल, सत्त्व, काढून पॉलिश केलेला पांढरा तांदूळ बनविला जातो. हा तांदूळ दिसायला चमकदार व आकर्षक असतो. व्यापारी लोक हा तांदूळ चमकदार दिसण्यासाठी यावर ग्लुकोज / टाल्कम पावडरचे पातळ आवरण चढवतात. परंतु ते हानिकारक असते. या सर्व प्रक्रियांमुळे यामधील ‘बी’ जीवनसत्त्व व बरीचशी खनिजे नाश पावतात. म्हणून सहसा हातसडीचा तांदूळ खावा. तांदळाला कीड लागू नये व तो जास्त दिवस टिकून राहावा याकरिता त्यामध्ये खडेमीठ टाकून डब्यात भरून ठेवावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

dr.sharda.mahandule@gmail.com