आदरणीय किरण पावसकर ‘साहेब’,

तुमच्या घरी आया बहिणी नाहीत का? आहेत ना.. आणि त्या सगळ्या तुमची भाषणं ऐकतायत. आम्ही काय बांगड्या भरल्यात का? हो भरल्यात ना आणि त्याच बांगड्या भरलेल्या हातांनी लॅपटॉपवर ऑफिसचे मेल लिहिताना, तुमच्या कुठल्यातरी नेत्याला पाठिंबा देण्यासाठी जे तुम्ही आमच्यावर ताशेरे ओढता ते बघून खूप वाईट वाटतं,’साहेब’! किती सहज बोलून गेलात, ‘आमचे साहेब बायकी धंदे करणार नाहीत.. काय असतात हो हे बायकी धंदे?

contraception. Women health,
स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Viral video: Man vomits live worm after complaining of abdominal pain
VIDEO: पोटात दुखतेय म्हणून खाल्लं किडे मारायचं औषध; दुसऱ्या दिवशी व्यक्तीच्या पोटातून बाहेर आली धक्कादायक गोष्ट

घरातल्या प्रत्येक सदस्याची म्हणजे अगदी पाळलेल्या मांजरीच्या बाळापासून ते लहान मुलाच्या वरचढ वागणाऱ्या नवऱ्यापर्यंत सर्वांचीच काळजी घेणं म्हणजे बायकी धंदे का? की सकाळी पाचला उठून घर आवरून लॉग इनच्या वेळेत कामावर पोहोचणं हे बायकी धंदे आहेत? पेप्सिकोसारख्या बड्या कंपनीच्या मुख्याधिकारी असणाऱ्या इंद्रा नूयी ते अमेरिकेत जाऊन उपराष्ट्राध्यक्ष पद भूषवणाऱ्या कमला हॅरिस या आणि अशा कित्येक ‘बायका’ करत असणाऱ्या कामाला, ‘बायकी धंदे’ म्हणताय का? आणि जर हे बायकी धंदे असतील तर तुमच्या साहेबांना पण बायकी धंदे करायला सांगाच. कारण ज्या धंद्यांमुळे आज जग चालतंय ते धंदे केल्याने महाराष्ट्र चालवायला झाली तर मदतच होईल.

आम्हाला मान्य आहे की तुम्हाला राजकारण करायचंय त्यात कोणी अरे केलं की तुम्हाला का रे करायचं असतं पण त्यात आमच्या खांद्यावर बंदूक कशाला? आजवर अनेकांनी शिव्या- अपशब्दांमध्ये आई- बहिणींचा उद्धार का करायचा म्हणून आंदोलनं केली, साहेब कदाचित त्यात तुमचाही पक्ष आघाडीवर असेल, कौतुक आहे तुमचं. पण अहो तुमच्या वरवरच्या सभ्येतेची झालर असलेल्या बोलण्यातून शिव्यांपेक्षाही बोचणाऱ्या टीका करता त्याचं काय?

मुळात आम्हाला (हो आम्हाला सर्वांनाच) हा प्रश्न पडतो बायकी धंद्यांना अधोरेखित करताना तुम्ही बायकांना तुच्छ लेखता, त्याच बायकांचा आधार घेऊन तुम्हाला लढावं का लागतंय? तुम्ही म्हणालात की “एखाद्या आमदाराच्या पश्चात त्याची पत्नी निवडणुकीला उभी राहात असेल तर तिला आपल्या बाजूने बोलावण्याइतकं घाणेरडं राजकारण कधीच करणार नाहीत. एखाद्या महिलेला बोलावून बायकी धंदे करणार नाही”, जर तुम्ही इतके आत्मनिर्भर आहात तर मग भांडणांतही बाईचं नाव का घ्यावं लागतंय? तुमच्या राजकारणाच्या चिखलफेकीत बाईला मलीन करण्याचा हा ‘पुरुषी धंदा’ तुम्हाला शोभतोय का? की बाई शिवाय तुमच्या भांडणालाही काही ‘बेस’ उरत नाही?

साहेब आज तुम्ही बायकी धंदे शब्द वापरलात… उद्या उठून कुणीतरी आणखी काही म्हणेल; पण तुमचं हे प्रत्येक वाक्य केवळ एकट्या बाईला नव्हे तर सर्वच महिलांना लागू होतं. आठवण करूनच द्यायची तर यात तुमच्या बायकोपासून ते आई, बहीण, आजी, काकी, मामी, लेकी, नाती सगळ्यांचा समावेश होतो. आम्हाला वाटत नाही त्यांच्यापैकी कोणीही करत असलेल्या कामाविषयी सांगताना तुम्ही ‘धंदे’ हा शब्द वापराल.. पण मग आम्ही असं काय वेगळं करतोय? इथे आपली ‘ती’, स्त्रीशक्ती आणि आम्ही म्हणजे…?

साहेब, तुम्ही निवडून आलात तेव्हा आमचे प्रतिनिधी म्हणून पुढे जातोय असं सांगितलंत, तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस आणखी चार लोकांना दिशा देऊ शकतो असा विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला निवडून दिलं… पण दिलेल्या या शक्तीचा तुम्हाला विसर पडला आहे का? तुमच्या प्रत्येक वाक्यानंतर पेपरात हेडलाईन झळकणार, चार नव्हे चार लाख लोकांपर्यंत तुमचं एक वाक्य जाणार याचा विसर कसा पडतो? तुम्ही मार्गदर्शक आहात पण तुमचा मार्ग भरकटला असेल तर तो दाखवून देण्यासाठी आम्ही बायकांनी काय करावं, हे तरी एकदा सांगून टाका!

काही वर्षांपूर्वी विधानसभेत स्त्री विरुद्ध एका वाक्यावरून नीलम गोऱ्हे यांनी त्या आमदाराला बाहेरचा रस्ता दाखवला होता, बरं वाटलं. पण विधानसभेच्या दालनातून बाहेर पडलेली ही विकृती समाजात तर अजूनही पसरतेच आहे. तिला ठेचून काढायची वेळ येऊ नये अशी अपेक्षा.

अहो, खरंतर तुमच्याकडे तक्रार तरी कसली करायची? चिखलफेक करणारा जेव्हा पुरुष असतो तेव्हा त्याच्या जडणघडणीपासून ते पुरुषी मक्तेदारीपर्यंत आम्हाला तुमच्यावर टीका करण्याचे तरी मार्ग दिसतात. पण इथे तर इतकी वाईट परिस्थिती आहे की आमच्यासारखीच सकाळी उठून पोळ्या करणारी आणि मग नोकरी सांभाळणारी बाई पण दुसऱ्या बाईवर चिखलफेक करतेय. आम्ही घरंदाज बायका आणि ‘त्या’ तसले धंदे करणाऱ्या बायका.. केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून समोरच्या बाईचं चीरहरण करणारी बाई बघून खूप वाईट वाटतं, मग अशावेळी तुम्हाला तरी कुठल्या तोंडाने प्रश्न करायचा? असाही प्रश्न् पडतो.

कसंय ना साहेब, मुद्दा हा नाही की तुम्ही दुखावणारं बोललात, कदाचित तुमच्या बोलण्यावर टीका होईल, तुम्ही क्षमाही मागाल, पण टीका करतानाही तुम्हाला हाच प्रश्न विचारला जाईल तुमच्या घरी आया बहिणी नाहीत का? बायकांच्या आडून भांडायला तुम्ही काय बांगड्या भरल्यात का? साहेब एवढंच म्हणेन समोरच्यावर टीका करताना जर तुम्हाला बाईच्याच पदराआड लपायचंय तर निदान त्या पदराच्या चिंधड्या तरी करू नका!

– आपले दुखावलेले कृपाभिलाषी