प्रश्न : मी ३८ वर्षांची विधवा आहे. माझ्या १४ वर्षांच्या मुलाने अलीकडेच मला एक गोष्ट सांगितली. त्याला स्त्रीच्या स्तनांबद्दल खूप आकर्षण वाटतं व सारखे स्तनांचेच विचार त्याच्या मनात येतात. या गोष्टीमुळे तो खूपच एकलकोंडा व उदास दिसतो. त्याच्या या गोष्टीचा अभ्यासावरही परिणाम होऊ लागला आहे. त्याला यातून कसे बाहेर काढावे?
उत्तर : मुलं वयाच्या १३-१४ व्या वर्षी पौगंडावस्थेत येताच त्यांचं विशेष लक्ष स्त्रीच्या स्तनांकडे जाऊ लागतं. स्तन जितके उन्नत (voluptuous ), सुडौल (shapely) तितकं त्यांना त्यांच्याबद्दल वाटणारं लैंगिक आकर्षण अधिक वाटू लागतं. स्त्रीचे अनावृत स्तन पाहावे, त्यांना स्पर्श करावा अशी प्रबळ इच्छा- वासना त्यांच्या मनात येऊ लागते.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : समलिंगी संबंधांची किळस का वाटावी?

सुंदर स्त्रियांची चित्रं, ज्यामध्ये त्यांच्या स्तनांना पूर्णपणे किंवा अर्धवट उघड्या अवस्थेत दाखवलेलं असतं, अशी चित्रं पाहावीशी वाटतात. ती पाहून निर्माण होणाऱ्या लैंगिक उत्तेजनेचा आनंद घेणं, अशा चित्रांना समोर ठेवून किंवा त्यांची कल्पना करून हस्तमैथुन करणं; हा प्रकार मुलांमध्ये घडू लागतो. अनेकदा मुलांना स्वतःलाच याचं आश्चर्य वाटतं की वर्षा-दोन वर्षांपूर्वी ज्याकडे मुद्दाम लक्षही जात नव्हतं, ज्या गोष्टी फारशा ध्यानातही येत नव्हत्या अशा स्त्रीच्या शरीराबाबतच्या त्यांच्या जाणिवा अचानक काही पटींनी तीव्र झाल्या आहेत. त्यांच्या नजरा सतत स्त्रियांच्या अंगप्रत्यांगाकडे जात आहेत.
हे बदल मुलांमध्ये अगदी नैसर्गिकरीत्या घडतात. याबद्दलची योग्य माहिती योग्य वयात योग्य प्रकारे मिळाली असेल तर मग या बदलामधून जात असताना मुलं फारशी उद्विग्न, विचलित (disturbed) होत नाहीत. एकदा का स्वतःत होणारे हे बदल ‘नैसर्गिक’ आहेत हे कळलं की, मग हे स्थित्यंतर जाणीवपूर्वक जगणं अवघड राहत नाही. पण दुर्दैवाने अनेक जणांमध्ये असं घडत नाही.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : शीघ्रपतन कसं टाळाल?

“आपलं लक्ष सारखं स्त्रियांच्या स्तनांकडे जातंय, स्तनांना अनावृत अवस्थेत पाहायला मिळावं, त्यांना स्पर्श करायला मिळावा या इच्छा सतत आपल्या मनात उचंबळून येत आहेत,” या गोष्टींमुळे अनेक मुलं पौगंडावस्थेतून जाताना फार विचलित होतात. अनेकदा असे विचार जवळच्या नात्यातल्या किंवा रोजच्या संपर्कातल्या स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात येतात. त्यात मावशी, बहिणी, काकू, वहिनी, शिक्षिका, मोलकरीण, शेजारच्या घरांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया; एवढंच नव्हे तर स्वतःच्या आईबद्दलही असे विचार येऊ शकतात. त्यांच्या मनात नैतिक बांधणीमध्ये हा प्रकार बसणं अवघड असतं, साहजिकच त्यांच्या मनात या गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ लागतो. असे विचार बोलून दाखवण्याचीसुद्धा भीती व लाज वाटत असते. अशा वेळी मनाचा संतप्त कोंडमारा होण्याच्या अनुभवातून अनेक मुलं जातात. त्यांच्या बाबतीत जे घडतंय ते अगदी ‘नैसर्गिक’ आहे व सर्वांच्या बाबतीत घडणार आहे, हे त्यांना सांगणं अशा वेळी अत्यंत गरजेचं असतं. पण याची सोय (facility) व जाणीव (awareness) या दोन्हींबाबत अजूनही समाज कमी पडतो आहे. म्हणूनच लैंगिक शिक्षण ही स्वस्थ समाजाची एक अपरिहार्य अशी गरज आहे.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : स्तन मोठे करता येतील का?

तुमच्या मुलाच्या बाबतीत जे घडतंय ती अत्यंत नॉर्मल गोष्ट आहे. त्यात चुकीचं किंवा अघटित असं काहीच नाही. त्याला ‘आपण नॉर्मल आहोत’ याची जाणीव करून देणं, हे या अवस्थेत महत्त्वाचं आहे. तुम्ही या गोष्टींमुळे विचलित होऊ नका. त्याला या अवस्थेतून जाऊ द्या. आपल्या मनात जे घडतंय ते नॉर्मल आहे; हे कळताच हळूहळू तो त्यामुळे उदास, उद्विग्न होणार नाही व मग अभ्यासाकडेही त्याचं लक्ष लागू शकेल.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – लैंगिक दुर्बलतेचा मधुमेहाशी संबंध आहे ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रश्न विचारा बेधडक!
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा