आज बाजारात फिरताना माझं मन क्षणात चिपळूणात तर क्षणात इथे वास्तवात असं अल्लद ये-जा करत होतं. कोपऱ्यात बसलेल्या मामांच्या टोपलीत चवळीचे कोवळे तुरे होते. जोडीला बांबूचे कोवळे कोंब आणि कारडई, भारंगीच्या जुड्या होत्या. भोपळ्याची फुलं दहाला चार अशी जुड्यांमध्ये बांधलेली होती. सोबत भोपळ्याचा पाला होता. मी पुढे होऊन त्या सगळ्या भाजीवर मायेने हात फिरवला. लहानपणी ती रसरशीत पिवळी फुलं आणि मऊ मुलायम पानं तोडताना अगदी जीवावर यायचं. वाटायचं नकोच तोडायला काही, वाढू दे की त्यांना गुमान, पण आजीचं रागे भरणं आठवून पटापट खुडण्याचं काम करावं लागायचं.

ती श्रावणी सोमवारची दुपार, भाजीबाजारात ही गर्दी होती. पण ती गर्दी आणि त्यातून चालण्याचा त्रास सोडला तर बाकी सगळं अगदी बघत राहावं असं होतं. एक हिरवा गर्द रंग सगळीकडे पसरल्या सारखा वाटत होता.

नेहमीचे भाजीवाले तर होतेच, पण त्यांच्या जोडीने कातकरी बायका, काही आदिवासी बायका हातात केळीची, हळदीची पानं घेऊन होत्या. कोणाच्या टोपलीत धोतऱ्याची फळं होती तर कोणाकडे फुलं. अळूच्या जुड्या घेऊन बसलेली मंडळी आज विशेष खूश दिसत होती. त्यांच्याकडे टेरं अळू, भाजीचं अळू आणि वडीचं अळू अशी तीनही प्रकारची अळू होती. फिकट हिरवी मुलायम अशी टेरं अळुची पानं पाहून मनाने मी एकदम घृष्णेश्वराच्या देवळामागच्या रानात जाऊन पोहोचले. पावसाळ्यात झाडांच्या खोबणीत उगवणारं टेरं अळु, त्याची तलम पोपटीसर पानं आठवली. किती मजा यायची तेव्हा. श्रावणात पुजेला लागणारा आघाडा तोडायला जाताना कोवळी पानं फ्रॉकच्या नाहीतर परकराच्या ओच्यात जमा करायची ती भाजीसाठी. बांबूच्या परडीत ठेवायची ती पुजेला. तेच गुलबाक्षीचं. गुलबाक्षीची कोवळी पानं भाजीसाठी निवडायची आणि फुलं परडीत ठेवायची. बर्वेकाकूंच्या घरापलीकडे एक जुनी पडवी होती. त्यावर वेल चढवलेले असतं. त्यात भोपळ्याचा वेल शोधून त्याची रूंदसर पानं उड्या मारून मारून तोडायची आणि पिवळसर नारिंगी फुलं भज्यांसाठी निवडायची.

एखाद्या घरापाशी कुंपणालगतच्या कमानीवर चवळीचा नाजूक वेल पसरलेला असायचा. त्याचा शेंड्याकडला आणि त्याखालच्या पानांचा भाग खुडून घ्यायचा. अगदी जून असलेली पानं वगळायची.

आज बाजारात फिरताना माझं मन क्षणात चिपळूणात तर क्षणात इथे वास्तवात असं अल्लद ये-जा करत होतं. कोपऱ्यात बसलेल्या मामांच्या टोपलीत चवळीचे कोवळे तुरे होते. जोडीला बांबूचे कोवळे कोंब आणि कारडई, भारंगीच्या जुड्या होत्या. भोपळ्याची फुलं दहाला चार अशी जुड्यांमध्ये बांधलेली होती. सोबत भोपळ्याचा पाला होता. मी पुढे होऊन त्या सगळ्या भाजीवर मायेने हात फिरवला.

लहानपणी ती रसरशीत पिवळी फुलं आणि मऊ मुलायम पानं तोडताना अगदी जीवावर यायचं. वाटायचं नकोच तोडायला काही, वाढू दे की त्यांना गुमान, पण आजीचं रागे भरणं आठवून पटापट खुडण्याचं काम करावं लागायचं.

पुढे वनस्पती शास्त्राचा अभ्यास केला त्यावेळी त्या मागचं शास्त्र कळून आलं. वेलीचे नवीन कोवळे कोंब आणि पानं तोडली की तिला अधिक फुटवे येतात, ती अधिक फोफावते आणि मजबूत होऊन पुढे तिला चांगली फळं धरतात. आजकाल ज्याला थ्रीजी, फोरजी कटिंग म्हणातात ते आम्हा मुलांकडून त्यावेळी आपसूकचं होत होतं.

घृष्णेश्वरांच देऊळ खूप मोठं होतं. त्या भोवती विठोबाचं, गणपतीचं अशी अजून एक-दोन देवळं होती. त्यापलीकडे बेलाची झाडं. देवळा मागे मोठ्ठं मोकळं रान होतं. तिथे अळविणीची, सायाची, करंजाची बरीच झाडी होती. पावसाळ्यात या झाडांच्या पायतळी गच्च रानं माजलेलं असे. ते रान फिरून भाज्या गोळा कराव्या लागत. त्यातल्या केनाचा पाला तोडणं अगदी सोपं. केना, कुरडू आणि टाकळा मोकळ्या जमिनीवर मुबलक पसरलेला असे. तो सहज निवडता येई. पण भारंगी, खापरखुटी मात्र नीट बघून घ्यावी लागे.

भाजीवाल्या मावशींच्या टोपलीतील केन्याची जुडी पाहताना माझ्या बालपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. हळदीची फुलं आणि पानं तोडायला मला फार आवडायचं. मोठ्या तुऱ्यांसारखं पानांच्या खोबणीतून वर आलेलं हळदीचं फूल तोडताना मी ती लगतची पानं कधीच तोडत नसे. वाटायचं, काय वाटेल झाडाला? हिरमुसलं होईल ते. म्हणून मग फुलं नसलेल्या रोपाची जुन पानं घ्यायची.

तेरड्याचे कोंब वर आलेले दिसले तरी त्यांना धक्का न लावता पुढे जायचं. कारण भाद्रपदात गणेश पुजेच्या पत्रीसाठी आणि गौरीचे मुखवटे लावायला तेरडा हवा असे. त्याला आत्ता श्रावणात मुळीच हात लावायचा नाही. पाखाडीतल्या, पडवीतल्या भिंतीवरच्या, अंगणातल्या कमानीवर चढलेल्या आणि जमिनीवर (आमच्या सख्याच्या भाषेत मोप) पसरलेल्या भाज्या मोठ्या तजेलदार दिसतं. आज त्या सगळ्या मला इथे मुंबईत दिसतायत, पण अगदीच निस्तेज, आपला दिमाख हरवल्यासारख्या. मी पुढे होऊन प्रत्येकी वर हळूवारपणे हात फिरवला.

घे बाय !
देऊ काय?
घे सस्ती दिली गं!
उद्या शोधशील तर मिळाची नाय बघ!

असे अनेक आवाज माझ्या भोवती उमटत होते, पण मी त्या बालपणीच्या सवंगड्यांमधे हरवून गेले होते, त्यांना आंजारत-गोंजारत होते.कारण त्या माझ्यासाठी फक्त न्युट्रीशियस रानभाज्या नव्हत्या तर त्याही पेक्षा खूप काही अधिक होत्या. माझ्या आठवणींचा ठेवा होत्या.

mythreye.kjkelkar@gmail.com