मंगला जोगळेकर
अमेरिकेतील ‘नॅशनल स्लीप फाउंडेशन’च्या एका आकडेवारीनुसार ३५ टक्के लोकांची झोप पूर्ण होत नाही असे दिसून आले आहे. आजकालच्या स्पर्धेच्या युगात आपल्या स्वतःकडून आपल्या फार अपेक्षा असतात. ऑफिसचे काम जास्त झाले, मुलांचा अभ्यास वाढला, घरात पाहुणेरावळे आले, काही समारंभांचे आयोजन असले तरी पहिला परिणाम होतो तो आपल्या झोपेवर!
हेही वाचा- करियर आणि घर: आयुष्याचं ध्येय निश्चित असेल तर सगळं शक्य
अपुर्या झोपेचे शरीरावरील दुष्परिणाम
महिनोंमहिने, वर्षानुवर्षे अपुर्या झोपेवर वेळ मारुन नेणारे ‘सुपरमानव’ आपल्या तडफदारीची कितीही चुणुक दाखवत असले, तरी त्यांच्या मेंदूवर झोपेच्या अभावातून येणार्या थकव्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होतो, असे अभ्यासांमधून दिसून येत आहे. कामावर लक्ष न लागणे, विचारशक्तीवर परिणाम होणे, सर्जनशीलता कमी होणे, या सर्व गोष्टी कमी झोपेमुळे होतात. चटकन नावे न आठवणे, शब्द न आठवणे असे अनुभव यायला लागतात. अपुर्या झोपेमुळे चक्कर आल्यासारखे वाटणे, काय बोलतो आहोत, ऐकतो आहोत त्याचे अवधान नसणे असेही अनुभवही आपल्याला कधीमधी येतात. रस्त्यावरील कितीतरी अपघात झोपेच्या अभावी घडून येतात. कामावर चुका होऊन त्यामुळे किती नुकसान होते कुणास ठाऊक? माणसाला रोज सात ते आठ तास झोप मिळाली नाही आणि या दिनक्रमाची कालक्रमणा तशीच चालू राहिली तर बुद्धीची धार कमी झाल्यासारखे वाटू शकते आणि मेंदूचे आरोग्य हळुहळू बिघडू शकते.
रोज सहा तास झोप घेणार्यांमध्येही चुटकीसरशी विचार करण्याची क्षमता कमी होते, तसेच स्मरणशक्तीच्या चाचण्यांमध्ये त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे दिसून येते. झोप पुरेशी न झाल्यामुळे मन स्थिर करता येत नाही त्यामुळे नवीन ज्ञानग्रहणाला अधिक वेळ लागतो, मेंदूमध्ये माहिती साठवण्यावर परिणाम होतो. प्रसंगावधानतेवर, विचार सुचण्यावर, विचार मांडण्यावरदेखील अपुर्या झोपेमुळे परिणाम होतो. नवीन कौशल्ये शिकत असताना ठराविक झोप मिळाली नसेल तर ते कौशल्य कायमच्या स्मृतीत जाऊ शकत नाही. एवढेच नाही, तर डोक्यात साठवलेली माहितीही जेव्हा पाहिजे तेव्हा आठवत नसल्याचे दिसून येत आहे. अष्टावधानी असणे हा आपल्या कार्यशैलीचा एक मोठा आधारस्तंभ मानला जातो, त्यावरही झोप नसल्याचा परिणाम होतो. म्हणजेच एकंदरीत आपली कार्यक्षमता दुर्बल होत जाण्याच्या मार्गाने आपली वाटचाल चालू होते. झोपेचा आणि शिक्षणाचा संबंध विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनीही समजून घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा- आकर्षक ‘अंडरआर्म्स’साठी चक्क मेकअप!
शरीरालाही कमी झोपेमुळे शिक्षाच!
झोपेच्या अभावाचे परिणाम शरीरालाही भोगावे लागतात. पुरेशा झोपेविना आपली रोगप्रतिकारक क्षमता दुबळी होते. पांढर्या पेशींची संख्या कमी होते. इतकेच नव्हे, तर पांढर्या पेशींचे कार्यही ढेपाळते. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी जे ‘ग्रोथ हॉर्मोन’ लागते त्याचे उत्पादन मंदावते. शरीरातील साखर वापरण्याची प्रक्रिया संथपणे होते. रोगांचा प्रतिकार करणार्या पेशींची प्रतिकारकशक्ती पाहिजे तेवढ्या विश्रांतीच्या अभावी कमी होते. शरीराला ताण जाणवून ताणावर मात करण्यासाठी वेगळ्या हॉर्मोन्सची निर्मिती होते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. तरुण पिढीमध्ये मधुमेह होण्याचे प्रमाण वाढल्याचा दाखला आपल्याला दिसून येत आहेच. मधुमेहामुळे मेंदू लवकर थकायला लागतो असेही शास्त्रज्ञांना दिसून येत आहे. त्रासिकपणा, त्रागा, चिडचिड, निराशा, असे नको असलेले स्वभावातील बदल जीवनातील ताण आणि अपुरी विश्रांती याचा परिणाम आहे. झोपेच्या अभावामुळे एकंदरीतच शरीर उतरणीला लागते असे म्हटल्यास ते गैर ठरणार नाही. थोडे थांबून आपली ‘बिझी लाईफस्टाइल’ आपल्याला कुठे घेऊन जाईल याचा हिशेब प्रत्येकाने करण्याची गरजच यातून दिसून येते आहे. महिनोंमहिन्यांची सोडा, खरंतर अगदी एखाद्या दिवसाची कमी झोपही मेंदूला परवडणारी नसते.
जीवनासाठी झोप अत्यावश्यक
झोप ही रिकामटेकडयांसाठी आहे, उद्योगी माणसाला झोप परवडत नाही असे म्हणणारे बरेच असतात. तरुण वयात काम नाही करायचे तर केव्हा? असाही प्रश्न बरेच जण विचारतात. हा प्रश्न रास्त असला तरी अती कामासोबत अकाली येणारे अनारोग्य स्वागतार्ह नाही. आपल्या शरीराला विश्रांतीची नितांत गरज असते. झोपल्यावर शरीरातील इंद्रियांचे, अवयवांचे कार्य कमीत कमी चालू राहाते. त्यातून त्यांना विश्रांती मिळून त्यांची झीज भरुन येते. शरीरातील सगळ्याच इंद्रियांना आपली झीज भरुन काढण्यासाठी झोपेची आवश्यकता असते असे नाही. उदा. स्नायू. शरीराची हालचाल थांबून ते विश्रांती घेत असतानादेखील स्नायू भरुन येऊ शकतात. परंतु अशा शरीराच्या विसाव्याच्या स्थितीत (म्हणजे झोपलेले नसताना) मेंदूला मात्र दक्षच राहावे लागते.
जेव्हा शरीर झोपेच्या स्वाधीन होऊन पूर्ण विश्राम पावते, तेव्हाच मेंदूला पाहिजे तो विसावा मिळतो. हृदयाचा वेग कमी होतो, रक्तदाब कमी होतो. झोपेमध्ये न्यूरॉन्सच्या नवनिर्मितीसाठी आवश्यक अशा प्रोटीन्सचे उत्पादन केले जाते. शरीरातील पेशी आपली झीज भरुन काढतात. नवीन पेशींची निर्मीती होते. मेंदूतील पेशी, न्यूरॉन्सही झीज भरुन काढतात, आपल्या अवतीभोवतीच्या नको असलेल्या केमिकल्सना साफ करतात. हव्या असलेल्या केमिकल्सची निर्मिती करतात. दुकाने ‘स्टॉक टेकिंग’साठी बंद असतात ना, तसेच स्टॉक टेकिंग मेंदूला रोज आवश्यक असते. दिवसभर डोळ्यात तेल घालून राबणार्या मेंदूला हे काम करण्याची संधी फक्त रात्रीच मिळू शकते. रात्री अशा रीतीने विश्रांती झाली तर दुसर्या दिवशीचे काम पूर्ण शक्तिनिशी करायला मेंदू सिध्द होतो. बरेचदा सकाळी झोपेतून उठल्यावर कालच्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याचा ‘युरेका’ अनुभव तुम्हाला आला असेल. याचे कारण रात्री विश्रांतीच्या काळात मेंदूने तुमच्या नकळत त्यावर काम करुन ठेवलेले असते.
हेही वाचा- महिलांना व्हाईट डिस्चार्ज का होतो? जाणून घ्या किती दिवसापर्यंत डिस्चार्ज होणे सामान्य आहे
झोपेवाचून काम करायची वेळ आलीच तर-
- कामाच्या मध्ये मध्ये पाच-दहा मिनिटांच्या छोट्या सुट्ट्या घ्या. चहा प्यायला बाहेर जा, ऑफिसमध्ये थोडी चक्कर टाकून या.
- बाहेरच्या झाडांकडे नजर टाका, पक्षांची चिवचिव ऐका. जेवणाच्या सुट्टीत सहकार्यांशी गप्पा करा.
- काम करताना काही वेळ पाठीमागे तुमच्या आवडीचे संगीत ऐका.
यामुळे मेंदूला जरा बदल होऊन सततच्या कामाच्या विचारचक्रातून तो क्षणभर का होईना बाहेर पडेल आणि त्याला जरुरीचा थोडासा तरी विसावा मिळेल. - मात्र सात, आठ तासाची झोप तुमच्या कामाच्या धबडग्यात घेणे अशक्य असेल, तर मेंदू सतत आपला गुलाम म्हणून काम करेल अशी अपेक्षा न केलेलीच बरी!