परिस्थिती माणसाला सर्वकाही शिकवून जाते आणि माणूस एकतर खचून जाऊन हार मानतो किंवा हार न मानता आलेल्या परिस्थितीवर मात करायला योद्धा म्हणून तयार होतो. रेखा यांच्याबाबतीतसुद्धा हेच झालं. घरची परिस्थिती बिकट असताना त्या खचून न जाता त्यावर मात करण्यासाठी त्यांनी जिद्दीने घराची धुरा सांभाळली. त्यांच्या धाडसाने हळूहळू घरची परिस्थिती तर पूर्वपदावर आलीच, पण रातोरात त्या उत्तराखंडमध्ये त्या एक सेलिब्रिटी स्टार बनल्या आहेत.

आज आपला देश महासत्ता बनण्याच्या मार्गावर असला तरी आपल्या देशात आजही अनेक ठिकाणी महिलांना काही सामाजिक बंधने आहेत. पण हल्ली ही बंधने झुगारून प्रत्येक क्षेत्रात महिला उत्तुंग भरारी घेत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे रेखा लोहानी पांडे. मागील एक वर्षांपासून उत्तराखंडमध्ये हे नाव चर्चेचा आणि अभिमानाचा विषय बनला आहे. कारणही तसेच खास आहे. रेखा या उत्तराखंडमधील पहिल्या महिला टॅक्सी चालक आहेत. आता तुम्ही म्हणाल, यात काय नवीन आहे? महिलातर कधीपासूनच ड्रायव्हिंग करायला लागल्या आहेत. पण स्वत:च्या खाजगी गाड्या चालविणे आणि उदरनिर्वाहासाठी गाडी चालवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

हेही वाचा : २० किलोच्या गुलाबी गाऊनमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणारी नॅन्सी आहे तरी कोण? पाहा व्हायरल फोटो

परिस्थिती माणसाला सर्वकाही शिकवून जाते आणि माणूस एकतर खचून जाऊन हार मानतो किंवा हार न मानता आलेल्या परिस्थितीवर मात करायला योद्धा म्हणून तयार होतो. रेखा यांच्याबाबतीतसुद्धा हेच झालं. घरची परिस्थिती बिकट असताना त्या खचून न जाता त्यावर मात करण्यासाठी त्यांनी जिद्दीने घराची धुरा सांभाळली. त्यांच्या धाडसाने हळूहळू घरची परिस्थिती तर पूर्वपदावर आलीच, पण रातोरात त्या उत्तराखंडमध्ये त्या एक सेलिब्रिटी स्टार बनल्या आहेत.

कोण आहेत रेखा लोहानी पांडे?

रेखा लोहानी पांडे या उत्तराखंडमधील अल्मोरा जिल्ह्यात राणीखेत येथे आपल्या तीन मुली आणि पतीसह राहतात. त्यांचे पती एक निवृत्त सैनिक आहेत. तर त्या स्वत: उच्चशिक्षित आहेत. डबल एमए, मास्टर इन सोशल वर्क, एलएलबीचीही पदवी आहे. त्यांचे पती लष्करातून निवृत्त झाल्यानंतर टॅक्सी चालवत होते. नंतर पेन्शनसाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करायचे असते, पण व्यसनाच्या आहारी गेलेल्या त्यांच्या पतीने तेदेखील जमा केले नाही, त्यामुळे मिळणारी पेन्शनसुद्धा एकाएकी बंद झाली. त्यामुळे सर्व घरचा खर्च, तीन मुलींचे शिक्षण हे टॅक्सीवरच अवलंबून होते. एकदा अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी टॅक्सीसाठी एक ड्रायव्हर कामाला ठेवला. पण त्या ड्रायव्हरचं काम व्यवस्थित नसल्याने त्यांना खूप तोटा सहन करावा लागला. त्यात पतीच्या उपचारावर खर्च देखील खूप झाला होता. त्यामुळे घरची परिस्थिती खूपच बिकट होत चालली होती. अशावेळी रेखा यांनी खचून न जाता टॅक्सीचं स्टेअरिंग आपल्या हातात घ्यायचा धाडसी निर्णय घेऊन उत्तराखंडमध्ये टॅक्सी परिवहन क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणली.

हेही वाचा : पराकोटीचा छळ, जबरदस्तीने विवाह, बलात्कार, मानवी तस्करी अन्…; महिलांचा युद्धात ‘असा’ जातो बळी

रेखा यांचा हा धाडसी निर्णय जरी असला तरी सुरुवातीच्या काळात त्यांना खूप टीका सहन कराव्या लागल्या. सुरुवात त्यांच्या पतीपासूनच झाली. आजारपणातही त्यांनी पत्नीच्या या निर्णयाला विरोध केला. नातेवाईकांकडूनसुद्धा टीका सहन कराव्या लागल्या. कारण पुरुषी वर्चस्व असलेल्या टूर ॲण्ड ट्रॅव्हल्स क्षेत्रात महिलेने गाडीचे स्टेअरिंग हाती घेणे हे त्यांना पटत नव्हते. जर ही टॅक्सी चालवायला लागली तर समाजात आपलं नाव खराब होईल अशी भीती त्यांना प्रथम वाटू लागली. पण रेखा यांनी माघार घेतली नाही. त्यांनी टीकाकारांचा अत्यंत धीटाईने सामना करून टॅक्सी चालवणं सुरूच ठेवलं.

टॅक्सी चालवतानासुद्धा ग्राहकांकडून काही वाईट अनुभव आले. काहीजण महिला चालक आहे म्हणून ठरलेल्या रेटपेक्षा पैसे कमी करत. कधी कधी ग्राहकांच्या हट्टापुढे नमते घेऊन रेखा यांना मिळतील तेवढ्या पैशांत समाधान मानावे लागे. तर कधी कधी भाडेच मिळत नाही म्हणून रेखा यांना ग्राहक बोलतील त्या पैशांमध्ये भाडे स्वीकारावे लागे. अशाप्रकारे सुरुवातीला त्यांना लिंगभेदभावाचासुद्धा सामना करावा लागला.

पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. रेखा यांच्या कामाची चर्चा उत्तराखंडमध्ये होऊ लागली. लोकांकडूनदेखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यांच्या या धाडसाची दखल घेत उत्तराखंडचे परिवहन मंत्री चंदन रामदास यांनी त्यांचे फोन करून अभिनंदन केले व भविष्यात काहीही मदत आपण मदतीस तयार असल्याचे आश्वासन रेखा यांना दिले.

हेही वाचा : भारतातील दुर्मीळ ‘हरगीला’ पक्ष्यांचे संवर्धन करणाऱ्या पूर्णिमादेवी बर्मन कोण? ‘हरगीला आर्मी’बद्दल जाणून घ्या

आज रेखा यांची उत्तराखंडमध्ये एक सेलिब्रेटी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. तर राज्यातील महिलांसाठी त्या एक प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हळूहळू इतर महिलादेखील या क्षेत्रात उतरण्याचे धाडस करू लागल्या आहेत. रेखा सांगतात की, त्यांनी हा निर्णय एकदम विचारपूर्वक घेतला आहे. एवढे शिक्षण असूनही हे काम करते म्हणून आजही काहीजण आश्चर्यचकित होतात. पण माझ्या नजरेत कोणतेही काम छोटे मोठे नसते. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा घरचाच व्यवसाय असल्याने मी तोच व्यवसाय पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी मलाच स्वत:ला चालक बनावं लागलं तर त्यात लाजण्यासारखं काय आहे किंवा नाव खराब होण्यासारखं काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका मुलाखतीत रेखा यांनी महिलांना हा संदेश दिला आहे की, महिलांनी केवळ घराच्या चौकटीपर्यंत मर्यादित न राहता त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण करायला हवी आणि स्वत:चं वेगळं असं अस्तित्व बनण्यासाठी जगलं पाहिजे. तुम्हाला जे करावेसे वाटते ते मनापासून करा. एक ना एक दिवस यश मिळणारच. जेव्हा एखादी महिला सशक्त, आत्मनिर्भर बनते तेव्हा कुटुंब, समाज, आणि देशही सशक्त बनतो.