सुचित्रा प्रभुणे
डॉ. सोनाली घोष आपल्यापैकी अनेकांना हे नाव कदाचित माहितीही नसेल. पण भारतीयांची मान उंचावी अशी कामगिरी या सोनाली घोषने केली आहे .नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त आययुसीएन संस्थेतर्फे मानाचा समजला जाणारा केंटन मिलर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. काझीरंगा अभयअरण्याला शिकारी आणि पुराच्या धोक्यामधून बाहेर काढत आणि पुरुषप्रधान क्षेत्रातील अडथळे मोडीत काढून संवर्धन आणि जतनाची एक नवी परिभाषा त्यांनी आपल्या कामातून निर्माण केली, याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. या स्वरूपाचा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.
पुणे येथे वास्तव्यास असलेल्या एका बंगाली कुटुंबात सोनाली यांचा १९७५ मध्ये जन्म झाला. वडील सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत असल्यामुळे सतत बदली. वडिलांच्या या स्वरूपाच्या नोकरीमुळे भारताचा बहुतांश भाग पाहून झाला होता. ते जिथं जिथं वास्तव्यास जात तिथं तिथं जंगले, अभयअरण्ये यांना आवर्जून भेट देत. त्यामुळे लहान वयातच प्राणी, निसर्ग, जंगले, पक्षी यांच्याविषयी एक प्रकारचे आकर्षण निर्माण झाले. यामुळे जीवशास्त्र या विषयाची विशेष आवड निर्माण झाली. त्यामुळे लाइफ सायन्स विषयातच करिअर करायचे हे पक्के ठरले होते.
दुसरे असे की, डेहराडून येथील एका नावाजलेल्या लाइफ सायन्स संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठी त्यांची निवड झाली. या शिष्यवृततीसाठी फक्त १० जणांची निवड केली जाते. आणि त्यांना भारतातील नामवंत पर्यावरणवादी आणि निसर्गप्रेमी संशोधकांबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते. ही शिष्यवृत्ती आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली,अ से डॉ. सोनाली दिलेल्या एका मुलाखतीत सांगतात.
या शिष्यवृतीच्या निमित्ताने जंगल, निसर्ग तेथील प्राणी-पक्षी यांचा खूप जवळून अभ्यास करता आला आणि बऱ्याच गोष्टी त्यांना शिकायलादेखील मिळाल्या. या प्रशिक्षणाच्या जोरावर त्यांनी काझीरंगा येथील अभयअरण्यात वन विभागाच्या संचालक म्हणून रुजू झाल्या तेव्हा त्यांनी अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. जसे त्या परिसरात सतत येणाऱ्या पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत आवश्यक ती उपाययोजना आखत त्यांनी अनेक दुर्मिळ प्राण्यांसह इतर सामान्य प्राण्यांचाही जीव वाचवला. याशिवाय तेथील निसर्गाचेदेखील योग्य रीतीने संवर्धन केले. काझीरंगामध्ये घेतलेले हे अथक परिश्रम त्यांच्या या पुरस्कारास कारणीभूत ठरले.
सर्व सामान्य तरुणी करिअरच्याबाबतीत पर्याय निवडताना तो लग्नानंतरदेखील कसा सुरक्षित राहील, एक स्त्री म्हणून आपण आपल्या कुटुंबाला आणि नोकरीमध्ये कसा समतोल निर्माण साधू शकू याचा विचार करूनच पर्याय निवडत असतात. अशावेळी वन खात्यातच नोकरी करण्याचा पर्याय का निवडला आणि कुटुंबीयांनी कशी साथ दिली, याबाबत त्या सांगतात की, निसर्गप्रेम ही माझी पहिली आवड होती. करिअर म्हणून जंगलची निवड हे एका तरुणीसाठी निश्चितच सुरक्षित पर्याय नाही, असा दबाव आमच्या नातलगांकडून आणि परिचितांकडूनदेखील झाला. पण माझे कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखविला.
कधी कधी जंगलात अशी परिस्थिती निर्माण होते की, महिनाभर तुम्ही जंगलाच्या बाहेर पडू शकत नाही. अशावेळी माझा नवरा आणि माझे कुटुंबीय माझ्या लहान मुलीला सांभाळतात. त्यामुळेच मी निश्चिंत मनाने काम करू शकते. राहता राहिला सुरक्षिततेचा प्रश्न तर तो जितका एका स्त्रीसाठी गंभीर असतो तितकाच तो पुरुषांसाठी असतो.
सुरुवातीच्या काळात म्हणजे सुमारे २५-३० वर्षापूर्वी स्त्री अधिकारी म्हणून काम करताना काही अडचणींचा सामना करावा लागला. जसे आपला बॉस ही एक महिला आहे, हेच लोकांच्या पचनी पडत नसे. ही महिला आहे, एक -दोन दिवस काम करील मग जाईल निघून असा काहीसा विचार या लोकांच्या मनात होता. पण जसजसे माझे काम विस्तारू लागले, तसतसा लोकांच्या मनात माझ्या विषयी आदर निर्माण होऊ लागला. मग आपसूकच गोष्टी बदलत गेल्या.
जंगलात काम करणे म्हणजे खूप गंभीर स्वरूपाचे काम करणे, असा बराचसा समज लोकांमध्ये असतो. खरं तर इतर कामांप्रमाणे इथेदेखील अनेक गमती-जमती घडत असतात. यातला एक गमतीदार किस्सा सांगतात- ‘‘भारतीय वन खात्याची( इंडियन फोरेस्ट सर्व्हिस) परीक्षा पास झाल्यानंतर काझीरंगा येथे नेमणूक झाली होती. त्यावेळी मी जुनिअर म्हणून काम करीत होते. असेच कामाच्या निमित्ताने जंगल फिरत असताना अचानकपणे एक आखुडशिंगी गवा माझ्या मागे लागला. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी मी पळत सुटले. आणि इतक्या वेगाने पळाले की समोर असलेल्या झाडावर मी स्वत: कशी सुरकन चढले हे माझे मलाच समजले नाही. आणि योगायोग बघा, आज याच गव्यांच्या दुर्मिळ जातीच्या संवर्धनाचे काम माझ्याकडून होत आहे.’’
डॉ. सोनली यांनी काझीरंगा येथेच नाही तर मानस सरोवर अभयारण्यातदेखील आपल्या कामाचे महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. या व्यतिरिक्त भारतातील इतर अनेक अभयारण्यातदेखील काम केले आहे. अभयारण्यात काम करताना त्यांचा भर हा तेथील दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती वाचविण्याकडे व तेथील नैसर्गिक गोष्टींचे संवर्धन कसे करता येईल याकडे अधिक कल असतो. त्यामुळेच आज ‘गोल्डन लंगुर’ ही प्रजाती जी एके काळी नष्ट होण्याच्या मार्गावर होती, ती वाढली आहे.
प्रत्येक क्षेत्राची आपापली अशी आव्हाने असतात. चांगले करिअर निवडून आयुष्यात सेटल होण्यासाठी जंगलचा जॉबदेखील तितकाच चांगला आणि पोषक पर्याय ठरू शकतो, हे डॉ. सोनाली घोष यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.त्यां च्या या कार्याला सलाम.
suchup@gmail.com
