रोजच्या खाण्याच्या पदार्थातील कडू-गोड रसांचे फायदे आणि प्रत्येक पदार्थ योग्य पद्धतीने व प्रथेप्रमाणे खाण्यामागचं वैज्ञानिक कारणं… अतिशय हलक्या, साध्या व आकर्षक शैलीत रसिकांसमोर मांडले जाते. परंपरागत ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम घडवत, आपल्या जेवणातील प्रत्येक पदार्थ आरोग्यासाठी किती उपयोगी आहे याची जाणीव करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न म्हणजे ‘सुरेल गाणी, पौष्टिक खाणी आणि आरोग्य वाणी!’
आजचा जमाना झटपट, सुटसुटीत आणि चटपटीत खाण्याचा आहे, असं असलं तरीही आपल्याकडे स्वयंपाकाचं नातं संस्कृतीशी जोडलेलं जातं. प्रत्येक खाद्यपदार्थ आणि अन्नपदार्थाला वैशिष्ट्यपूर्ण इतिहास लाभलाय. ताटातला प्रत्येक पदार्थ कुठे वाढायचा, त्याचं महत्त्व यामागे एक शास्त्र आणि पारंपरिकता आहे, मात्र परंपरेने या सर्व गोष्टी हल्लीच्या ‘फास्ट फूड’ आणि ‘डाएट’च्या जमान्यात पोट भरण्यापेक्षा पोटात ढकलण्याकडे कल वाढलाय.
त्यामुळे प्रत्येक अन्नपदार्थाविषयी असलेलं औदासिन्य जावं… नैसर्गिक आहाराला प्राचीन परंपरा लाभली आहे. या पदार्थांचा सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच मराठमोळ्या जेवणाचा आरोग्यदायी रसास्वाद घ्यायला शिकवणारा… भोजन कुतूहल… खाद्य कुतूहल शमवणारा कार्यक्रम ‘सुरेल गाणी, पौष्टिक खाणी आणि आरोग्य वाणी!’ या कार्यक्रमाच्या निर्मात्या आहेत प्रा. रेखा दिवेकर… प्रा. रेखा दिवेकर या रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका, तसेच आहार व योग अभ्यासक, गायिका, अनुवादिका, लेखिका, कवयित्री आणि व्याख्यात्या आहेत.
प्रसिद्ध आहारत तज्ज्ञ डॉ. मालती कारवारकर यांच्याकडे या विषयाचे प्रशिक्षण घेतले. जीवनशैली, रसायनशास्त्र आणि पोषक आहार यांचा सुंदर समन्वय साधून आजवर देश-विदेशात २५० हून अधिक व्याख्याने दिली आहेत.
घराघरांत रोजच्या जेवणात वाढले जाणारे पांढराभुभ्र भात, भाकरी, पोळी (चपाती), चटणी, लोणचं, कोशिंबिर, तृणधान्य, कडधान्याची उसळ, वरण, लोणी, तूप, दुग्धजन्य पदार्थ, ऋतुमानानुसार खाल्ल्या जाणाऱ्या पालेभाज्या, फळे… गोड पदार्थ असे परंपरेने ताटात मध्यभागी, डाव्या आणि उजव्या बाजूला वाढल्या जाणाऱ्या पदार्थांतील पोषणमूल्ये, त्यातील मूलद्रव्ये, त्यांचे महत्त्व सांगणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या अनोख्या व्याख्या, गोष्टी, म्हणी, वाक्यप्रचार, आध्यात्मिक संदर्भ… इतकंच नाही तर दिवसभरात प्रत्येकाने किती प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे… जेवणानंतर खाल्ल्या जाणाऱ्या मुखवासाचं महत्त्व… अशा तऱ्हेने प्रत्येक पदार्थाला स्पर्श करत कार्यक्रमाचा विषय श्रोत्यांपुढे सादर होतो… या जोडीला प्रत्येक पदार्थाला साजेसं हिंदी-मराठी गाणं…
रोजच्या खाण्याच्या पदार्थातील कडू-गोड रसांचे फायदे आणि प्रत्येक पदार्थ योग्य पद्धतीने व प्रथेप्रमाणे खाण्यामागचं वैज्ञानिक कारणं… अतिशय हलक्या, साध्या व आकर्षक शैलीत रसिकांसमोर मांडले जाते. परंपरागत ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम घडवत, आपल्या जेवणातील प्रत्येक पदार्थ आरोग्यासाठी किती उपयोगी आहे याची जाणीव करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न असं त्या सांगतात.
प्रा. दिवेकर या संगीतविशारद आहेत. २०२३ मध्ये ‘स्वरप्रसन्न’ ग्रुपची स्थापना केली.
सोशल मीडियावरील ‘रील्स’च्या वर्षावात अन्नाविषयी विरोधाभासी माहिती मिळत असल्यामुळे लोकांचे गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने, गाण्यांच्या बरोबरीने उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार याबाबतची माहिती देण्याची ही अनोखी संकल्पना त्यांनी मांडली.
आहारात गोड पदार्थांचा समावेश करण्याविषयी हल्ली अनेकांचे गैरसमज असतात, शिवाय काळाच्या ओघात बहुतांश लोकांना गोड पदार्थ खाणं नकोसं वाटू लागलं आहे, याची कारणं… गोड रसही शरीराला आवश्यक आहे, तो कसा मिळवायचा, हे अतिशय सोप्या भाषेत उलगडून सांगितले आहे. याशिवाय महागडी फळं तब्येतीला चांगली, असंही हल्ली अनेकांना वाटत असतं, पण ऋतुमानानुसार मिळणारी, आपोआप उगवणारी, पण दुर्लक्षित होणारी रानफळे, रानमेवा खाणं का गरजेचं आहे? असे आहार शास्त्राविषयी आजच्या आधुनिक जगात असलेले अनेक गैरसमज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहज दूर होतात.
‘सुरेल गाणी, पौष्टिक खाणी आणि आरोग्य वाणी!’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहाराची माहिती-गमतीजमतींचा आस्वाद घेता असे प्रा. रेखा दिवेकर सांगतात.
एकंदरीत, ऋतुमानाप्रमाणे निसर्गाने दिलेल्या पदार्थांचा आस्वाद कसा घ्यायचा, हे अतिशय सहज, सोप्या शैलीत सुरेल गाण्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम गुंफला आहे. रसिकांच्या आयुष्यातला खाण्यातला गोडवा अधिक ‘रुचकर’ करणारा हा कार्यक्रम लोकांना आहाराचे महत्त्व पटवून देण्याचा हा प्रयत्न आहे.
namita.warankar@gmail.com
